Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 99 कोरोनामुक्त ; 6 पॉझेटिव्ह – जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2208 बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 17 जून : गेल्या 24 तासात जिल्ह्यात केवळ 6 जण पॉझेटिव्ह तर 99 जण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात अनेक दिवसानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकअंकी आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरूवारी एकूण 998 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 6 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 992 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 219 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72606 तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70601 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 69 हजार 576 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 96 हजार 749 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.84 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.62 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2208 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 71 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2208 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 39 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 538 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 25 रुग्णांसाठी उपयोगात तर 501 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 7 उपयोगात तर 1169 बेड शिल्लक आहेत.

___________________________________

जिल्हाधिकारी यांची उमरखेड तालुक्यातील विविध कोविड सेंटरला भेटी

लसीकरण, पिककर्ज वाटप, खत व बियाणे उपलब्धतेचा घेतला आढावा

यवतमाळ, दि. 17 जून : जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी उमरखेड तालूक्यातील चिल्ली, उमरखेड, विडूळ, ढाणकी, बिटरगाव बु., बोरी वन, थेरडी, कोर्टा, फूलसावंगी तसेच महागाव येथे भेट देवून लसीकरण, पिककर्ज वाटप, खत व बियाणे उपलब्धतेचा काल आढावा घेतला.

उमरखेड तालुक्यातील यवतमाळ व मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ यांनी उमरखेड तालूक्यास भेट दिली, भेटी दरम्याण प्रथमत: मौजा चिल्ली येथील लसीकरण केंद्रास भेट देवून लसीकरणाची पाहणी केली. उपरोक्त मान्यवरांनी तहसीलदार उमरखेड यांचे कक्षात कोरोना लसीकरणाची स्थिती, पिककर्ज वाटप तसेच खत व बियाणे यांचे उपलब्धतेबाबत आढावा घेतला.

जिल्हाधिकारी येडगे यांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या उमरखेड उपजिल्हा कोवीड रूग्णालयात 100 बेड तर ग्रामीण रुग्णालय, महागाव येथे 80 बेडपर्यंत क्षमता वाढविण्याच्या सुचना केल्या. तसेच बिटरगाव बु. व बोरी वन येथील नागरीकांशी संवाद साधून कोरोना त्रिसुत्रीचे पालन करणे व लसीकरणासंदर्भात जनजागृतीपर माहिती दिली. ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी ‘माझे लसीकरण, सर्वांचे संरक्षण :: सर्वांचे लसीकरण, माझे संरक्षण’ ही मोहीम पुर्ण क्षमतेने राबविण्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय यंत्रणेला निर्देश दिले.

उपरोक्त दौऱ्यात आ. नामदेव ससाने, जिल्हा आरोग्य अधिकारी फर्लाद चव्हाण, तहसिलदार आनंद देऊळगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण वानखडे तसेच आरोग्य, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

_________________________________

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन

ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होण्याचे क्रिडा विभागाचे आवाहन

यवतमाळ, दि. 17 जून : दरवर्षी केंद्र व महाराष्ट्र शासनाच्यावतीने व विविध संघटनाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 जून हा दिवस जागतीक स्तरावर आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्यानिमित्ताने यवतमाळ जिल्ह्यामध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर सर्व शालेय विद्यार्थी, युवक, युवती, नागरिकांमध्ये योग विषयक आवड निर्माण करणे तसेच योगाचा प्रचार व प्रसार करणे करीता आंतरराष्ट्रीय दिनांचे औचित्य साधून दिनांक 21 जून 2021 रोजी सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत कोरोना 19 विषाणूचा प्रादुर्भाव पाहता ऑनलाईन पध्दतीने कोरोना नियमाचे पालन करून आंतरराष्ट्रीय दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. याप्रसंगी यवतमाळ जिल्ह्यातील, तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्था, विद्यालय, महाविद्यालय युवक, युवती, विद्यार्थी, नागरीक यांना ऑनलाईन पध्दतीने जास्तीत जास्त सहभागी होण्याकरीता क्रिडा विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

