Breaking News यवतमाळ सामाजिक

24 तासात 7792 जण निगेटिव्ह 1317 जण पॉझेटिव्ह, 1204 कोरोनामुक्त, मृत्यु 19

जिल्ह्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढले ; निगेटिव्ह रिपोर्टमध्येही वाढ

 

यवतमाळ, दि. 4 : कोरोनाविरुध्दच्या लढाईत ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट ही त्रृसुत्री अतिशय महत्वाची आहे. लवकर निदान झाले आणि त्यावर त्वरीत उपचार मिळाले तर आपला कोरोनापासून बचाव होऊ शकतो, याचे महत्व जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना समजले आहे. त्यामुळे लोक स्वत:हून टेस्टिंगसाठी समोर येत आहे. परिणामी जिल्ह्यात टेस्टिंगच्या प्रमाणात वाढ झाली असून निगेटिव्ह रिपोर्टचा आकडाही वाढत आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 7792 जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले आहे.

कोरोनाच्या सुरवातीच्या काळात नागरिकांमध्ये टेस्टिंग करण्याबाबत मोठ्या प्रमाणात भीती होती. त्यामुळे लक्षणे असली तरी नागरिक चाचणी करण्यास नकार देत होते. आता मात्र नागरिकांमध्ये जागरुकता वाढली आहे. त्यामुळे लोक स्वत:हून टेस्टिंग करीत आहे. नागरिकांचा असाच प्रतिसाद राहिला तर कोरोनावर नक्कीच मात करता येईल. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 9109 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1317 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 7792 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तसेच गत 24 तासात जिल्ह्यात 1204 जण कोरोनामुक्त झाले असून एकूण 19 मृत्यु झाले. यात इतर जिल्ह्यातील दोन मृत्युंचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 15 मृत्यु, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये दोन आणि खाजगी रुग्णालयात दोन मृत्यु झाले आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 6795 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2515 तर गृह विलगीकरणात 4280 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 57476 झाली आहे. 24 तासात 1204 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 49308 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1373 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.99 असून मृत्युदर 2.39 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 38, 44 वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील 44, 80 वर्षीय पुरुष व 78 वर्षीय महिला, वणी येथील 70 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 30 वर्षीय महिला, दिग्रस तालुक्यातील 22 वर्षीय महिला, घाटंजी तालुक्यातील 76 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 50 वर्षीय पुरुष, बाभुळगाव येथील 75 वर्षीय पुरुष, झरी तालुक्यातील 37, 38 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 40 वर्षीय पुरुष आणि मारेगाव येथील 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यामध्ये उमरखेड तालुक्यातील 75 वर्षीय महिला, पांढरकवडा तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयात किनवट (जि. नांदेड) येथील 55 वर्षीय पुरुष आणि चंद्रपूर येथील 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.

मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1317 जणांमध्ये 788 पुरुष आणि 529 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 260 पॉझेटिव्ह रुग्ण, पांढरकवडा 189, वणी 157, पुसद 86, घाटंजी 83, आर्णि 82, दारव्हा 80, दिग्रस 75, झरीजामणी 65, बाभुळगाव 47, मारेगाव 40, उमरखेड 38, नेर 37, कळंब 25, महागाव 24, राळेगाव 22 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 442601 नमुने पाठविले असून यापैकी 438339 प्राप्त तर 4262 अप्राप्त आहेत. तसेच 380803 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

