Breaking News यवतमाळ सामाजिक

*24 तासात 7349 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह* *1330 जण पॉझेटिव्ह,* *950 कोरोनामुक्त जिल्ह्याबाहेरील चार मृत्युसह 23 मृत्यु*. *ईतर घडामोडी सह पुर्ण बातमी पहा*

रुग्णवाढ संख्या लक्षात घेता अतिरिक्त बेडचे नियोजन करा

– जिल्हाधिकारी येडगे

झरीजामणी व वणी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व सीसीसी ला भेट

यवतमाळ, दि. 7 : जिल्ह्यात शहरी भागासोबतच तालुक्यातसुध्दा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा त्वरीत शोध घेऊन त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच लक्षणे असलेल्या नागरिकांपासून इतरांना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यांना ग्रामीण रुग्णालय, डीसीएचसी, सीसीसी ला त्वरीत भरती करण्यासाठी अतिरिक्त बेडचे नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

झरी तालुक्यातील पाटण येथील कोव्हीड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालय येथे भेट देऊन जिल्हाधिका-यांनी तालुकास्तरीय समितीची बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गेडाम, प्रभारी तहसीलदार श्री. खिरेवार, न.प. मुख्याधिकारी राम गुंडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, कोव्हीड बाबतच्या प्रतिबंधक सुचनांची कडक अंमलबजावणी करा. नगर पंचायत इमारतीमधील सीसीसीमध्ये अतिरिक्त बेड वाढवा. पाटण येथे 50 ऑक्सीजन बेड व झरी येथील ग्रामीण रुग्णालयात 15 ऑक्सीजन बेड तयार करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करा. तालुक्यातील गावांमध्ये ग्रामस्तरीय समित्या सक्रीय करून टेस्टिंग वाढविणे, मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आदी सुचना त्यांनी दिल्या.

वणी तालुक्यात जिल्हाधिका-यांची भेट : जिल्हाधिका-यांनी वणी तालुक्यातील कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व लसीकरण केंद्र, शहरातील डीसीएचसी आणि सीसीसी ला भेट दिल्यानंतर तालुकास्तरीय समितीची आढावा बैठक घेतली. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, तालुक्यातून रोज किमान एक हजार तपासण्या होणे आवश्यक आहे. नागरिकांनी अंगावर दुखणे काढू नये, याबाबत जनजागृती करा. डीसीएचसीमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे. कोणताही रुग्ण परत जाता कामा नये, आवश्यकतेनुसार त्यांना भरती करून घ्या. तसेच मोबाईल टीमच्या माध्यमातून टेस्टिंग वाढवा.

वणी येथील डीसीएचसीमध्ये आता 30 ऑक्सीजन बेड वाढविल्यामुळे ऑक्सीजन बेडची एकूण क्षमता 53 झाली आहे. तसेच येथील सीसीसी मध्ये 70 बेडची क्षमता वाढवून 200 पर्यंत करा. याशिवाय वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता तात्पुरत्या आयसोलेशन सेंटरसाठी जागा शोधा. गृहविलगीकरणातील रुग्ण बाहेर फिरणार नाही, यासाठी तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समित्या दक्ष असल्या पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जवळे, तहसीलदार विवेक पांडे, गटविकास अधिकारी राजेश गायनार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास कांबळे आदी उपस्थित होते.

_________&________&___

24 तासात 7349 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

1330 जण पॉझेटिव्ह, 950 कोरोनामुक्त

  • “जिल्ह्याबाहेरील चार मृत्युसह 23 मृत्यु

यवतमाळ, दि. 7 : जिल्ह्यात गत 24 तासात 7349 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 1330 पॉझेटिव्ह आणि 950 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील चार मृत्युसह शुक्रवारी एकूण 23 झाले. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 11, खाजगी कोव्हीड रुग्णालयात नऊ आणि डीसीएचसीमधील तीन मृत्युंचा समावेश आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 8679 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1330 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 7349 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7294 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2674 तर गृह विलगीकरणात 4620 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 60964 झाली आहे. 24 तासात 950 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 52232 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1438 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.15 , मृत्युदर 2.36 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 59 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला, नेर तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 70 वर्षीय महिला, वणी तालुक्यातील 38 वर्षीय पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष व 61 वर्षीय महिला, घाटंजी तालुक्यातील 50 व 58 वर्षीय महिला, नागपूर येथील 50 वर्षीय पुरुष आणि चंद्रपूर येथील 35 वर्षीय महिला आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यांमध्ये झरीजामणी तालुक्यातील 70 वर्षीय महिला, पांढरकवडा तालुक्यातील 65 वर्षीय महिला आणि दारव्हा तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयांत मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 58, 42, 61 वर्षीय पुरुष व 75 वर्षीय महिला, मारेगाव येथील 70 वर्षीय महिला, पुसद येथील 65 वर्षीय पुरुष, महागाव येथील 50 वर्षीय पुरुष, आंध्रप्रदेश येथील 53 वर्षीय महिला आणि वर्धा येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1330 जणांमध्ये 828 पुरुष आणि 502 महिला आहेत. यात पुसद येथील 214 पॉझेटिव्ह रुग्ण, वणी 198, दिग्रस 145, यवतमाळ 120, मारेगाव 112, दारव्हा 110, बाभुळगाव 78, नेर 76, उमरखेड 62, पांढरकवडा 52, आर्णि 44, राळेगाव 26, महागाव 25, घाटंजी 20, कळंब 16, झरीजामणी 12 आणि इतर शहरातील 20 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 463623 नमुने पाठविले असून यापैकी 461007 प्राप्त तर 2616 अप्राप्त आहेत. तसेच 400043 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

