Breaking News यवतमाळ सामाजिक

*24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या जवळपास दुप्पट*. *इतर घडामोडीत सह*

 

जिल्ह्याबाहेरील (अकोला, वाशिम) दोन मृत्युसह एकूण 14 मृत्यु

जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1293 बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 20 : गत 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणा-यांची संख्या जवळपास दुप्पट आहे. जिल्ह्यात 443 जण पॉझेटिव्ह तर 823 जण कोरोनामुक्त झाले असून 14 जणांचा मृत्यु झाला. यातील सात मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, एक मृत्यु डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर सहा मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे. तसेच 14 पैकी दोन मृत्यु अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 7972 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 443 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 7529 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3654 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1855 तर गृह विलगीकरणात 1799 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 69744 झाली आहे. 24 तासात 823 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 64410 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1680 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.45 , मृत्युदर 2.41 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 83 वर्षीय महिला, तालुक्यातील 38 वर्षीय पुरुष व 68 वर्षीय महिला, नेर येथील 42 वर्षीय पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील 51 वर्षीय पुरुष आणि वाशिम येथील 52 वर्षीय पुरुष आहे. डीसीएचसीमध्ये मृत्यु झालेल्यामध्ये वणी येथील 65 वर्षीय पुरुष तर खाजगी रुग्णालयात दिग्रस येथील 50 वर्षीय पुरुष व 50, 55 वर्षीय महिला, घाटंजी येथील 45 वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 79 वर्षीय पुरुष आणि अकोला येथील 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.

गुरुवारी पॉझेटिव्ह आलेल्या 443 जणांमध्ये 271 पुरुष आणि 172 महिला आहेत. यात वणी येथील 107 रुग्ण पॉझेटिव्ह, यवतमाळ 69, दिग्रस 51, नेर 32, पांढरकवडा 30, पुसद 25, दारव्हा 19, उमरखेड 17, घाटंजी 16, मारेगाव 14, आर्णि 13, बाभुळगाव 11, महागाव 11, राळेगाव 8, कळंब 7, झरीजामणी 6 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 560088 नमुने पाठविले असून यापैकी 557888 प्राप्त तर 2200 अप्राप्त आहेत. तसेच 488144 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1293 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 32 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2244 आहे. यापैकी 951 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1293 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 311 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 266 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 143 रुग्णांसाठी उपयोगात, 383 बेड शिल्लक आणि 32 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1141 बेडपैकी 497 उपयोगात तर 644 बेड शिल्लक आहेत.

____________________________

जिल्ह्यातील शेतक-यांना वेळेवर खते उपलब्ध करून द्या

– जिल्हाधिकारी येडगे

खतांच्या संरक्षित साठ्याबाबत जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक

यवतमाळ, दि. 20 : शेतक-यांच्या मागणीप्रमाणे वेळेवर युरीया खताचा पुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाबरोबरच आता विदर्भ को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनला देखील युरीयाचा संरक्षित साठा करण्यासाठी नोडल एजंन्सी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यासाठी 6460 मे.टन संरक्षित साठ्याचे (बफर स्टॉक) लक्षांक आहे. त्यामुळे शेतक-यांना वेळेवर खते उपलब्ध होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात खतांच्या संरक्षित साठ्याबाबत जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जि.प. कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, विक्रेता संघाचे अध्यक्ष संजय पाळलेकर, विदर्भ को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा व्यवस्थापक अमोल राजगुरू, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापक एम.पी. गावंडे, डी.एस.आवारे, प्रसाद फांजे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात संरक्षित साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असला पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, वेगवेगळ्या खत कंपनीच्या प्रतिनिधींशी कृषी विभागाने समन्वय ठेवावा. कोव्हीड नियमांचे पालन करून कृषी निविष्ठा वाहतूक करण्यास कोणतीही अडचण नाही. जिल्ह्यात साठा कधी उपलब्ध होईल, याची माहिती शेतक-यांना मिळाली पाहिजे. तसेच शेतकरी उचल करतील त्याच्या 15 दिवसांपूर्वी जिल्ह्यात खतांचा साठा उपलब्ध होईल, याबाबत कृषी विभागाने नियोजन करावे. अप्रामाणिक नमुन्यांवर त्वरीत गुन्हे दाखल करा. चोरीचे बियाणे जिल्ह्यात येणार नाही, यासाठी कृषी विभागाने सतर्क राहावे. कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून गावागावातील शेतक-यांना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या अधिका-यांसह सर्व यंत्रणेने बांधांवर जाऊन शेतक-यांशी संपर्क ठेवावा, अशा सुचनाही जिल्हाधिका-यांनी दिल्या.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एकूण साठा किती, यात युरीयाचा स्टॉक किती, रॅक पॉईंटवरून खतांचा पुरवठा कधी होईल, किती मे.टन खतांची जिल्ह्याला गरज आहे, उपलब्ध साठ्याच्या किती टक्के बफर स्टॉकमध्ये ठेवण्याच्या सुचना आहेत, आदींबाबत त्यांनी आढावा घेतला.

