Breaking News यवतमाळ सामाजिक

24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या जास्त 5767 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 919 जण पॉझेटिव्ह, 983 कोरोनामुक्त, मृत्यु 16

अतिरिक्त बील आकारणी : रुग्णांना पैसे परत करण्याचे आदेश

पाच खाजगी कोव्हीड रुग्णालयांचा समावेश

यवतमाळ, दि. 6 : कोरोनाच्या काळात जिल्ह्यात खाजगी डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान रुग्णांकडून अतिरिक्त बील आकारणी केल्याप्रकरणी सदर रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाने आदेश बजावले आहे. यात शहरातील उजवणे हॉस्पीटल, राठोड हॉस्पीटल, शहा हॉस्पीटल, साईश्रध्दा हॉस्पीटल आणि धवणे हॉस्पीटल या पाच रुग्णालयांचा समावेश आहे. रुग्णांकडून वसुल करण्यात आलेली अतिरिक्त रक्कम त्वरीत संबंधित रुग्णांच्या खात्यात जमा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे.

जिल्ह्यातील खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांकडून मनमानी बील घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या रुग्णालयात ऑडीटर नियुक्त केले. ऑडीटर यांनी बिलांच्या तपासण्या करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार प्रशासनाने अतिरिक्त बिलांबाबत संबंधित रुग्णालयांना 48 तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. मात्र संबंधित रुग्णालयाचे खुलासे समाधानकारक नसल्यामुळे शहरातील पाच खाजगी रुग्णालयांना अतिरिक्त आकारणीचे पैसे परत करण्याचे आदेश देण्यात आले.

यात यवतमाळ शहरातील उजवणे हॉस्पीटलमध्ये वेगवेगळ्या सात रुग्णांकडून अनुक्रमे 4 हजार रुपये, 4500 रुपये, 9 हजार रुपये, 21 हजार 500 रुपये, 14 हजार 700 रुपये, 9 हजार रुपये आणि 18 हजार रुपये असे एकूण 81 हजार 700 रुपये अतिरिक्त आकारण्यात आले होते. तसेच राठोड हॉस्पीटलमध्ये चार वेगवेगळ्या रुग्णांकडून अनुक्रमे 600 रुपये, 5 हजार रुपये, 6 हजार, 7 हजार असे 18 हजार 600 रुपये, शहा हॉस्पीटलमध्ये पाच रुग्णांकडून अनुक्रमे 1200 रुपये, 1200 रुपये, 6200 रुपये, 5 हजार रुपये, 3 हजार रुपये असे 16 हजार 600 रुपये, साईश्रध्दा हॉस्पीटलमध्ये सात रुग्णांकडून अनुक्रमे 8100 रुपये, 9200 रुपये, 4600 रुपये, 4600 रुपये, 8100 रुपये, 8700 रुपये, 4100 रुपये असे 47900 रुपये तर धवणे हॉस्पीटलमध्ये एका रुग्णाकडून 26 हजार रुपये अतिरिक्त स्वरुपात आकारण्यात आले होते.

या पाचही रुग्णालयात एकूण 24 रुग्णांकडून 1 लक्ष 90 हजार 800 रुपये अतिरिक्त घेतल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक रुग्णांकडून घेण्यात आलेली बिलाची अतिरिक्त रक्कम संबंधित रुग्णांच्या खात्यात जमा करावी. या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आत करण्यात यावी. रुग्णालयांकडून विहित कालावधीत अंमलबजावणी झाली नाही तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यामधील कलम 51 (ख) चे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाकडून पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच रुग्णालयांनी सात दिवसात रक्कम परत न केल्यास सात दिवसानंतर आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत प्रतिदिवस एक हजार रुपये याप्रमाणे दंडाची रक्कम आकारण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

 

 

