Breaking News यवतमाळ सामाजिक

*24 तासात 245 पॉझेटिव्ह, 416 कोरोनामुक्त 6 मृत्यू* *म्युकरमायकोसीस हा संसर्गजन्य आजार नाही*

 

 

जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1494 बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 24 : गत 24 तासात जिल्ह्यात 245 जण पॉझेटिव्ह तर 416 जण कोरोनामुक्त झाले असून सहा जणांचा मृत्यु झाला. यातील चार मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तर दोन मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.

 

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 5278 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 245जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5033 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2884 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1547 तर गृह विलगीकरणात 1337 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 70954 झाली आहे. 24 तासात 416 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 66349 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1721 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.11, मृत्युदर 2.43 आहे.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ तालुक्यातील 71 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 70 वर्षीय पुरुष, मारेगाव येथील 60 वर्षीय पुरुष आणि दिग्रस तालुक्यातील 46 वर्षीय महिला आहे. तर खाजगी रुग्णालयात पांढरकवडा येथील 60 वर्षीय पुरुष व यवतमाळ येथील 32 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला.

 

सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 245 जणांमध्ये 152 पुरुष आणि 93 महिला आहेत. यात वणी येथील 59 रुग्ण पॉझेटिव्ह, दिग्रस 39, दारव्हा 32, पांढरकवडा 27, यवतमाळ 25, आर्णि 13, बाभुळगाव 11, घाटंजी 11, राळेगाव 6, झरीजामणी 6, नेर 5, महागाव 5, मारेगाव 3, पुसद 1, उमरखेड 1 आणि इतर शहरातील 1 रुग्ण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 585950 नमुने पाठविले असून यापैकी 584263 प्राप्त तर 1687 अप्राप्त आहेत. तसेच 513309 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1448 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 785 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1494 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 219 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 358 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 155 रुग्णांसाठी उपयोगात, 371 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 411 उपयोगात तर 765 बेड शिल्लक आहेत.

 

___________________________

 

 

 

 

 

म्युकरमायकोसीस हा संसर्गजन्य आजार नाही

 

शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांनी त्वरीत रिपोर्टींग करण्याचे निर्देश

 

लक्षणे आढळताच उपचार घेण्याचे आवाहन

 

यवतमाळ, दि. 24 : कोव्हीडचा प्रादुर्भाव हा एकमेकांच्या संपर्कात आल्याने होत असला तरी कोव्हीड पश्चात होणारा म्युकरमायकोसीस हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता लक्षणे आढळताच त्वरीत वैद्यकीय उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

 

नियोजन सभागृहात म्युकरमायकोसीसबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हरी पवार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. जोशी आदी उपस्थित होते.

 

म्युकरमायकोसीसकरीता वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून खाजगी रुग्णालयात सुध्दा या आजाराचे रुग्ण आढळत आहे. शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांनी म्युकरमायकोसीसच्या रुग्णांबाबत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे रिपोर्टींग करावी. जेणेकरून त्या प्रमाणात ‘ॲम्पोटेरेसीन बी’ हे इंजेक्शन मागणीच्या प्रमाणात जिल्ह्याला उपलब्ध होईल. अन्यथा जिल्ह्याला इंजेक्शनचा साठा मिळणार नाही व रुग्ण उपचारापासून वंचित राहील. त्यामुळे पोर्टलवर अशा रुग्णांची रिपोर्टींग होणे अत्यावश्यक आहे, याची सर्व रुग्णालयांनी दक्षता घ्यावी.

 

कोव्हीड पश्चात होणारा हा आजार वयोवृध्द तसेच मधूमेह असणा-यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांनी त्वरीत तपासणी करून मधूमेह नियंत्रणात ठेवावे. लवकर निदान झाले तर उपचार लवकर मिळतील, या गोष्टीची जाणीव ठेवून कोणताही वेळ वाया घालवू नये. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वॉर्ड क्रमांक 17 हा म्युकरमायकोसीसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड करण्यात आला आहे. रुग्णांची संख्या लक्षात घेता वॉर्ड क्रमांक 15 मध्ये अतिरिक्त 35 बेडची व्यवस्था केली असून त्याला आणखी विस्तारीत करण्याचे नियोजन आहे. या आजारावर वैद्यकीय महाविद्यालयात मोफत उपचार असून येथील नाक, कान, घसा विभागामध्ये म्युकरमायकोसीसबाबत डेडीकेटेड ओपीडी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

जिल्हास्तरावर म्युकरमायकोसीस या आजाराच्या नियंत्रणासाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात येणार आहे. नियंत्रण कक्षसुध्दा स्थापन करण्यात येईल. या अंतर्गत नागरिकांसाठी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देऊन यावर नागरिकांच्या शंका-कुशंकांची सोडवणूक करण्यात येईल. तसेच औषधोपचाराच्याबाबत माहिती देण्यात येईल.

कोव्हीडमधून बरे झालेल्या वयोवृध्द आणि मधूमेह असणा-यांचा डाटा शासकीय आणि खाजगी रुग्णालयांकडे आहे. तो सर्व डाटा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने एकत्रित करावा. या रुग्णांपर्यंत म्युकरमायकोसीसची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, घ्यावयाची काळजी आदींबाबत जनजागृती करण्यात येईल. तसेच सर्व समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमे आणि वैयक्तिकरित्या दूरध्वनीद्वारे नागरिकांना म्युकरमायकोसीसची माहिती देण्यात यावी. पुढील सात-आठ दिवसांत मधूमेह आणि पोस्ट कोव्हीड रुग्णांचे स्क्रिनिंग करावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

यावेळी डॉ. गिरीश जतकर, डॉ. सुरेंद्र गवार्ले, डॉ. विजय डोंबाळे, डॉ. रमा बाजोरीया आदी उपस्थित होते.

म्युकरमायकोसीसची लक्षणे : या रोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे आहे. चेह-याचे स्नायू दुखणे, चेह-यावर बधिरपणा येणे, अर्धशिशी (डोक्याची एक बाजू दुखणे), नाक चोंदणे, नाकावर सूज येणे, एका नाकपुडीतून रक्तस्त्राव, काळपट स्त्राव येणे, चेहरा अथवा डोळ्यावर सूज येणे, एक पापणी अर्धी बंद होणे, डोळा दुखणे, वरच्या जबड्याचे दात दुखणे किंवा हलू लागणे, अस्पष्ट दिसणे, ताप येणे.

 

काय करावे (प्रतिबंधात्मक उपाय) : रक्तातील साखरेवर काटेकोरपणे नियंत्रण ठेवणे, कान, नाक, घसा, नेत्र व दंत तज्ज्ञाकडून एका आठवड्यानंतर तपासणी करणे, वरील लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करणे, डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त दिवस स्टिरॉईड न घेणे, टूथब्रश / मास्क वरचेवर बदलणे, दिवसातून एकदा गुळण्या करणे, वैयक्तिक व परिसरातील स्वच्छता ठेवणे, जमिनीखाली लागणा-या भाज्या नीट स्वच्छ धुवून खाव्यात. मातीत काम करतांना व खतांचा वापर करतांना पूर्ण बाह्यांचा शर्ट, फुलपॅन्ट, हातात ग्लोव्हज घालावे. तसेच नाकातोंडावर मास्क घालावा.

 

हे करू नये : छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. घरगुती उपायांचा पर्याय निवडू नये. वैद्यकीय सल्ल्यानेच स्टिरॉईड व इतर औषधांचे सेवन करावे.

Copyright ©