जिल्हा क्रिडा कार्यालयाद्वारे योग दिनाचे औचित्य साधून गुगल मिटद्वारे ऑनलाईन पध्दतीने दिनांक 21 जून रोजी सकाळी 7 ते 8 वाजता दरम्यान आंतरराष्ट्रीय योग दिन पतंजली योग समिती रविशंकर आर्ट ऑफ लिव्हींग, क्रीडा भारती, यवतमाळ जिल्हा हौसी असोसिएशन, यवतमाळ जिल्हा शारिरीक शिक्षण संघटना, आरोग्य भारती, संस्कार भारती, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, विविध योग समिती संघटना मंडळ, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येत आहे. योग दिनाची गुगल मिट लिंक https://meet.google.com/kor-iiyg-ddm उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर लिंकवर सकाळी 6.30 वाजता पासून तयार रहावे. त्यानुसार जिल्ह्यातील नागरिक, युवक, युवती, विद्यार्थी सहभागी होता येईल. सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनी जास्तीत जास्त संख्येने बालक, तरूण / तरूणी, अबालवृध्द यांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी उमेश एन. बडवे यांनी केले आहे.

________________________________

नगरपरिषदेद्वारे शुन्य कचरा व्यवस्थापन कार्यक्रमात खत निर्मितीवर मार्गदर्शन

यवतमाळ, दि. 17 जून : यवतमाळ नगर परिषद दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत नारीशक्ती वस्तीस्तर संघ संस्था व स्त्री मुक्ती संघटना, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने घरातील निघणाऱ्या ओल्या कचऱ्या पासून खत निर्मिती करणे हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नारीशक्ती वस्तीस्तर संघ संस्थाच्या अध्यक्ष ममताताई चिकटे, नगर परिषदचे शहर अभियान व्यवस्थापक दर्शन श्रीवास्तव, स्त्री मुक्ती संघटना समन्वयक योगिता खाकरे, किशोर खाकरे, लिलाधर दहीकर समुदाय संघटक सुनिता तिवारी इ. उपस्थित होते.

स्त्री मुक्ती संघटना समन्वयक योगिता खाकरे यांनी घरातील निघणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणेबाबत सविस्तर माहिती दिली. शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ती समस्या काही प्रमाणात कमी करण्यासाठी या प्रकल्पाद्वारे मदत होईल. मार्गदर्शक दर्शन श्रीवास्तव शहर अभियान व्यवस्थापक यांनी आपल्या मार्गदर्शनात घनकचरा अधिनियम सन 2016 मधील काही ठळक मुद्दे मांडले एक लाखावर लोकसंख्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी दोन वर्षाच्या आत आणि दहा लाखवर लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी तीन वर्षाच्या आत कचऱ्यावर प्रक्रीया करणारे प्रकल्प सुरु करायला हवेत, असे सांगितले. 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीने तीच्याकडून तयार झालेला घन कचरा रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी जाळू नये किंवा पुरू नये. तसेच तो गटारात तळ्यांमध्ये, नद्यांमध्ये, समुद्रात फेकू नये. रस्त्यांवर वस्तूची विक्री करणाऱ्यांनी ओला कचरा व सुका कचऱ्यासाठी वेगवेगळे डबे ठेवावे. व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीमध्ये टाकावे. कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न खूप गंभीर असला तरी त्यावरील उपाय खुप सोपे आहे. प्रत्येकाने सार्वजनिक स्वच्छतेची मुल्ये अंगी बाळगणे व स्वत:ला शिस्त लावणे गरजेचे आहे. यासाठी बचत गटातील महिलांनी पुढाकार घ्यावा व त्याचाच एक भाग म्हणून नारीशक्ती वस्तीवर संघ संस्था गिरी नगर, यवतमाळ येथे ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती हा प्रकल्प सुरु करण्यात येत आहे.

उपस्थित सर्व महिलांना ओला कचरा संकलनासाठी डस्ट बीनचे वाटप स्त्री मुक्ती संघटना तर्फे करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मिना मांडवगडे यांनी केले. आभार प्रदर्शन शितर उरकुडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरीता यादव, रश्मी चिकटे, इंदिरा सहारे, स्वाती नेवारे, नंदा पुनवटकर, अरूणा चिंचे, अलका भोयर, रीना बुटे, सिमा तांगडे व नारीशक्ती वस्ती स्तर संघातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©