Breaking News यवतमाळ सामाजिक

जिल्ह्यात आतापर्यंत 50 हजारांच्यावर कोरोनामुक्त बरे होण्याचे प्रमाण 85.66 टक्के 24 तासात 1239 जण पॉझेटिव्ह, 991 कोरोनामुक्त, मृत्यु 26

 

यवतमाळ, दि. 5 : एकीकडे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी बरे होणा-या रुग्णांचे प्रमाणसुध्दा लक्षणीय आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 58715 जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. विशेष म्हणजे यातून तब्बल 50299 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. बरे होण्याची ही टक्केवारी जिल्ह्यात 88.66 आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 7300 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1239 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6061 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तसेच गत 24 तासात जिल्ह्यात 991 जण कोरोनामुक्त झाले असून एकूण 26 मृत्यु झाले. यात इतर जिल्ह्यातील एका मृत्युचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 17 मृत्यु, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये दोन आणि खाजगी रुग्णालयात सात मृत्यु झाले आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 7017 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2589 तर गृह विलगीकरणात 4428 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 58715 झाली आहे. 24 तासात 991 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 50299 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1399 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.07 , मृत्युदर 2.38 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 38, 17 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 55 वर्षीय महिला, मारेगाव येथील 56 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 60, 61 वर्षीय पुरुष, बाभुळगाव येथील 84 वर्षीय महिला, उमरखेड येथील 70 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 60 वर्षीय महिला, दिग्रस येथील 55 वर्षीय महिला, तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 67 वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील 57 वर्षीय पुरुष, झरी तालुक्यातील 51 वर्षीय पुरुष, राळेगाव तालुक्यातील 54 वर्षीय महिला आणि वाशिम जिल्ह्यातील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यांमध्ये राळेगाव येथील 76 वर्षीय पुरुष व पुसद येथील 56 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 65 वर्षीय पुरुष, मारेगाव येथील 75 वर्षीय महिला, वणी येथील 60 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 76 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 67 वर्षीय पुरुष, महागाव येथील 65 वर्षीय पुरुष आणि आर्णि येथील 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.

बुधवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1239 जणांमध्ये 745 पुरुष आणि 494 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 207 पॉझेटिव्ह रुग्ण, दिग्रस 200, वणी 193, पांढरकवडा 147, दारव्हा 73, मारेगाव 65, नेर 64, पुसद 64, उमरखेड 48, महागाव 45, घाटंजी 42, कळंब 39, आर्णि 19, झरीजामणी 14, बाभुळगाव 7, राळेगाव 6 आणि इतर शहरातील 6 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 449076 नमुने पाठविले असून यापैकी 445641 प्राप्त तर 3435 अप्राप्त आहेत. तसेच 386926 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 575 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 2 बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील सहा डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 360 बेडपैकी 191 रुग्णांसाठी उपयोगात, 169 बेड शिल्लक, जिल्ह्यातील 34 कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 2723 बेडपैकी 1245 उपयोगात, 1478 शिल्लक आणि 28 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1044 बेडपैकी 701 उपयोगात तर 343 बेड शिल्लक आहेत.

18 ते 44 वयोगटातील 1850 जणांचे लसीकरण : जिल्ह्यात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून मंगळवारपर्यंत एकूण 1850 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात यवतमाळ शहरातील पाटीपुरा येथील केंद्रावर 375 जणांचे लसीकरण, लोहारा येथील केंद्रावर 357, पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात 367, दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात 375 आणि पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात 376 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

 

उद्दिष्टापैकी 60 टक्के पीक कर्जवाटप मे अखेरपर्यंत करा

जिल्हाधिका-यांनी घेतला पीक कर्जवाटपाचा आढावा

 

 

यवतमाळ, दि. 5 : खरीप हंगामात शेतक-यांना पीक कर्जवाटप हा महत्वाचा विषय आहे. कोरोनाची परिस्थिती असली तरी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच शासनाच्या नियमांचे पालन करून शेतक-यांना कर्जवाटपासाठी बँकांनी उत्साहपूर्वक काम करावे. सध्या कर्जवाटपाची गती जेमतेम आहे. ही गती वाढवून मे महिन्याच्या अखेपर्यंत सर्व बँकांनी 60 टक्के पीक वाटपाचे उद्दिष्ट साध्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बँकर्सच्या बैठकीत पीक कर्जवाटपाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) रमेश कटके, स्टेट बँक ऑफ इंडियाचे गिरीष कोनेर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपसरव्यवस्थापक आर. आर. सिध्दीकी आदी उपस्थित होते.

गत आर्थिक वर्षाची बँकांची सर्व प्रलंबित कामे संपत आली आहे. त्यामुळे आता पीक कर्जवाटपाची गती वाढविणे आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, जिल्ह्यात सद्यस्थितीत 15 टक्के पीक कर्जवाटप झाले आहे. जून अखेरपर्यंत संपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मे अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत 60 टक्के कर्जवाटप झालेच पाहिजे. त्यासाठी बँकांनी रोजचे उद्दिष्ट ठरवून शेतक-यांना वाटप करावे. पीक कर्जासाठी शेतकरी बँकाकडे येणारआहे. बँकासुध्दा शेतक-यांना सहकार्य करीत आहे, असा संदेश शेतक-यांमध्ये पोहचला पाहिजे. किचकट प्रक्रिया किंवा कागदपत्रांअभावी अडवणूक होऊ देऊ नका.