जिल्हास्तरीय संरक्षित खत साठ्याचे सनियंत्रण करण्याकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. तसेच जि.प. कृषी विकास अधिकारी, खत विक्रेते प्रतिनिधी आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे प्रतिनिधी हे सदस्य आहेत. जिल्हास्तरीय समितीने मंजूरी दिल्यानंतरच महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने संरक्षित असणारा साठा विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावा. कोणत्याही परिस्थितीत जिल्हास्तरीय समितीच्या मंजुरीशिवाय संरक्षित युरीया खत साठा विकला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही बैठकीत सांगण्यात आले.

___________________________

डाक विभागाच्या पदाकरीता अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 मे पर्यंत

यवतमाळ, दि. 20 : महाराष्ट्र सर्कलच्या ईएसटीटी / 4-1 जीडीएस 3 सायकल ऑनलाईन इंगेजमेंट /2021 नोटीफिकेशन नुसार 2428 जागेसाठी भरती प्रक्रीया सुरु झालेली आहे. त्यातील यवतमाळ जिल्ह्यातील 90 जागा आहे. सर्व माहिती https://indiapost.gov.in किंवा https://appost.in/gdsonline या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतीम तारीख 26 मे 2021 आहे.

जीडीएस बीपीएम पदाकरीता 50 जागा, जीडीएस एबीपीएम पदाकरीता 32 जागा, जीडीएस डाक सेवक पदाकरीता 8 जागा अशा एकूण 90 जागा आहेत. सदर पदाकरीता ऑनलाईन पध्दतीने डाक विभागाच्या वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी सर्व बेरोजगार उमेदवारांनी सदरचे संकेतस्थळावर अर्ज प्रक्रीया करून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

___________________________

यवतमाळ – नागपूर परिवहन मंडळाची सेवा सुरू

यवतमाळ, दि. 20 : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन कालावधीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र आता उपमहाव्यवस्थापक मुंबई यांनी दिलेल्या सुचनेनुसार दिनांक 19 मे 2021 पासून यवतमाळ ते नागपूर या मार्गावर जाणाऱ्या प्रवाश्यांकरीता वेळा निश्चितीसह कोविड 19 अनुषंगाने शासनाद्वारे दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून सकाळी 8 वाजता, 9 वाजता आणि 11 वाजता बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच यवतमाळ ते अमरावती, यवतमाळ ते आर्णी, यवतमाळ ते पुसद, यवतमाळ ते उमरखेड, यवतमाळ ते वणी, यवतमाळ ते धामणगाव, यवतमाळ ते दिग्रस अशा मुख्य इतर सर्व ठिकाणी प्रवाशी उपलब्धतेनुसार बसेस वेळा निश्चित करून सोडण्याचे नियोजन करण्याच्या सुचना यवतमाळ विभागातील सर्वच आगार प्रमुख यांना विभागीय कार्यालयाद्वारे देण्यात आल्या आहेत, असे परिवहन मंडळ यवतमाळ यांनी कळविले आहे.

Copyright ©