Breaking News यवतमाळ सामाजिक

*24 तासात 518 जण पॉझेटिव्ह, 760 बरे जिल्ह्याबाहेरील दोन मृत्युसह (अमरावती, वाशिम) 15 मृत्यु*. *खाऊटी साठी अर्ज करण्याचे आवाहन*. ेेेेेेे *इतर महत्व पुर्ण घडामोडी सह*

 

यवतमाळ, दि. 17 : जिल्ह्यात गत 24 तासात 518 जण पॉझेटिव्ह तर 760 जण कोरोनामुक्त झाले असून 15 जणांचा मृत्यु झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 11 मृत्यु तर खाजगी रुग्णालयातील चार मृत्यु आहे. तसेच 15 मृत्युमध्ये जिल्ह्याबाहेरील अमरावती व वाशिम जिल्ह्यातील दोन मृत्यु आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 6220 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 518 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5702 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4448 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2127 तर गृह विलगीकरणात 2321 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 68221 झाली आहे. 24 तासात 760 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 62138 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1635 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.68 , मृत्युदर 2.40 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 58, 65 वर्षीय पुरुष तालुक्यातील 45, 60 वर्षीय पुरुष व 72 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 57 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 70 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 65 वर्षीय पुरुष, मारेगाव येथील 65 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्याबाहेरील अमरावती येथील 75 वर्षीय महिला आणि वाशिम येथील 37 वर्षीय पुरुष आहे. खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 59 वर्षीय महिला, दिग्रस येथील 45, 61 वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा येथील 60 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला.

सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 518 जणांमध्ये 303 पुरुष आणि 215 महिला आहेत. यात दारव्हा येथील 125 रुग्ण पॉझेटिव्ह, वणी 116, आर्णि 58, यवतमाळ 45, पांढरकवडा 31, मारेगाव 27, पुसद 25, दिग्रस 19, बाभुळगाव 18, कळंब 17, राळेगाव 11, महागाव 10, घाटंजी 5, नेर 5, उमरखेड 4 आणि इतर शहरातील 2 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 538168 नमुने पाठविले असून यापैकी 535399 प्राप्त तर 2769 अप्राप्त आहेत. तसेच 467178 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1161 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 32 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 1161 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 334 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 243 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 162 रुग्णांसाठी उपयोगात, 364 बेड शिल्लक आणि 32 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1141 बेडपैकी 587 उपयोगात तर 554 बेड शिल्लक आहेत.

__________________________

आरोग्य विभागाच्या फेक पदभरती जाहिरातीबाबत तक्रार दाखल

बेरोजगार उमेदवारांनी बळी न पडण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 17 : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या नावाने पदभरतीबाबत सोशल मिडीयावर फिरत असलेल्या फेक जाहिरातीसंदर्भात यवतमाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रिक्त पदाच्या सरळ सेवा पध्दतीने पदभरतीबाबत 16 मे पासून सोशल मिडीयावर फेक जाहिरात प्रसारीत होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र अशा कोणत्याही प्रकारची जाहिरात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिध्द करण्यात आली नसून फेक जाहिरातीत असलेले रिक्त पदे सरळसेवा पध्दतीने भरण्याची कोणत्याही प्रकारची पदभरती प्रक्रिया जिल्हा आरोग्य कार्यालयामार्फत सुरू नाही, असे कळविण्यात आले आहे.

सोशल मिडीयावर प्रसारीत होणारी जाहिरात ही पूर्णपणे खोटी असून बेरोजगार उमेदवारांची दिशाभुल करणारी आहे. तसेच भविष्यात अनुचित प्रकारास वाव देणारी असल्यामुळे नागरिकांनी या फेक जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने केले आहे.

 

अशा प्रकारची आहे फेक जाहिरात : नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अर्धवेळ एमबीबीएस (1 पद), स्टाफ नर्स (6 पदे), आरोग्य सेवक (26 पदे), ए.एन.एम (7 पदे), औषध निर्माता (5 पदे) आणि लॅब टेक्निशियन (6 पद) या पदासाठी 10 ते 25 मे 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. सदर फेक जाहिरातीमध्ये पदानुसार शैक्षणिक अर्हता नमुद केली असून मासिक वेतनाचासुध्दा उल्लेख आहे.

