Breaking News यवतमाळ राजकीय सामाजिक

*679 पॉझेटिव्ह, 1013 कोरोनामुक्त, 8 मृत्यु* *इतर महत्वाच्या घडामोडी सह*

24 तासात जिल्ह्यात बाधितांपेक्षा कोरोनामुक्तची संख्या 334 ने जास्त

 

बरे होण्याच्या प्रमाणात सतत वाढ

 

679 पॉझेटिव्ह, 1013 कोरोनामुक्त, 8 मृत्यु

 

यवतमाळ, दि. 13 : जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून कोरोनामुक्त होणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणा-यांची संख्या 334 ने जास्त आहे. जिल्ह्यात 679 जण पॉझेटिव्ह आले असून 1013 जण कोरोनामुक्त झाले. तसेच आठ मृत्युची नोंद आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाच, डेडीकेटेड कोव्हीड सेंटरमध्ये एक आणि खाजगी रुग्णालयातील दोन मृत्यु आहे.

 

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 8664 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 679 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 7985 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5822 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2472 तर गृह विलगीकरणात 3350 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 65817 झाली आहे. 24 तासात 1013 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 58418 आहे. जिल्ह्यात एकूण 1577 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.92, मृत्युदर 2.40 आहे.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 13 मे च्या मध्यरात्रीपर्यंत मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 61 वर्षीय महिला, कळंब येथील 35 वर्षीय महिला, मडकोना येथील 54 वर्षीय पुरुष, हिरडी कळंब येथील 50 वर्षीय पुरुष आणि लाडखेड येथील 65 वर्षीय महिला आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यामध्ये दारव्हा येथील 65 वर्षीय पुरुष तर खाजगी रुग्णालयांत मृत्यु झालेल्यांमध्ये दिग्रस येथील 60 वर्षीय महिला आणि पुसद येथील 65 वर्षीय पुरुष आहे.

 

गुरुवारी पॉझेटिव्ह आलेल्या 679 जणांमध्ये 414 पुरुष आणि 265 महिला आहेत. यात वणी येथील 117 पॉझेटिव्ह रुग्ण, बाभुळगाव 76, यवतमाळ 66, दारव्हा 57, पांढरकवडा 51, पुसद 50, घाटंजी 43, दिग्रस 40, झरीजामणी 38, कळंब 36, नेर 35, आर्णि 25 महागाव 18, मारेगाव 14, उमरखेड 4, राळेगाव 2 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 509354 नमुने पाठविले असून यापैकी 506342 प्राप्त तर 3012 अप्राप्त आहेत. तसेच 440525 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 936 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सात डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 30 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 936 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 412 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 165 बेड शिल्लक, नऊ डीसीएचसीमध्ये एकूण 506 बेडपैकी 156 रुग्णांसाठी उपयोगात, 350 बेड शिल्लक आणि 30 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1099 बेडपैकी 678 उपयोगात तर 421 बेड शिल्लक आहेत.

 

लसीकरण : जिल्ह्यात आतापर्यंत 338788 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यात कोव्हीशिल्ड लस घेणारे 293151 जण तर कोव्हॅक्सीन लस घेणारे 45637 जणांचा समावेश आहे. तसेच बुधवारी जिल्ह्यात 5458 जणांना लस देण्यात आली.

 

_______________________

 

जिल्ह्यात मुबलक लस उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करणार

 

– पालकमंत्री संदिपान भुमरे

 

जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हीडचा आढावा

 

गुगल मिटद्वारे जि.प.अध्यक्षा, खासदार, आमदार व नगराध्यक्षा उपस्थित

 

यवतमाळ, दि. 13 : शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सध्या 18 ते 44 वयोगटातील लसीकरण थांबविण्यात आले असून 45 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्याने दुसरा डोज देण्यात येणार आहे. जिल्ह्यात दुस-या डोजसाठी जास्तीत जास्त लस उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्ह्यात लस उपलब्ध करणे, हे आपले प्राधान्य आहे, असे राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘गुगल मीट’ द्वारे कोव्हीडचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी बैठकीला ऑनलाईन पध्दतीने जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार, खासदार बाळू धानोरकर, विधान परिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा, आमदार सर्वश्री मदन येरावार, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, नामदेव ससाणे, शेतकरी स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी तर मंचावर जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ उपस्थित होते.

 

ग्रामीण भागात अगदी प्राथमिक आरोग्य स्तरावरसुध्दा आयसोलेशन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असे सांगून पालकमंत्री श्री. भुमरे म्हणाले, संभाव्य परिस्थती लक्षात घेता लहान मुलांच्या बाबतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि स्त्री रुग्णालयात नियोजन करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 16 नवीन रुग्णवाहिका घेण्याला मंजूरी देण्यात आली असून भविष्यातही 20 नवीन रुग्णवाहिका घेतल्या जातील. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड सेंटर, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आदी ठिकाणी पाणी तसेच स्वच्छतेची व्यवस्था प्राधान्याने करावी. कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला डीसीएचसी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच उपचाराची निश्चित पध्दती काय असावी, यासाठी क्लिनीकल एक्सलन्स कार्यक्रम खालच्या स्तरावर राबविण्यासाठी डॉक्टरांचे वेबीनार घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी जिल्हाधिका-यांनी सादरीकरणात जिल्ह्यात बेडची व्यवस्था, उपलब्ध ऑक्सीजन साठा, पीएसए प्लाँट, रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्धता आदींबाबत माहिती दिली. यावेळी लोकप्रतिनिधींनीसुध्दा कोव्हीड उपाययोजनेसंदर्भात विविध सुचना केल्या.

