Breaking News यवतमाळ सामाजिक

*दिलासादायक : आठवडाभरात 7341 रुग्ण कोरोनामुक्त*. *महत्वाच्या ईतर घडामोडी सह*

 

 

48238 जणांचे अहवाल निगेटिव्ह

24 तासात 699 जण पॉझेटिव्ह, 882 बरे, 15 मृत्यु

यवतमाळ, दि. 16 : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणा-या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांच्या वर आहे. विशेष म्हणजे 10 मे पासून 16 मे पर्यंत संपूर्ण आठवड्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या प्रत्येक दिवशी जास्तच राहिली आहे. संपूर्ण आठवड्यात तब्बल 7341 जणांनी कोरोनावर मात केली असून 48238 जणांचे रिपोर्ट निगटिव्ह आले आहेत.

यात सोमवार दि. 10 मे रोजी 1010 जण कोरोनामुक्त आणि 5774 जणांचे अहवाल निगेटिव्ह, 11 मे रोजी 1127 बरे व 6160 जण निगेटिव्ह, 12 मे रोजी 1231 जण बरे व 7369 अहवाल निगेटिव्ह, 13 मे रोजी 1013 जण बरे व 7985 अहवाल निगेटिव्ह, 14 मे रोजी 1085 जण बरे 7793 अहवाल निगेटिव्ह, 15 मे रोजी 993 जण बरे व 5887 अहवाल निगेटिव्ह आणि रविवार दि. 16 मे रोजी 882 जण कोरोनामुक्त तर 7270 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

गत 24 तासात जिल्ह्यात जिल्ह्यात 699 जण पॉझेटिव्ह तर 882 जण कोरोनामुक्त झाले असून 15 जणांचा मृत्यु झाला. यात दोन मृत्यु जिल्ह्याबाहेरील (नांदेड आणि नागपूर) आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 9 मृत्यु, डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एक तर खाजगी रुग्णालयातील पाच मृत्यु आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 7969 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 699 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 7270 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4705 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2277 तर गृह विलगीकरणात 2428 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 67703 झाली आहे. 24 तासात 882 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 61378 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1620 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.73 , मृत्युदर 2.39 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 50 वर्षीय पुरुषा व 65 वर्षीय महिला, तालुक्यातील 25 वर्षीय पुरुष व 53 वर्षीय महिला, वणी येथील 45 वर्षीय महिला, राळेगाव तालुक्यातील 35 वर्षीय महिला, दिग्रस येथील 65 वर्षीय महिला, नेर तालुक्यातील 65 वर्षीय महिला आणि नांदेड येथील 75 वर्षीय पुरुष आहे. डीसीएचसीमध्ये मृत्यु झालेल्यामध्ये राळेगाव तालुक्यातील 81 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 75 वर्षीय पुरुष, कळंब येथील 65 वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 64 वर्षीय, वणी येथील 65 वर्षीय पुरुष आणि नागपूर येथील 65 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला.

रविवारी पॉझेटिव्ह आलेल्या 699 जणांमध्ये 418 पुरुष आणि 281 महिला आहेत. यात पांढरकवडा येथील 55 पॉझेटिव्ह रुग्ण, बाभुळगाव 18, यवतमाळ 60, आर्णि 42, दारव्हा 43, घाटंजी 28, पुसद 25, राळेगाव 20, झरीजामणी 73, कळंब 3, वणी 177, दिग्रस 38, महागाव 9, उमरखेड 24, नेर 36, मारेगाव 39 आणि इतर शहरातील 9 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 532041 नमुने पाठविले असून यापैकी 529179 प्राप्त तर 2862 अप्राप्त आहेत. तसेच 461476 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1106 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 32 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 1106 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 355 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 222 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 166 रुग्णांसाठी उपयोगात, 360 बेड शिल्लक आणि 32 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1141 बेडपैकी 617 उपयोगात तर 524 बेड शिल्लक आहेत.

__________________________

गर्दी नियंत्रणासाठी कलेक्टर, सीईओ आणि एसपी रस्त्यावर

वरिष्ठ अधिका-यांसह यंत्रणेचा शहरातून तीन तास फेरफटका

यवतमाळ, दि. 16 : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण वाढत असून पॉझेटिव्हीटी रेट कमी होत आहे. यात सातत्य राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. मात्र अजूनही काही नागरीक विनाकारण फिरत असून गर्दी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरातील गर्दी कमी करण्यासाठी तसेच निर्बंधाचे पालन योग्य प्रकारे होते की नाही, याची तपासणी करण्याकरीता जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ हे चक्क रस्त्यावर उतरले.