__&____________

5 ते 25 मे दरम्यान जिल्ह्यात ‘जाणीव-जागृती-खबरदारी’ मोहीम

शहरी भागासाठी प्रभागस्तरीय तर ग्रामीण साठी ग्रामस्तरीय समिती

यवतमाळ, दि. 4 : कोरोनाचा प्रादुर्भाव हा शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवितांना नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करून त्यांचे प्रबोधन करणे तसेच कोविड साखळी तोडण्यासाठी शहरी भागात प्रभागस्तरीय तर ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आवाहन केले आहे. या समित्यांच्या माध्यमातून 5 मे ते 25 मे या कालावधीत जिल्ह्यात जाणीव, जागृती व खबरदारी मोहीम राबविण्यात येत आहे. या संदर्भात खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात ग्रामस्तरीय व प्रभागस्तरीय कोरोना नियंत्रण समिती सक्रीय करून समितीमार्फत आजारी, कोविडसदृश्य लक्षणे असणा-या लोकांची माहिती घेणे, त्यांची पल्स ऑक्सीमीटरद्वारे ऑक्सीजन पातळी तपासणे, लक्षणे असलेल्या लोकांची चाचणी करून प्राप्त अहवालानुसार पुढील उपचाराच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच लोकांच्या मनामध्ये कोव्हीडबाबत, तपासणीबाबत असणारी भीती दूर करावी. कोव्हीड हा आजार लवकर निदान झाले तर बरा होऊ शकतो, हे नागरिकांना पटवून देणे. कोविडसदृश्य लक्षणे असतांना आजार अंगावर काढला आणि चाचणी न करता औषधोपचार घेऊन वेळ वाया घालविला किंवा चाचणीसाठी उशीर केला तर उपचारातील महत्वाचा वेळ वाया जातो. त्यामुळे कोविडसदृश्य लक्षणे आढळल्यास तात्काळ चाचणी करून घेणे अत्यावश्यक आहे.

काही नागरिकांच्या मनात कोव्हीड चाचणीबद्दल संभ्रम, गैरसमज आहे. लक्षणे नसलेले लोक पॉझेटिव्ह आल्यावर त्याबद्दल शंका घेण्याची लोकांची भुमिका दिसते. तसेच कोविड पॉझेटिव्ह आल्यानंतर रुग्णांना कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालय येथे घेऊन जाण्याबाबतही नागरिकांमध्ये काही गैरसमज आहेत. तरी हे सर्व गैरसमज/ संभ्रम दूर करून रुग्णांचे योग्य समुपदेशन करण्यात या मोहिमेद्वारे करण्यात येणार आहे. रुग्णांच्या मनातील चुकीच्या समजूती, गैरसमज दूर करण्यात यावे. ग्रामस्तरीय व प्रभागस्तरीय समितीने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने यामध्ये कार्य करावे.

वृध्द लोक, सहव्याधी आजार असणारे लोक यांची आरोग्याबाबत सतत माहिती व त्यांच्या ऑक्सीजन पातळीची पल्स ऑक्सीमीटरद्वारे तपासणी समितीमार्फत नियमित करण्यात यावी. कोविड प्रतिबंधात्मक वर्तणूक बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. कोव्हीड त्रिसूत्री (मास्कचा नियमित वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, नियमित हातांची स्वच्छता) याबाबत प्रबोधन करण्यात यावे. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये लोकांची गर्दी होणार नाही, तसेच लग्न समारंभ हे प्रशासनाने ठरवून दिलेल्या 25 लोकांच्या मर्यादेत व ठरवून दिलेल्या दोन तासांच्या कालावधीतच पार पडतील, याबाबत समितीने पुढाकार घेऊन लग्न समारंभ आयोजित करणारे व कुटुंबियांना पूर्वीच माहिती द्यावी. जेणेकरून नियमांचे उल्लंघन होणार नाही. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर उचित कार्यवाही करावी. समितीमधील कोणत्याही एका सदस्याने लग्न समारंभ स्थळी स्वत: हजर राहून नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देऊन कार्यवाही करावी.

कोव्हीडपासून संरक्षण मिळण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. लस ही पूर्णत: सुरक्षित असून लसीकरणाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता किंवा कोणताही संभ्रम न बाळगता जवळच्या लसीकरण केंद्रावर शासन निर्देशानुसार पात्रतेनुसार लसीकरण करून घ्यावे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन, ब्रेक दि चेन अंतर्गत नियमावलीचे पालन, कोविड त्रिसूत्रीचे पालन, लक्षणे असल्यास तात्काळ चाचणी व कोविड लसीकरणद्वारे संरक्षण करण्याच्या अनुषंगाने सर्व नागरिकांचे प्रबोधन करून समित्यांमार्फत स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन कार्यवाही करण्यात येणार आहे.