___________________________

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली मान्सूनपूर्व आढावा बैठक

यवतमाळ, दि. 17 : आगामी काळात मान्सूनचे आगमन लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खांडेराव धरणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. सोनटक्के, विज वितरण विभागाचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, बेंबळा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. बनसोड, तहसिलदार डॉ. संतोष डोईफोडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतिश मुन आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, मान्सून कालावधी लक्षात घेता संबंधित यंत्रणांनी मान्सूनपूर्व सर्व कामे तातडीने पूर्ण करावी. पूरप्रवण गावांची ओळख करणे, मुख्य नद्यांच्या प्रवाहामधील अडथळे काढणे, पूरप्रवण भागातील नैसर्गिक जलाशयांचे साफसफाई करणे व त्यातील गाळ काढणे तसेच सरळीकरण करण्यात यावे. तसेच नदीकाठावरील बंधाऱ्यांची, साठवण तलावाची पाहणी करणे आणि गरज असल्यास त्यांचे बळकटीकरण करणे, डागडूजी करणे इ. कामे मान्सूनपूर्व करावी. सर्व प्रमुख धरणावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी व त्यांची माहिती सर्व नियंत्रण कक्षास उपलब्ध करून देण्यात यावी. पावसाचे प्रमाण व धरणातील पाण्याच्या साठ्यावर लक्ष ठेवणे, धरणाच्या आजूबाजूला राहणाऱ्या गावकऱ्यांना धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल सावधगिरीचा इशारा देण्यात यावा. धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी कमीतकमी 5 ते 6 तास अगोदर सूचना द्यावी. पाणी सोडण्याबाबत संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवणे. पूर परिस्थितीत व पूर परिस्थिती ओसरल्यानंतर लागणारे औषधीद्रव्यांचे पूर्व नियोजन करणे आदी बाबी प्राधान्याने कराव्यात.

जिल्ह्यांमध्ये स्वच्छता व आरोग्यदायी परिसर टिकवून ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना करणे. साथीचा आजार, रोगांवर नियंत्रण व उपाययोजनेचा आराखडा तयार ठेवणे. जनावरांच्या औषधांचा मुबलक साठा पशू वैद्यकीय केंद्रावर ठेवण्यात यावा. अतिवृष्टीचा काळात जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याचा साठा ठेवण्यात यावा. जिल्ह्यांमध्ये शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास आपत्कालीन परिस्थितीतही शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होईल यांचे नियोजन करण्यात यावे.

जिल्हा व तालुकास्तरावर कार्यरत असलेल्या विभागनिहाय नोडल अधिकाऱ्यांचे नाव व संपर्क दुरध्वनी क्रमांकाची यादी तयार करून सर्व संबंधितांना उपलब्ध करून देण्यात यावी. पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये आवश्यक धान्यसाठा उपलब्ध ठेवण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कार्यवाही करावी. नुकसानीचे आकलन जलद गतीने होण्यासाठी, तलाठी, कृषी सेवक, ग्रामसेवक, बांधकाम विभागाचे अभियंता यांची तालुका स्तरीय समिती बनविण्यात यावी. तालुका स्तरावरील नियंत्रण कक्ष 24 तास सुरु ठेवावे व मान्सुन कालावधीत नुकसानीची माहिती सादर करण्याकरीता नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी व त्यांचा संपर्क क्रमांक जिल्हा कार्यालयास सादर करावा.

