यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 59 कोरोनामुक्त ; 5 पॉझेटिव्ह जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2215 बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 19 जून : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 5 जण पॉझेटिव्ह तर 59 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 1226 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 5 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1221 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 110 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72625 तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70729 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझिटिव आलेल्यांमध्ये महागाव येथील दोन, नेर एक, वणी एक व झरीजामनी येथील एका रूग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 72 हजार 144 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 99 हजार 441 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.80 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.41 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2215 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 64 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2215 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 38 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 539 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 21 रुग्णांसाठी उपयोगात तर 505 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 5 उपयोगात तर 1171 बेड शिल्लक आहेत.

___________________________________

30 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरु

यवतमाळ दि. 19 : काही दिवसांपूर्वी 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद करण्यात आले होते परंतु आता दिनांक 19 जून पासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांकरिता निवडक 10 ठिकाणी कोविड लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यात पाटिपूरा आरोग्य केंद्र यवतमाळ, ग्रामीण रुग्णालय बाभूळगाव, कळंब, दिग्रस, महागाव, उमरखेड, आर्णी, वणी आणि उपजिल्हा रुग्णालय दारवा व पुसद चा समावेश आहे. लसीची उपलब्धता व लाभार्थी ची मागणी नुसार लसीकरण केंद्रात वाढ करण्यात येईल.

या ठिकाणी लसीकरणासाठी येतानी नागरिकानी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक नाही. तसेच 45 वयोगटावरील नागरिकांचे करीता पुर्वी प्रमाणेच सुरू राहणार आहे. सद्या जिल्ह्यात 82 ठिकाणी लसीकरण सुरू असून 4900 कोवाक्सिन तर 11510 कोविशिल्ड लस उपलब्ध आहे. तरी सर्व पात्र नागरिकानी लस घेवून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे .

____________________________________

पीक कर्जासाठी ओटीएस योजनेचा लाभ घ्यावा

– जिल्हा उपनिबंधक

यवतमाळ दि.19 : ज्या शेतकरी सभासदांकडे बँकेचे जुने कर्ज थकीत झाल्यामुळे त्यांना नवीन पीक कर्जवाटप मिळत नाही, अशा शेतकऱ्यांनी प्रत्येक बँक पातळीवर असलेल्या एकमुस्त कर्ज परतफेड योजनेचा (ओटीएस) लाभ घ्यावा. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना बँकेचे धोरणानुसार भरणा करावयाचे कर्ज रक्कमेमध्ये सवलत मिळेल व बँकेकडुन रु. 3 लक्ष पर्यंतचे पीक कर्ज शुन्य टक्के व्याज दराने उपलब्ध होऊ शकेल असे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी सांगितले.

 

खरीप पीक कर्जवाटपाबाबत प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांचे जिल्हा समन्वयक यांची काल आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी सर्व बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत पीक कर्जवाटपासंबंधाने आढावा घेण्यात आला व सर्व प्रमुख बँकांना पीक कर्जवाटपाचे लक्षांकानुसार पीक कर्जवाटप करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच दिनांक 30 जुन पर्यंत सर्व बँकांनी 60 टक्के कर्जवाटपाचे उद्दीष्ट पुर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

शासन निर्णय दिनांक 11 जुन 2021 नुसार डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून या अंतर्गत सन 2021 – 22 मध्ये रु. 3 लाखापर्यंतचे पीक कर्ज घेणाऱ्या व सदर कर्ज विहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याज दराने कर्ज मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुद्दलाएवढे पीक कर्ज परतफेड करावे लागेल व व्याजामध्ये सवलत मिळेल. बँकांनी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड मार्फतच कर्जवाटप करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. बँक स्तरावर किती शेतकरी खातेदारांचे किसान क्रेडीट कार्ड वाटप बाकी आहे. त्याची सर्व माहिती संबंधीत बँकांनी तालुक्याचे तहसिलदार / सहाय्यक निबंधक यांना उपलब्ध करुन द्यावी, त्यामुळे शेतकऱ्यांना सुलभरित्या पीक कर्ज उपलब्ध होऊ शकेल. तसेच बँकांनी त्यांचेकडील ओटीएस योजनेबाबत शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

सभेला जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक अमर गजभिये, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदा या बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

Copyright ©