जिल्ह्याला 50 ऑक्सीजन काँन्सट्रेटर आणि पाच बायपॅप मशीनचा पुरवठा : पुणे येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज ॲन्ड ॲग्रीकल्चर या संस्थेकडून जिल्ह्याची गरज लक्षात घेता 50 ऑक्सीजन काँन्सट्रेटर मशीन आणि पाच बायपॅप मशीनचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत सदर सामुग्री देण्यात आली. कोरोना महामारीचा सामना करतांना जिल्ह्याच्या उपयोगासाठी सदर सामुग्री देण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुधीर मेहता आणि महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

तर कोरोना संकटाच्या काळात जिल्ह्याला उपयुक्त मदत केल्याबद्दल जिल्हाधिका-यांनी सदर संस्थेचे आभार मानले आहे.

 

  • _______&_______&______

जिल्ह्यात आठ केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण

उमरखेड, वणी, राळेगाव मध्ये लसीकरण केंद्र सुरू

आतापर्यंत 2758 जणांनी घेतली लस

यवतमाळ, दि. 7 : जिल्ह्यात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरवातीला जिल्ह्यातील पाच केंद्रावर लसीकरणाची सोय उपलब्ध होती. यात नव्याने तीन केंद्राची भर पडली जिल्ह्यात आता आठ केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस घेता येईल.

नव्याने सुरू करण्यात आलेल्या केंद्रामध्ये उमरखेड, वणी आणि राळेगाव येथील केंद्राचा समावेश आहे. गुरुवार सांयकाळपर्यंत एकूण 2758 जणांनी लस घेतली आहे. यात पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात 290 जणांनी, दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात 377 जण, पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात 332 जण, लोहारा येथील केंद्रावर 373, पाटीपुरा येथील केंद्रावर 377, उमरखेड येथे 374, वणी येथे 310 आणि राळेगाव येथे 325 जणांनी लस घेतली. 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्वरीत नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 628 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सहा डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 29 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 628 बेड उपलब्ध आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 471 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 106 बेड शिल्लक, सहा डीसीएचसीमध्ये एकूण 360 बेडपैकी 178 रुग्णांसाठी उपयोगात, 182 बेड शिल्लक आणि 29 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1044 बेडपैकी 704 उपयोगात तर 340 बेड शिल्लक आहेत. तसेच जिल्ह्यातील 36 कोव्हीड केअर सेंटरमध्ये 2913 बेडपैकी 1425 उपयोगात आणि 1488 बेड शिल्लक आहेत.

____________________

 

कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

यवतमाळ, दि. 7 : कोविड – 19 विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्याकरीता संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कामगारांच्या तक्रारी तसेच आंतरराज्यीय स्थलांतरीत कामगारांच्या समस्या निराकरण करण्याकरीता मदत कक्ष व तक्रार निवारण करण्याकरीता सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या कार्यालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 07232-243447 व मेल आयडी gloytlms@gmail.com यावर स्थलांतरीत कामगारांच्या समस्या निराकरण तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे सरकारी कामगार अधिकारी चां.ब.काशिद यांनी कळविले आहे.

_________&_____&__

कौशल्य विकास विभागातर्फे 10 मे रोजी ऑनलाईन वेबीनार

यवतमाळ, दि. 7 : राज्यामध्ये असलेला कोविड – 19 चा प्रादुर्भाव बघता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने ऑनलाईन रोजगार मेळावे, ऑनलाईन वेबीनार तसेच समुपदेशन चर्चा सत्राचे दर महिन्याला आयोजन करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

त्या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदशन केंद्र कार्यालयामार्फत 10 मे 2021 रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाईन वेबीनारचे आयेाजन करण्यात येणार आहे. सदर वेबीनारमध्ये राळेगाव येथील यशस्वी उद्योजक विशाल धनकसार हे जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना शेळीपालन स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ह्या मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्यासाठी https;//meet.google.com/rcu-gudy-rwr ही लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली असून सदर वेबीनारचा लाभ घेण्याकरीता उमेदवारांना ॲन्ड्रॉईड मोबाईलमध्ये गुगलमिट ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे.

त्याबाबत काही अडचणी असल्यास या कार्यालयाचे 07232-244395 ह्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. सदर मार्गदर्शन सत्राचा लाभ जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी घेणेबाबतचे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

Copyright ©