यवतमाळ सामाजिक

मान्सूनच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजनांची अंमलबजावणी

मान्सुनच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून मान्सून पूर्वीची सर्व कामे तातडीने पूर्ण करून धरणाची/प्रकल्पांची तपासणी व डागडूजी करण्याची कामे पूर्ण झाली आहेत. मान्सून कालावधीत जिल्हा स्तरावरील सर्व नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित राहण्यासाठी कर्मचारी नेमणूक करण्यात आली असून शोध व बचाव साहित्याची तपासणी सुद्धा करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महसूल विभाग, पंचायत विभाग, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग यांचे जिल्हास्तरीय आढावा बैठक घेवून प्रकल्पाची डागडूजी करणे, शोध व बचाव साहीत्य तपासणी करणे, आरोग्य यंत्रणे ची सुसज्जता, मान्सून कालावधीत स्वच्छ पाणी पुरवठा, नुकसानग्रस्त भागातील शेतीपिकांचे सर्वेक्षण, प्रकल्पातून पाणी सोडावयाचे असल्यास त्याबाततची माहिती जिल्हा नियंत्रण कक्ष व संबधित गावात दवंडी देऊन लोकांपर्यंत पोहचविणे, जिल्ह्यातील सर्व संवेदनशील व अतिसंवेदनशील गावांचा आराखडा तयार करणे, सर्व तालुका स्तरीय यंत्रणेनी आपत्तीच्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करण्याचा सूचना दिल्या होत्या.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर सर्व तालुक्यात पुरूष व महिला यांचेकरीता स्वतंत्र शेल्टर होम तयार करण्याकरीता स्थळे निश्चित करूण्यात आली आहेत. विभाग प्रमुख यांचे करीता आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण यशदा पुणे यांचेद्वारे दि. 25 मे 2021 रोजी जिल्हयातील सर्व विभाग प्रमुख यांचे एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण ऑनलाईन पध्दतीने पूर्ण करण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापनाचे अनुषंगाने तालुका स्तरीय यंत्रणेची क्षमताबांधणी व्हावी याकरीता शासनाचे मास्टर ट्रेनरकडून 20 मे ते 23 या कालावधीत उप विभागस्तरीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आले होते.

मान्सून कालावधीत “काय करावे व काय करू नये” याबाबत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना वृत्तपत्रातून आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा शोध व बचाव पथकाव्दारे बेबंळा प्रकल्प येथे आपत्तीच्या अनुषंगाने मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली. महसूल विभाग, पोलिस विभाग व जलसंधारण विभागाचे अधिकारी यांनी यामध्ये सहभाग घेतला. जिल्ह्यात आपत्ती संदर्भात व पूर्व मान्सून तयारी पूर्ण करण्यात आली असल्याचे आपत्ती व्यवस्थापनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

Copyright ©