 

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबेळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्यासह इतर डॉक्टर्स व अधिकारी उपस्थित होते.

 

_______________________

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिस गस्ती वाहनांचे हस्तांतरण

 

महाराष्ट्र इमरजंन्सी रिस्पॉन्स सिस्टीम अंतर्गत ‘डायल 112’ उपक्रम

 

पोलिस विभागासाठी नव्याने 54 जीप आणि 95 दुचाकी प्राप्त

 

यवतमाळ, दि. 13 : आपात्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना त्वरीत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र इमरजंन्सी रिस्पॉन्स सिस्टीम अंतर्गत ‘डायल 112’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात पोलिस गस्तीकरीता 54 जीप व 95 दुचाकी नव्याने प्राप्त झाल्या असून पोलिस विभागाला त्याचे हस्तांतरण राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिप भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

पोलिस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार संजय राठोड, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आदी उपस्थित होते.

 

यावेळी पालकमंत्री श्री. भुमरे यांनी नवीन जीपचे विधीवत पूजन व हिरवी झेंडी दाखवून सदर जीप पोलिस विभागाकडे हस्तांतरीत केल्या. तत्पूर्वी प्रास्ताविकात जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणाले, यापूर्वी पोलिसांच्या मदतीसाठी, अग्निशमन सेवेसाठी तसेच रुग्णवाहिकेसाठी विशिष्ठ क्रमांक आहे. त्याच धर्तीवर आता आपात्कालीन मदतीसाठी ‘डायल 112’ हा क्रमांक उपलब्ध झाला आहे. या क्रमांकावर कोणत्याही नागरिकाने मदतीसाठी कॉल केला तर कोणत्या जिल्ह्यातून फोन आला, याची माहिती राज्याच्या नियंत्रण कक्षाला मिळेल. त्यानुसार सदर संदेश संबंधित जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाला कळविण्यात आल्यावर फोन करणा-या नागरिकाला तात्काळ मदत उपलब्ध करून येईल.

 

जिल्ह्याला नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत 54 जीम व 95 दुचाकी साठी 6 कोटी 44 लक्ष रुपये जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आला आहे. सदर वाहने उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, सर्व पोलिस ठाणे आदी ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाचे संचालन अशोक कोठारी यांनी केले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. खांडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार प्रदीप परदेशी, अवधुतवाडी ठाण्याचे ठाणेदार केदारे, राखीव पोलिस निरीक्षक अरविंद दुबे आदी उपस्थित होते.

 

_______________________

 

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या

 

बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स

 

चुकीच्या संदेशांना बळी न पडण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

 

यवतमाळ, दि. 13 : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) निर्माण करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी या टास्क फोर्सचे अध्यक्ष असून महिला व बालविकास अधिकारी हे सदस्य सचिव तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

 

सद्यस्थितीत कोरोना विषाणुचा वाढलेला संसर्ग, बाधित व्यक्तिंचे व मृत्युचे वाढलेले प्रमाण विचारात घेता त्याचा बालकांच्या जीवनावरसुध्दा गंभीर परिणाम होत आहे. त्यातच काही प्रसंगी कोव्हीडमुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या बालकांची काळजी घेण्यारे कोणीही नसल्यामुळे ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने देखील जिल्हा स्तरावर टास्क फोर्स गठीत करण्याचे निर्देश दिले आहे.

 

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या टास्क फोर्समध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य म्हणून आहेत. यात जिल्हाधिकारी हे प्रमुख म्हणून टास्क फोर्सच्या कामकाजावर संपूर्ण नियंत्रण ठेवतील. तसेच कोव्हीडमुळे दोन्ही पालक गमाविलेल्या तपशीलवार माहिती समन्वयकांना उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितास निर्देश देणे, याव्यतिरिक्त दर पंधरा दिवसातून एकदा टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येईल.

 

टास्क फोर्सच्या कार्यप्रणालीमध्ये चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 चा माहितीफलक कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावणे, अनाथ, निराश्रीत बालकांना समुपदेशन व मदत करणे, बालकांच्या दत्तक विधानाबाबत समाजमाध्यमांमध्ये चुकीचे संदेश पसरविणा-यांवर कारवाई करणे, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कार्यक्षेत्रात कार्यरत असणा-या बालगृहे / निरीक्षण गृहाकरीता स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करणे आदींचा समावेश आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू यांनी कळविले आहे.

 

 

 

बालकांच्या बाबतीत समाज माध्यमावरील चुकीच्या संदेशांना बळी पडू नका : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची मोठी सामाजिक समस्या निर्माण होत आहे. अशा बालकांना मदत करण्यासंदर्भात समाज माध्यमांद्वारे अनेक चुकीचे संदेश / गैरसमज पसरविल्या जात आहे. मात्र अशा संदेशांना कुणीही बळी पडू नये. तसेच याबाबत कोणतीही माहिती आवश्यक असल्यास चाईल्ड लाईन क्रमांक 1098 किंवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Copyright ©