यवतमाळ सामाजिक

24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे जास्त जिल्हयात 75 कोरोनामुक्त, 30 पॉझेटिव्ह, दोन मृत्यू

 

* जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 2131 बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 10 : गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण दुप्पटीपेक्षा जास्ता आहे. जिल्ह्यात 30 जण पॉझेटिव्ह तर 75 जण कोरोनामुक्त झाले असून आज दोन व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील एक तर खाजगी रूग्णालयातील एका रूग्णाचा समावेश आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरूवारी एकूण 2895 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 30 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2865 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 622 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 192 तर गृह विलगीकरणात 430 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72504 झाली आहे. 24 तासात 75 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 70099 आहे. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1783 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 59 हजार 283 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 86 हजार 449 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.04 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

आज मृत्यू झालेल्या रूग्णांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ असलेल्या दारव्हा शहरातील 80 वर्षीय पुरूष तर खाजगी रूणालयात यवतमाळ येथील 66 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे.

पॉझेटिव्ह आलेल्या 30 जणांमध्ये 20 पुरुष आणि 10 महिला आहेत. यात दारव्हा येथील 7, दिग्रस येथील 1, घाटंजी येथील 1,कळंब 2, महागाव येथील 1, नेर 1, पुसद येथील 7, उमरखेड येथील 2, वणी येथील 3, यवतमाळ येथील 2, झरीजामणी येथील 1 रुग्ण तर इतर शहरातील 2 रूग्णंचा समावेश आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2131 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 148 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2131 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 61 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 516 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 51 रुग्णांसाठी उपयोगात तर 475 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 36 उपयोगात तर 1140 बेड शिल्लक आहेत.

_____________________________

नागरिकांना त्रास होऊ न देता तातडीने नाले सफाईची कामे पुर्ण करा

मान्सुनपुर्व आढावा सभेत जिल्हाधिकारी यांचे नगरपरिषद अधिकाऱ्यांना निर्देश

यवतमाळ दि.10, पाऊस सुरू झाला तरी अद्याप मान्सुनपुर्व नाले स्वच्छतेची कामे पुर्णपणे झाली नाही, नाले साफसफाई हे नियमित काम असल्याने ते लवकर का सुरू केले नाही, याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून नागरिकांना त्रास होऊ न देता शहरातील स्वच्छतेची कामे नियोजनपुर्वक व तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले.

मान्सुनपुर्व कामे व घनकचरा संकलन संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यवतमाळ नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मुख्याधीकारी महेश जामनोर प्रामुख्याने उपस्थित होते.

येत्या काही दिवसात मान्सूनची शक्यता असल्याने पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, पाणी तुंबून नाल्यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरू नये, नागरिकांची कोणत्याही स्वरूपात जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठी शहरातील चार मोठे नाले व त्याचेशी संबंधीत साफसफाईची कामे उद्यापासूनच सुरू करण्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले. तसेच घनकचरा संकलनाबाबत देखील त्यांनी आढावा घेतला. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत सर्व बाजार पुर्णपणे सूरू झाल्याने कचऱ्यात वाढ होणार असली तरी नगरपालीकेने प्रत्येक घरी, प्रतिष्ठाने व जागोजागी जाऊन कचरा संकलीत करावा, शहरात कोठेही कचऱ्याचे ढिग दिसायला नको, असेही जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

मुख्याधिकारी महेश जामनोर यांनी नगरपरिषदेमार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनेबाबत माहिती दिली. नाले साफसफाई व घनकचरा संकलनाच्या कामाची निविदा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून आरोग्य विभागाअंतर्गत करण्यात येणारी स्वच्छतेची कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

बैठकीला नगरपरिषदेचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

_________________________

आदिवासी महिला बचत गटासाठी शेळीगट पुरवठा योजना

योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 जून पुर्वी अर्ज सादर करावा

यवतमाळ, दि. 10 जून : विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना शेळी गट युनिट पुरवठा करणे या योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदानावर आदिवासी महिला बचत गटांना 10 शेळी व 1 बोकुड पुरवठा करणे या योजनेसाठी आदिवासी लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद येथून अर्ज घेऊन परिपूर्ण अर्ज भरून दिनांक 11 जून ते 30 जून 2021 या कालावधीत पुसद प्रकल्प क्षेत्रातील (पुसद, दिग्रस, दारव्हा, आर्णी, नेर, महागाव, उमरखेड) या 7 तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त महिला बचतगटांनी सदर योजनेकरीता परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज सादर करण्यात यावे.

योजनेचे नाव : आदिवासी महिला बचत गटाला शेळीगट पुरवठा करणे. अनुसूचित जमातीच्या महिला बचतगटांनी सादर करावयाची कागदपत्र : महिला बचतगट हा अनुसूचित जमातीचा असावा. लाभार्थी गट हा नोंदणीकृत असावा गटातील किमान एका सदस्याकडे 7/12 दाखला असणे आवश्यक आहे. तसेच शेळ्यांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक राहील. गटातील सदस्यांनी अथवा त्यांच्या कुटूंबातील इतर सदस्यांनी सदर योजनेचा लाभ यापूर्वी आदिवासी विकास विभाग अथवा इतर कोणत्याही शासकीय विभागाकडून घेतला नसल्याबाबत दाखला जोडणे आवश्यक आहे. बचतगटाचे सर्व सभासदांचे (अनुसूचित जमातीचे) जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक, बचत गटांचे नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक. रहिवासी प्रमाणपत्र, बचतगटाचे आधार जोडणी केलेले बँकेचे पासबुक, उत्पन्नाचे प्रमाणपत्र सर्व सभासदांचे (तहसिलदार यांचे), अर्जदाराचे पासपोर्ट साईज 2 फोटो, आधार कार्ड (सर्व सभासदांचे), शेळी गट युनिटची मालकी संपूर्ण बचत गटातील सदस्यांची असेल, कोणत्याही एका सदस्याचे त्यावर नियंत्रण नसेल, बचत गटास मिळालेली शेळी गट युनिट लाभार्थी कडून किमान 3 वर्ष विक्री केली जाणार नाही याचे हमीपत्र लिहून देणे आवश्यक राहील. बचत गटास योजनेची अंमलबजावणी योजनेच्या अटी व शर्ती नुसार करण्यास 100 रू. स्टँप पेपर करारनामा करून द्यावा लागेल.

Copyright ©