कोणत्या बँकेने रोज किती शेतक-यांना, किती कर्जवाटप केले आहे, याची तपासणी जिल्हा अग्रणी बँकेकडून केली जाईल. त्यामुळे कसे नियोजन करायचे हे आधीच बँकांनी ठरवून घ्यावे. बँकांनी शेतक-यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. एखाद्या प्रतिष्ठित शेतक-यांमार्फत गावातील इतर शेतक-यांपर्यंत कर्जवाटप सुरू झाल्याचा संदेश पोहचवा. प्रत्येक आठवड्याला पीक कर्जवाटपाचा आढावा घेण्यात येईल. यात कोणत्याही बँकांची कामगिरी निराशाजनक दिसता कामा नये, अशाही सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. यावेळी त्यांनी बँकनिहाय पीक कर्जवाटपाचा आढावा घेतला.

खरीप हंगाम 2020-21 मध्ये जिल्ह्याला 2210 कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. 4 मे 2021 पर्यंत 40564 शेतक-यांना 321 कोटी 19 लक्ष रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. यात सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 33952 शेतक-यांना 248 कोटी 37 लाख रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाने 2331 शेतक-यांना 26 कोटी 27 लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 1248 शेतक-यांना 13 कोटी 12 लाख रुपये पीक कर्जवाटप केले केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

बैठकीला बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडीयन बँक, स्टेट बँक ऑफ इंडीया, आयडीबीय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तर इतर बँकेचे प्रतिनिधी व्हीसीद्वारे उपस्थित होते.

 

चांगली उगवण क्षमता असलेले बियाणे शेतक-यांना उपलब्ध करून द्या

– जिल्हाधिकारी येडगे

सोयाबीनचे घरगुती बियाणे वापरण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 5 : खरीप हंगाम सुरू झाल्यामुळे कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरू आहे. अशा परिस्थितीत चांगली उगवण क्षमता असलेले बियाणे तसेच उत्कृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठा शेतक-यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. त्यासाठी दैनंदिन पाठपुरावा करून जिल्ह्यात बियाणे, खते आदींची कमतरता पडणार नाही, याबाबत कृषी विभागाने सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जि.प. कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे आदी उपस्थित होते.

जास्तीत जास्त उगवण क्षमता असलेल्या घरगुती सोयाबीन बियाणांचा वापर करण्याचे शेतक-यांना आवाहन करा, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, महाबीजने जिल्ह्याला सोयाबीन बियाणांचा पर्याप्त स्वरुपात पुरवठा करावा. तसेच खाजगी कंपन्यांकडूनसुध्दा जास्तीत जास्त सोयाबीनचे बियाणे जिल्ह्याला उपलब्ध होईल, यासाठी कृषी विभागाने रोज पाठपुरावा करावा. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात बोगस बियाणांचे वाटप होता कामा नये. अशी प्रतिष्ठाने शोधण्यासाठी टीममार्फत शोधमोहीम राबवा. तसेच चोरट्या मार्गानेसुध्दा बियाणांची वाहतूक न होऊ देण्यासाठी पोलिस विभागाची मदत घ्या.

जिल्ह्यात अप्रामाणिक नमुने सापडल्यास तात्काळ कारवाई करा. कृषी सहाय्यक शेतक-यांच्या बांधावर दिसले पाहिजे. त्यांच्यामार्फत शेतक-यांना योग्य मार्गदर्शन करून मोबाईल संदेशाच्या माध्यमातूनसुध्दा कृषी विभागाने शेतक-यांपर्यंत पोहचावे. जिल्ह्यात सर्व कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध होतील, यासाठी दक्ष राहावे. तसेच निविष्ठा वाटपाचे काम कोव्हीड प्रतिबंधात्मक वर्तणूकीचे पालन करून करण्यात यावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सोयाबीनचे 1 लक्ष 31 हजार 242 क्विंटल बियाणे, तूर 15008 क्विंटल बियाणे, ज्वारी 1065 क्विंटल, मुंग 770 क्विंटल, उडीद 760 क्विंटल बियाणांची तर कापूससाठी 25 लक्ष 59 हजार 256 पॅकेटची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 16 भरारी पथकाची स्थापना तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. तर एक जिल्हास्तरीय पथक निर्माण करण्यात आले आहे. तसेच पंचायत समिती स्तरावर गुणवत्ता नियंत्रण व तक्रार कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

 

कृषी निविष्ठांची दुकाने आता सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत

यवतमाळ, दि. 5 : राज्यात व जिल्ह्यात 15 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत मार्गदर्शन सुचना निर्गमित केल्या आहेत. मात्र खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून त्यानुसार आता कृषी निविष्ठांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील.

या अंतर्गत सर्व प्रकारची कृषी सेवा केंद्रे, बि-बियाणे, किटकनाशके, खते विक्री केंद्र यांना यापुढे सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकान सुरु ठेवण्यास मुभा देण्यात येत आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कामगार, कर्मचारी यांचे लसीकरण करणे बंधनकारक राहील. सर्व प्रकारचे कृषी उत्पादने व साहित्याच्या पुरवठा हा नियमितपणे चालू राहील. तसेच कृषी साहित्य व कृषी संबंधीत उत्पादने यांच्या मालवाहतूकीकरीता निर्बंध लागू असणार नाही.

वरील‍ दिलेल्या निर्देशाव्यतिरिक्त शासनाच्या पूर्वीच्या आदेशामधील इतर सर्व सूचना व आदेश हे पुर्वीप्रमाणे लागू राहतील. सदर आदेश हे निर्गमित केल्यापासून पुढील आदेशापर्यंत यवतमाळ शहर व जिल्ह्याकरीता शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील.

या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

Copyright ©