सामाजिक संस्थाची मदत या मोहिमेसाठी घेण्याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे व प्रभागनिहाय सामाजिक संस्थांची नेमणूक करावी. टेस्टींग ट्रेसिंग- ट्रॅकींग (चाचणी, शोध, पाठपुरावा) या त्रिसूत्रीचा अवलंब, कोविड त्रिसूत्रीचे व ब्रेक दि चेन अंतर्गत नियमावलीचे पालन समितीमार्फत करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सदर मोहिमेसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

________________

नेर येथे जिल्हाधिका-यांची ग्रामीण रुग्णालय व तपासणी शिबिराला भेट

मृत्यु दर कमी करण्यासाठी गांभिर्याने कामे करण्याच्या सुचना

यवतमाळ, दि. 4 : ग्रामीण भागातील कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नुकतीच नेर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच तालुक्यातील माणिकवाडा येथे तपासणी शिबिराला भेट दिली.

यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल, तहसीलदार अमोल पोवार, गटविकास अधिकारी उज्वला ढोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवी दुर्गे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रतिक खोडवे, ठाणेदार श्री. घुगे, न.प. मुख्याधिकारी नीलेश जाधव आदी उपस्थित होते.

सुरवातीला तालुक्यातील माणिकवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिका-यांनी भेट दिली. यावेळी येथे सुरू असलेल्या तपासणी शिबिराचीसुध्दा त्यांनी पाहणी केली. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत किती गावांचा समावेश होतो, असे विचारून जिल्हाधिकारी म्हणाले, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, कोतवाल तसेच गावचे सरपंच आणि इतर लोकप्रतिनिधींनी गावक-यांना तपासणीबाबत जागृत करणे आवश्यक आहे. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जाणा-या नागरिकांना तपासणीकरीता प्रवृत्त करा. तसेच येथे किती पात्र लोकांचे लसीकरण करण्यात आले, आदींबाबत त्यांनी माहिती घेतली.

तालुकास्तरीय समितीचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी म्हणाले, आपापल्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्तरीय समित्या सक्रीय करा. मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी लवकर तपासणी तसेच लवकर उपचार आवश्यक आहे. त्यामुळे तालुकास्तरीय तसेच ग्रामस्तरीय समित्यांनी टेस्टिंग वाढवावी. विनाकारण बाहेर फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश दिले.

यावेळी त्यांनी नेर येथील ग्रामीण रुग्णालयाचीही पाहणी केली. येथे त्वरीत 10 ऑक्सीजन बेडचे नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच कोव्हीड केअर सेंटरला भेट देऊन त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडीअडचणींची विचारपूस केली.

______________________

बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश

यवतमाळ, दि. 4 : झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येदलापूर येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तालुक्यातील दुर्भा येथील व्यक्तीसोबत आप्त संबधीयाच्या उपस्थितीत 5 मे 2021 तारखेला विवाह नियोजित करण्यात आला होता. या विवाहाची गोपनिय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. त्यानुसार तत्परतेने जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी येदलापूर ता. झरी जामणी या गावातील सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी, पोलीस पाटील, सहाय्यक शिक्षक व गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती यांच्या उपस्थितीत सदर बालविवाह थांबविण्याची कारवाई केली.

मुलीच्या पालकांची भेट घेऊन मुलीचे लग्न ती सज्ञान झाल्यानंतर करण्याबाबत समजावून सांगितले. तसेच बालविवाहाचे शारिरिक, मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 पेक्षा कमी असेल तर असा विवाह करणे हा बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये दखल पात्र गुन्हा आहे, याबाबत माहिती त्यांना देण्यात आली. मुलीच्या पालकांनी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यावर मुलीचे लग्न करण्याबाबत लेखी जवाब पदाधिकाऱ्यांना दिला व मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतरच लग्न करण्याचे ठरविले.

सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू व मुकुटबनचे ठाणेदार श्री. सोनवणे, पाटणच्या ठाणेदार संगिता हेलुंडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. बाल विवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे आकाश बुर्रेवार, समुपदेशक शिरीष ईगवे, सरपंच एस.डी.डहाके, ग्रामसेवक जी.एस.मुके, अंगणवाडी सेविका नंदा भोयर, पोलिस पाटील डी.पी. मानकर, सहाय्यक शिक्षक एम.डी.चाटे यांच्या उपस्थित पार पडली.

बाल विवाह बाबत नागरिकांनी दक्ष राहावे तसेच बाल विवाह बाबत माहिती असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष – दगडी इमारत, टांगा चौक – यवतमाळ अथवा चाईल्ड लाईन 1098 यांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©