यवतमाळ सामाजिक

आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून बुद्ध पोर्णिमेनिमित्त ५०० पिंपळ वृक्षांची लागवड

-दिग्रस-दारव्हा-नेरसह यवतमाळात राबविणार उपक्रम

यवतमाळ  सध्या कोरोना काळात संपूर्ण देशात प्राणवायु (ऑक्सीजन) करीता लाखो रूग्णांची परवड झाली. त्यावेळी मानवाला झाडं, पर्यावरण आणि प्राणवायुचे महत्व कळले. त्यामुळे भविष्यात अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी नैसर्गिक प्राणवायुची कमतरता भासू नये, या विचारातून आमदार संजय राठोड यांनी दिग्रस, दारव्हा, नेरसह यवतमाळ शहरात किमान ५०० पिंपळवृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. आज २६ मे रोजी साजऱ्या होत असलेल्या बुद्ध पोर्णिमेचे औचित्य साधून या वृक्षांची लागवड केली जाणार आहे.

पिंपळाचे झाड १०० टक्के, वड ८० टक्के, कडूलिंब ७५ टक्के तर चिंचेचे झाड ६८ टक्के कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. ही झाडे परिसराला थंड हवामान तसेच ऑक्सिजन देऊन नैसर्गिक ताजेतवाने करण्याचे काम करतात. पिंपळाच्या झाडांची मुळे पाण्याच्या शोधात खूप खोल आणि जास्त जमिनीत लांबपर्यंत पोहचतात. त्यामुळे जमिनीत पाणथळ किंवा पाण्याचा ओलावा कायम असतो. पिंपळाच्या मुळांचा विस्तार अधिक झाल्यामुळे झाड अधिक मजबूत आणि प्रभावीपणे उभे असते. पिंपळाच्या झाडांमुळे भूजल पातळीमध्ये नेहमीच अधिक प्रमाणात भर पडते. दिवसा व रात्री दोन्ही वेळा हा वृक्ष हवेत प्राणवायू सोडतो हे याचे खास विशेष आहे. पिंपळ वृक्षाला पर्यावरणाच्या दृष्टीने महत्व असण्यासोबतच आयुर्वेदातही अनन्य साधारण महत्व आहे. या वृक्षाच्या औषधी गुणधर्मांमुळे पिंपळाचा विविध आयुर्वेदिक औषधांसह उपचारांमध्येही वापर होतो. तसेच धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्याही पिंपळाचे महत्व आहे. हिंदू तसेच बौद्ध धर्मात पिंपळाच्या झाडाला जास्त महत्त्व असल्याने मंदिराच्या आसपास ही झाडं मोठ्या प्रमाणात आढळतात. गौतम बुद्धांनी पिंपळ अर्थात बोधी वृक्षाखालीच साधना केली होती. त्यामुळेच उद्याच्या बुद्ध पोर्णिमेचे औचित्य साधून पहिल्या फेरीत ५०० पिंपळ वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आमदार संजय राठोड यांच्यावतीने कळविण्यात आले आहे. टप्प्या टप्प्याने हा उपक्रम शिवसेनेतर्फे संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. उद्या आज २६ मे रोजी बुद्ध पोर्णिमेनिमित्त दिग्रस, दारव्हा, नेरसह यवतमाळात मोकळ्या जागेत, बगिच्यांमध्ये, नागरिकांच्या सहकार्याने विविध नगरांमध्ये पिंपळ वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©