नागपूर सामाजिक

मिल्खा सिंगच्या मार्गदर्शनाने भारावले होते नागपूरकर!

 

महा मेट्रो नागपूर मॅराथॉननिमित्त दिली होती भेट

नागपूर,
भारताचे ज्येष्ठ धावपटू पद्मश्री मिल्खा सिंग हे देशातील युवकांचे प्रेरणास्रोत होते आणि आजही आहेत. वयाच्या नव्वदीत असतानाही त्यांचा उत्साह तरुणाचा होता. ज्यावेळी ते संबोधित करायचे तेव्हा त्यांचे विचार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत होते. असा काहीसा प्रसंग याचि देही याचि डोळा नागपूरकरांना आला. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी मिल्खा सिंग नागपुरात आले होते, त्यावेळी नागपूरकर त्यांच्या मार्गदर्शनाने अक्षरश: भारावून गेले होते. जगात भारताचा नावलौकिक करणारे फ्लाईंग सिख मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी निधन झाले. परंतु त्यांची आठवण कायमस्वरूपी नागपूरकरांच्या मनात आहे.
प्रतिकूल परिस्थितीत यश कसे मिळवायचे याचे उत्तम उदाहरण धावपटू मिल्खा सिंग यांनी देशाच्या तरुणांसमोर उभे केले आणि हेच कारण होते की अनेक युवकांचे ते प्रेरणास्रोत होते. त्यांना साक्षात् पाहण्याचा योग नागपूरकरांना आला. महा मेट्रो नागपूरच्या वतीने २०१६ मध्ये आयोजित मॅराथॉनमध्ये त्यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलविण्यात आले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना मिल्खा सिंग यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले होते. वयाच्या नव्वदीकडे वाटचाल सुरू असताना तितकाच उत्साह, जोश आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व पाहून नागपूरकरही थक्क झाले होते. ज्यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन सुरू केले, त्यावेळी त्यांचे बोलणे थांबूच नये अशी भावना उपस्थितांची होती. ज्येष्ठ, तरुण तर त्यांच्या बोलण्याने प्रेरित झाले होतेच, परंतु छोटी मुलेही त्यांच्या मार्गदर्शनाने प्रभावित झाली होती. या कार्यक्रमादरम्यान जवळपास ८६ वर्षे वयाचे मिल्खा सिंग अर्धा तास उभे राहून उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते
यादरम्यान त्यांनी रोम ऑलिम्पिकबद्दल माहिती दिली. तसेच भारतात एवढ्या वर्षांपासून दुसरा मिल्खा सिंग तयार होऊ शकला नाही अशी खंत व्यक्त केली. एवढेच नाही तर देशात प्रतिभावंत खेळाडूंची कमतरता नाही, परंतु विदेशी प्रशिक्षकांमुळे अ‍ॅथ्लिट आणि जिम्नॅस्टिकमध्ये देशाची घसरण झाल्याचे वक्तव्य केले होते. तसेच खेळाडूंना कशा प्रकारच्या सोयीसुविधा मिळाव्या आणि शासनातर्फे काय मदत व्हावी याबाबत देखील माहिती दिली. त्यांनी आपल्या तंदुरुस्तीचे रहस्य नागपूरकरांना सांगितले. हा संपूर्ण प्रसंग या कार्यक्रमादरम्यान उपस्थित असणाऱ्या नागपूरकरांच्या कायम स्मरणात राहणार यात शंका नसल्याचे मत महा मेट्रो मॅराथॉनचे मितेश रंभिया यांनी व्यक्त केले.

Copyright ©