यवतमाळ, दि. 6 : बुधवारी जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 50 हजारांच्या पार गेल्यानंतर आज (दि.6) सुध्दा कोरोनाबाधितांपेक्षा जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गत 24 तासात 919 जण पॉझेटिव्ह तर 983 जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात एकूण 16 मृत्युची नोंद झाली.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 6686 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 919 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5767 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तसेच गत 24 तासात जिल्ह्यात 983 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 6937 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2804 तर गृह विलगीकरणात 4133 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 59634 झाली आहे. 24 तासात 983 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 51282 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1415 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.10 , मृत्युदर 2.37 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 68, 79 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 48, 65 वर्षीय पुरुष, वणी येथील 65 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील 75 वर्षीय महिला, आर्णि येथील 60 वर्षीय महिला, महागाव येथील 70 वर्षीय महिला, मारेगाव तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष आणि दिग्रस तालुक्यातील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यांमध्ये पांढरकवडा येथील 85 वर्षीय महिला आणि वणी येथील 65 वर्षीय महिला आहे. तर खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 85 वर्षीय पुरुष, वणी येथील 31 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 75 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.

गुरुवारी पॉझेटिव्ह आलेल्या 919 जणांमध्ये 557 पुरुष आणि 362 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 185 पॉझेटिव्ह रुग्ण, वणी 134, दारव्हा 101, उमरखेड 84, पांढरकवडा 60, घाटंजी 55, दिग्रस 53, नेर 41, पुसद 33, आर्णि 30, महागाव 30, बाभुळगाव 26, झरीजामणी 26, राळेगाव 22, मारेगाव 18, कळंब 16 आणि इतर शहरातील 5 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 455321 नमुने पाठविले असून यापैकी 452328 प्राप्त तर 2993 अप्राप्त आहेत. तसेच 392694 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 515 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 62 बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील सहा डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 360 बेडपैकी 181 रुग्णांसाठी उपयोगात, 179 बेड शिल्लक, जिल्ह्यातील 36 कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 2873 बेडपैकी 1480 उपयोगात, 1393 शिल्लक आणि 29 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1044 बेडपैकी 720 उपयोगात तर 324 बेड शिल्लक आहेत.

______________________

जिल्हाधिका-यांची घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालय व सीसीसीला भेट

झरीजामणी, वणीचा ही आढावा

यवतमाळ, दि. 6 : तालुकास्तरावर स्थानिक प्रशासनाने केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घाटंजी, झरीजामणी आणि वणी येथे भेट देऊन पाहणी केली. सर्वप्रथम त्यांनी घाटंजी येथे भेट देवून तालूक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी आमदार इंद्रनील नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, तहसीलदार पुजा माटोडे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, न.प. मुख्याधिकारी अमोल माळकर, तालूका आरोग्य अधिकारी डॉ. धर्मेश चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक डॉ. कुंभारे पोलीस निरीक्षक श्री. कराळे आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम तहसील कार्यालयात तालूकास्तरीय कोरोना नियंत्रण समितीचा आढावा घेऊन जिल्हाधिका-यांनी घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालय व कोविड केअर सेंटरला भेट देवून उपलब्ध सुविधांची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, कोतवाल तसेच गावचे सरपंच आणि इतर लोकप्रतिनिधींनी गावक-यांना तपासणीबाबत जागृत करणे आवश्यक आहे. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जाणा-या नागरिकांना तपासणीकरीता प्रवृत्त करा. आपापल्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्तरीय समित्या सक्रीय करा. मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी लवकर तपासणी तसेच लवकर उपचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुकास्तरीय तसेच ग्रामस्तरीय समित्यांनी टेस्टिंग वाढवावी. विनाकारण बाहेर फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले.

नागरी भागात प्रभागस्तरीय व ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समित्यांमार्फत ‘जाणीव – जागृती – जबाबदारी’ ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी. येथील ग्रामीण रुग्णालयात त्वरीत 20 ऑक्सीजन बेडचे नियोजन करा. तसेच नविन कोविड केअर सेंटर आवश्यकतेनुसार सुरू करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. येथे किती पात्र लोकांचे लसीकरण करण्यात आले, आदींबाबत त्यांनी माहिती घेतली व अडीअडचणी जाणून घेतल्या.

ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांनी

विजयी झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 6 : माहे जानेवारी 2021 मध्ये पार पाडलेल्या सार्वजनिक ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांना उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जात वैधता प्रमाणपत्रे विहीत मुदतीत निर्गमित करणे समितीस बंधनकारक आहे. त्यामुळे राखीव जागेवर निवडून आलेल्या विजयी उमेदवारांनी, प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याकरीता जात पडताळणी समिती कार्यालयाकडे, निवडून आल्याचे प्रमाणपत्र व या समितीकडे अर्ज सादर केलेल्या पावतीची छायांकित प्रत 31 मे 2021 पर्यंत कार्यालयाच्या पत्यावर पोस्टाने किंवा cvc.yavatmal@gmail.com या ई-मेलवर पाठवावी.

प्रत्यक्ष या कार्यालयात सदर कागदपत्रे आणून देऊ नये. जेणेकरून प्रस्तुत प्रकरणात विहीत मुदतीच्या आत निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र देणे सोयीचे होईल. तसेच या पूर्वी ज्या उमेदवारांनी या समितीकडे निवडून आल्याचे प्रमाणपत्र व पावती दिलेली आहे त्यांनी या कार्यालयात पुनश्च: देऊ नये.

समितीकडे प्राप्त झालेल्या निवडणूक प्रकरणात समितीने निर्णय घेतला आहे. तसेच सदर त्रुटी ही संबंधीत अर्जदाराच्या अर्जात नमुद ई-मेलवर व भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात आलेली आहे. सदर आक्षेपाची पुर्तता ही https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पुर्तता करावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी आदेशित केल्यानुसार अभ्यांगतांना शासकीय कार्यालयास प्रवेशास बंदी अहे. त्यामुळे कृपया या कार्यालयात येऊ नये, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.

शिष्यवृत्ती / फ्रीशिप योजनेचे अर्ज 31 मे पूर्वी सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 6 : समाजकल्याण कार्यालयामार्फत देण्यात येणारी अनु.जाती, इमाव, विजाभज, विमाप्र, मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रीशिप संबंधीत सर्व योजनाचे कामकाज हे माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने तयार करण्यात आलेल्या https://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर करण्यात येते. लाभार्थ्यांच्या आधार क्रमाकांची बँक खात्याशी संलग्न करून सन 2020-21 चे परीपूर्ण भरलेले अर्ज दिनांक 31 मे 2021 पूर्वी सादर करण्यात यावेत.

विद्यार्थी सदर लाभापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील. तसेच पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क घेता येणार नाही, याची नोंद घ्यावी. संबंधित विद्यार्थ्यांनीसुध्दा अर्जाची नोंदणी करून अर्ज महाविद्यालयास सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.

__________________

गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 6 : भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय यांच्या निर्णयानुसार गुणवंत खेळाडूकरीता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे, सक्रीय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही एक महत्वाची योजना आहे. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे.

सदर योजनेसाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवाशी असावा व त्याने ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त, गुणवंत खेळाडूस तक्त्यात नमूद केल्यानुसार मासिक मानधन देण्याची तरतुद केली आहे.

ऑलिम्पिक / पॅरा ऑलिम्पिक गेम्समध्ये प्राविण्यधारक खेळाडूंना दरमहा मानधन 20 हजार रूपये, सुवर्ण पदक विश्वचषक / विश्व अजिंक्यपद स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) 16 हजार रुपये, रौप्य व कास्य पदक विश्वचषक स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) 14 हजार रूपये, सुवर्ण पदक – कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स 14 हजार रूपये, रौप्य व कास्य पदक – कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स 12 हजार रुपये मानधन देण्यात येईल.

दर चार वर्षानी आयोजित हेाणाऱ्या विश्वचषक, विश्व अजिंक्यपद स्पर्धाकरीता सदरची योजना लागू राहील. याबाबत संबंधीत पात्र खेळाडूंनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा असून विहीत नमुन्यातील अर्जावर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळ संघटनेचे अध्यक्ष / सचिव यांची स्वाक्षरी किंवा उपसचिव / आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांचे स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करावयाचा आहे.

याबाबत अधिक महिती खालील लिंकवर उपलब्ध आहे. https://www.yas.nic.in/sports/scheme-sports-fund-pension-meritorious-sportspersons राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे क्रीडा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

Copyright ©