विद्युत खांब, झाडे पडल्यामुळे रस्ते बंद अथवा ट्रॅफीक जाम होणार नाही, याची काळजी घेवून रस्ते खुले करण्याची कार्यवाही करणे व याकरीता नियंत्रण कक्ष सुरु ठेवणे. विद्युत वितरण कंपनीने त्यांचा नियंत्रण कक्ष 24 x 7 सुरु ठेवावे, अतिवृष्टीमुळे पोल पडल्यास रिस्टोर करणे, रोहीत्र किंवा इलेक्ट्रिकल केबल पाण्याखाली आल्यास विद्युत पुरवठा खंडीत करणे, पुरपरिस्थितीमध्ये विद्युत खंडीत होणाऱ्या गावाची तपासणी करणे व आवश्यक उपाययोजना करणे, नियंत्रण कक्ष, व संबंधित अधिकारी यांचे संपर्क क्रमांक सर्व नियंत्रण कक्षास उपलब्ध करून देणे. अतिवृष्टी, पुरामुळे संपर्क तुटणारी गावे तपासणी करून संपर्क तुटणार नाही याची काळजी घेणे. अतिवृष्टी, पुरामुळे संपर्क तुटणारी गावातील तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, कृषी सेवक, यांचे संपर्क जिल्हा नियंत्रण कक्षात उपलब्ध करून देण्यात यावे तसेच तालुका नियंत्रण कक्षात व गावातील दर्शनी भागात प्रसिध्द करण्यात यावे, अशा सुचना दिल्या.

यावेळी व्हीसीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, सर्व मुख्याधिकारी, बांधकाम व पाटबंधारे विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.

__________________________

खावटी अनुदान योजनेसाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 17 : आर्थिक विवंचनेतील आदिवासी बांधवांना आधार देणारी खावटी अनुदान योजना एक वर्षासाठी सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेत मनरेगावर दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत एक दिवस कार्यरत असलेल्या आदिवासी मजूर, आदिम जमातीची सर्व कुटूंबे, पारधी समाजाची सर्व कुटूंबे जिल्हाधिकारी यांचे सल्ल्याने प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटूंबे, त्यामध्ये परित्यक्ता, घटस्फोटीत महिला, विधवा महिला, भुमिहीन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेले कुटूंब, वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्कधारक कुटूंबे यांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे खावटी अनुदान योजनेसाठी संबंधितांनी त्वरीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

पांढकरवडा आदिवासी विकास विभागाकडून केळापूर, वणी, यवतमाळ, मारेगाव, बाभुळगाव, कळंब, राळेगाव, घाटंजी, झारी जामणी या नऊ तालुक्यातील ग्रामस्तरीय तसेच शहरस्तरीय भागातील सर्वेक्षणाचे काम या कार्यालयाचे खावटी अनुदान समन्वयकाकडून करण्यात आलेले आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांचे अर्ज यापूर्वी भरण्यात आले नाही त्यांनी त्यांचे गावापासून जवळ अंतर असलेल्या ठिकाणी मुख्याध्यापक शासकीय माध्यमिक, प्राथमिक आश्रमशाळा किंवा मुख्याध्यापक अनुदानित माध्यमिक, प्राथमिक आश्रमशाळा तसेच गृहपाल शासकीय मुलांचे, मुलींचे वसतीगृह यापैकी जवळ असलेल्या आश्रमशाळा वसतीगृहावर जावून पात्र लाभार्थ्यांनी आपले खावटी अनुादन योजनेसाठी नाव नोंदणी करावे.

तसेच ज्या लाभार्थ्यांना उपरोक्त नमुद ठिकाणी जाणे शक्य होणार नाही, त्यांनी 9421425077, 9604803936 व 9822716714 या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्यांचा अर्ज व आवश्यक कागदपत्रे (आधारकार्ड, जातीचा दाखला, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक, पोस्टाचे बँक पासबूक यांचे झेरॉक्स प्रती) पाठवावे. यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी नाव नोंदणी केलेली आहे त्या लाभार्थ्यांनी पुन्हा नाव नोंदणी करू नये. अनुसूचित जमातीचे पात्र लाभार्थ्यांनी खावटी अनुदान योजनेसाठी नाव नोंदणी करून जास्तीत जास्त खावटी अनुदान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

तसेच यवतमाळ जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांनी यामध्ये सहभाग घेवून खावटी अनुदान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना नाव नोंदणी करण्यास योग्य सहकार्य करावे. जेणेकरून खावटी अनुदान योजनेपासून पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही व जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

Copyright ©