वरीष्ठ अधिका-यांसह संपूर्ण यंत्रणा यवतमाळ शहरातील एसबीआय चौकातून मेन लाईन, मारवाडी चौक, आठवडी बाजार व इतर बाजारपेठेच्या मार्गावर तब्बल तीन तास मार्गक्रमण करीत होते. यात शासन आणि प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे अत्यावश्यक सेवांचीच दुकाने दिलेल्या ठराविक वेळत सुरू आहे की नाही. कोणत्या दुकानासमोर अनावश्यक गर्दी तर नाही, दुकानदार तसेच ग्राहकांकडून सुचनांचे पालन होत की नाही, आदींची त्यांची पाहणी केली. तसेच काही किराणा दुकानदारांसोबत संवादही साधला.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, किराणा दुकानदारांनी ग्राहकांचे व्हॉट्सॲप / मोबाईल क्रमांक घेऊन घरपोच डिलीव्हरी देण्याचे नियोजन करावे. जेणकरून दुकानात गर्दी होणार नाही. तसेच विनाकारण दुचाकीवर फिरणारा वर्ग मोठ्या संख्येने आहे. त्यांच्यावर पोलिस विभागाने कारवाई करावी. नागरीक विनाकारण फिरत राहिले तर येणा-या संभाव्य लाटेसाठी आपणच जबाबदार राहू. यात मग लहान मुलांनाही संसर्ग होण्याचा धोका राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यकपणे फिरू नये. तसेच कोव्हीडच्या त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर, न.प. वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय अग्रवाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

__________________&&&______

वैद्यकीय महाविद्यालयात लहान मुले व म्युकरमायकोसीस

रुग्णांसाठी वेगळ्या वॉर्डचे नियोजन

जिल्हाधिका-यांनी केली ऑक्सीजन प्लाँट आणि सारी वॉडची पाहणी

यवतमाळ, दि. 16 : जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेता लहान मुलांच्या उपचारासाठी तसेच सद्यस्थितीत वेगाने वाढणा-या म्युकरमायकोसीस या आजाराच्या रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वेगळ्या वॉर्डचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाहणी करून दोन्ही वॉर्डचे त्वरीत नियोजन करावे, अशा सुचना दिल्या.

म्युकरमायकोसीस रुग्णांसाठी वॉर्ड क्रमांक 17 मध्ये 15 बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर लहान मुलांसाठीचा वॉर्ड हा 36 बेडचा राहणार आहे. एक महिन्याच्या आत लहान मुलांचा वॉर्ड तयार झाला पाहिजे. तसेच औषधी व इतर साधनसामुग्रीसाठी त्वरीत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. यावेळी त्यांनी सारीचे वॉर्ड क्रमांक 18, 19, 24, 25 ची पाहणी केली. तसेच वॉर्ड क्रमांक 15 मध्ये निर्माणाधीन नवीन पाईप लाईनची पाहणी करून अशीच पाईपलाईन वॉर्ड क्रमांक 16 मध्ये सुध्दा त्वरीत करावी करण्याचे निर्देश दिले.

पीसीए ऑक्सीजन प्लाँटची पाहणी करतांना जिल्हाधिकारी म्हणाले, लवकरात लवकर दोन्ही प्लाँट कार्यान्वित होणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकाम त्वरीत करा. तसेच येथे जनरेटर लावण्यात यावे. प्लाँट असलेल्या भागात पूर्ण इमारतीसाठी जनरेटर लावण्याचे नियोजन करता येईल का, याबाबतही विचारणा केली. लिक्विड ऑक्सीजन टँक त्वरीत फाऊंडेशनवर उभा करून पाईपचे कनेक्शन लवकर करा. 20 मे पर्यंत लिक्विड ऑक्सीजन प्लाँट कार्यान्वित करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. गिरीश जतकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र भुयार यांच्यासह ऑक्सीजन कमिटीचे सदस्य आदी उपस्थित होते.

 

म्युकरमायकोसीस आजाराची लक्षणे : कोव्हीडमुळे म्युकरमायकोसीस या आजाराचे प्रमाण वाढले असून प्रतिकारशक्ती कमी असणा-यांणा रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मधूमेह, एचआयव्ही आदी रोगांमुळे प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे कोव्हीड पश्चात हा रोग होऊ शकतो. म्युकरमायकोसीस हा एक प्रकारे फंगस असून नाकातून तो इतरत्र अतिशय जलद गतीने पसरतो. या रोगाची प्राथमिक लक्षणे नाकाच्या आजूबाजूला सूज येणे, ही सूज डोळयापर्यंत राहू शकते, नाकातून सतत पाणी वाहणे, नाकातील आतील भाग काळसर येणे अशी आहे. अशी लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करावा.

