यवतमाळ सामाजिक

कोव्हीडमुळे पालक गमविलेल्या कुटुंबांना प्रत्यक्ष जाऊन मदत करा

 

बालकल्याण समितीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

बाल संगोपन योजनेद्वारे 1100 रुपये प्रतिमाह मदत

यवतमाळ, दि. 9 : कोविडमुळे ज्या बालकांनी आपले एक किंवा दोन्ही पालक गमावले आहेत, अशा बालकांना शासनातर्फे बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रतिमाह रुपये 1100 मदत देण्यात येते. ज्यांना मदतीची गरज आहे किंवा जे कुटूंब बालकल्याण समितीपर्यंत पोहचू शकत नाही अशा गरजवंत पात्र कुटूंबीयांपर्यंत समितीने प्रत्यक्ष पोहचावे व त्यांना मदत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बालसंरक्षण समितीच्या कृती दल समितीच्या कामकाजाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. एस.पी.घोडेस्वार, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे सचिव एम.आर.ए.शेख, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. टि.ए.शेख, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 100 टक्के कुटूंबांचा शोध घेवून त्यांना तातडीने मदत करण्यात यावी, यासाठी समाजकार्य महाविद्यालयाच्या इच्छुक विद्यार्थ्यांची मदत घ्यावी. तसेच गृहभेटी देवून चौकशी करतांना आढळून येणाऱ्या विधवा महिलांनादेखील संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर होता यावे यासाठी कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी प्राधाण्य देण्यात बाबत प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू यांनी या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत कोवीडमुळे पालक गमावलेल्या 217 मुलांचा शोध घेण्यात आला असल्याचे सांगितले. यापैकी 162 मुलांनी आपले वडील गमावले असून 51 मुलांनी आई गमावली आहे तर 4 मुलांनी आई व वडीला दोघांनाही गमावले आहे. याशिवाय शहरी भागातील सव्हेक्षणाचे काम अद्याप पुर्ण व्हायचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांचे हस्ते महिला व बालविकास विभागाद्वारे प्रकाशीत करण्यात आलेल्या कोविड संसर्गामध्ये अडचणीत सापडलेल्या बालकांसाठी मदत व बालसंगोपन योजनेवरील जनजागृती पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

बैठकीला जिल्हा बाल पोलिस पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.एल. आगाशे, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. शरद मातकर, नगर परिषदेचे के.बी. शर्मा व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

__________________________

बँकांचे कामकाज नियमित वेळेनुसारच- जिल्हाधिकारी

यवतमाळ, दि. 9 : यवतमाळ जिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंधामध्ये शिथीलता देण्यात आलेली आहे, तसेच सर्व शासकीय व खाजगी कार्यालये 100 टक्के उपस्थितीत नियमित सुरू करण्यात आले आहे. कोविड-19 अगोदरच्या परिस्थिती अगोदर शासनाने कोणतेही निर्बंध लावून दिलेले नव्हते, त्या वेळेप्रमाणे बँकांच्या ज्या नियमित वेळा ठरवून दिलेल्या होत्या, त्यानुसार बँकांनी आपले कामकाज नियमितपणे सुरू ठेवावे, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बँकांच्या दैनंदिन वेळापत्रकाबाबत जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

___________________________

अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय मध्ये जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा

यवतमाळ, दि. 9 जून : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ यांच्या वतीने दिनांक 7 जून 2021 रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त ऑनलाईन सेमीनारचे आयोजन करण्यात आले होते. अन्न हे माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहे, त्यामुळे अन्नाची नासाडी टाळणे, दुषित आहार टाळणे हा संदेश देण्यासाठी तसेच जनजागृतीसाठी 7 जून रोजी आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. एन. काटकर होते, तर प्रमुख वक्ते मुंबईचे सेफ फुड सोल्युशन संजय इंदाणी होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी सुमारे 4 लाख नागरीकांचा मृत्यू दृषित अन्नाच्या सेवनाने होतो. त्यामुळे अन्न दुषित होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. एन. काटकर यांनी सेमीनारला सर्व उपस्थितांनी आणि अन्न सुरक्षेबद्दल महत्व पटवून दिले.

संजय इंदाणी यांनी वरिष्ठ सल्लागार आणि मुख्य लेखापरिक्षक सेफ फुड सोल्युशन, मुंबई यांनी अन्न सुरक्षा भुमीका आणि आवाहने या विषयावर उपस्थित सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना मार्गदर्शक केले. अन्न सुरक्षा ही एक सामायिक जबाबदारी आहे. सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेसे अन्न चांगल्या आरोग्यास प्रोत्साहित करते. त्यामुळे सर्व ग्राहकांना सुरक्षित निरोगी आणि पौष्टीक आहार मिळविण्याचा हक्क आहे, असे त्यांनी नमुद केले. अन्न सुरक्षा विषयावर ऑनलाईन सेमीनार मध्ये 93 विद्यार्थी तसेच प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कृष्णा सवळे यांनी केले.

____________________________
मोटार परिवहन शिबीर कार्यालयाचा माहे जून मधील दौरा

यवतमाळ, दि. 9 जून : यवतमाळ जिल्ह्यातील 9 तालुक्याच्या ठिकाणी उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातर्फे माहे जून महिन्यातील तालुका शिबीर कार्यालयाचे पुढील तारखांना आयोजन करण्यात आले आहे. या तालुका शिबीर कार्यालयात फक्त पक्की अनुज्ञप्ती चे कामकाज करण्यात येणार आहे.

सदर दौऱ्यानुसार दारव्हा येथे दिनांक 14 जून, दिग्रस येथे 28 जून , पुसद येथे 15 जून व 22 जून, उमरखेड 25 जून, वणी येथे 17 व 24 जून, पांढरकवडा 29 जून, राळेगाव 21 जून, नेर 30 जून व महागाव येथे 18 जून 2021 रोजी शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात आले आहे.

दौऱ्यातील कामकाज कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याबाबतचा सर्व उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. सर्व अर्जदारांनी मास्क हातमोजे व स्वत:चे सॅनिटायझर घेवून कार्यालयात यावे, कार्यालयामध्ये गर्दी न होऊ देण्याबाबतची सर्व खबरदारी घेण्यात यावी. दुसऱ्या तालुक्यातील अनुज्ञप्तीधारकाने अपॉईंटमेंट घेतल्यास सदर अपॉईंटमेंट रद्द समजण्यात यावी. सहायक मोटार वाहन निरिक्षक उपरोक्त ठिकाणी नमुद केलेल्या दिनांकास शिबीर कार्यालयाचे आयोजन करून जनतेची कामे पार पाडतील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वाढोकर यांनी कळविले आहे.

Copyright ©