यावर उपचार करतांना जेवढा भाग खराब झाला आहे, तेवढा भाग काढणे आवश्यक असते. तसेच रुग्णांवर चांगली देखरेख ठेवून ॲन्टी फंगल औषध देणे उपयुक्त आहे. यवतमाळ जिल्ह्यात या रोगाचे रुग्ण आढळले नसले तरी सुध्दा भविष्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नाक, कान, घसा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुरेंद्र गवार्ले यांनी सांगितले.

 

____________________________

जिल्हाधिका-यांची दारव्हा, दिग्रस व पुसद येथे डीसीएचसी व सीसीसीला भेट

दारव्हा येथील दोन किराणा दुकानांवर कारवाई व दंड

यवतमाळ, दि. 16 : कोरोना परिस्थितीचा आढावा तसेच तालुका प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दारव्हा, दिग्रस व पुसद येथील डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर तसेच कोव्हीड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिका-यांसोबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ उपस्थित होते.

सर्वप्रथम जिल्हाधिका-यांनी दारव्हा येथील डीसीएचसी ला भेट देऊन पाहणी केली. तसेच शहरातील निधी मंगल कार्यालय व कविता मंगल कार्यालय या कोव्हीड केअर सेंटरला भेट दिली. वरील तिनही ठिकाणी भरती असलेल्या रुग्णांना बाहेरचे कोणी भेटायला येता कामा नये, याबाबत येथील प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशा सुचना केल्या. तसेच सीसीसी ची क्षमता किती, सद्यस्थितीत येथे किती रुग्ण भरती आहेत, नियमित स्वच्छता होते की नाही, याबाबत विचारणा केली.

यानंतर शहरातून फेरफटका मारत असतांना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन किराणा दुकानांवर जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. सदर दोन्ही दुकानांना प्रत्येकी 10 हजार रुपये याप्रमाणे 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी म्हणाले, कोव्हीड संदर्भात शासन आणि प्रशासनाने दिलेल्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा त्वरीत शोध घेऊन त्यांची तपासणी करा. तसेच बफर झोन आणि प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचे सुध्दा टेस्टिंग आणि ट्रेसिंग होणे गरजेचे आहे. तालुक्यात लसीकरणाची गती वाढवा. 45 वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोज प्राधान्याने देण्यावर भर द्यावा. संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता तालुक्यातील 7-8 मोठ्या गावात रुग्ण ठेवण्यासाठी जागांचा शोध घ्या. जेणेकरून वेळेवर अडचण येणार नाही, अशा सुचना त्यांनी दिल्या.

यावेळी त्यांनी तालुक्यात प्रतिबंधित क्षेत्र किती, ॲक्टीव्ह रुग्ण किती आदींबाबत विचारणा करून ‘जाणीव-जागृती-खबरदारी’ योजनेचासुध्दा आढावा घेतला. बैठकीला उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार सुभाष जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खानंदे, गटविकास अधिकारी राजू शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल, ठाणेदार बावीस्कर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिंदे, डॉ. कदम आदी उपस्थित होते.

यानंतर जिल्हाधिका-यांनी दिग्रस व पुसद येथे भेट देऊन उपजिल्हा रुग्णालय, कोव्हीड केअर सेंटर आणि आयुर्वेदिक कॉलेजला भेट दिली व तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतला.

_________________________

विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे यवतमाळ शहराचा पाणी पुरवठा बंद राहील

यवतमाळ, दि. 16 : यवतमाळ पाणी पुरवठा योजनेंतर्गत (देखभाल व दुरुस्ती) चापडोह एक्सप्रेस फिडरवर वादळामुळे झाडे तुटून पडल्याने फिडरवरील विद्युत पुरवठा 16 मे रोजी दुपारी 3.30 वाजतापासून बंद झाला आहे. परिणामी 33 केव्ही सबस्टेशन गोधनी रोड येथील पुर्णपणे बंद झाल्यामुळे निळोणा एक्सप्रेस फिडरचासुध्दा विद्युत पुरवठा बंद आहे. त्यामुळे यवतमाळ शहराचा पाणी पुरवठा बंद राहील.

विद्युत पुरवठा पूर्ववत होईपर्यंत चापडोह व निळोणा धरणावरून शहरास होणारा पाणी पुरवठा बंद राहील. सदर दिवशी शहरातील ज्या भागास पाणी देण्याचे नियोजन होते, ते विस्कळीत होऊन त्या भागातील नागरिकांना पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच दोन्ही ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर वितरण व्यवस्थेतील जलकुंभावरून पाण्याचे नियोजन करण्यात येईल व पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता राहूल जाधव यांनी कळविले आहे.

Copyright ©