यवतमाळ सामाजिक

एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे भाकरीचा प्रश्न

—————————————-
कोरोना जिंकला शासन हरले
*************************

मागील वर्षी हवाई मार्गे हळूच आपल्या देशात पाय ठेवणाऱ्या कोरोनाने आता आपला जम देशात चांगल्या पद्धतीने बसवलेला दिसत आहे. विदेशातून येणाऱ्या श्रीमंता मार्फत आलेला हा कोरोना आता मात्र गरिबाच्या झोपडीपर्यंत पोहचला असून, तिथे त्याने त्याचे बस्तान मांडल्याचे दिसते. त्यामुळे एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे भाकरीचा प्रश्न. अशा दुहेरी संकटात गरीब जनता पिचलेली दिसून येत आहे. सद्यस्थितीत दिसत असलेल्या चित्रामुळे शासन, प्रशासन हरले व कोरोना जिंकला की काय असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल म्हणून आमच्या तालुक्याची ओळख. शेती हा येथील मुख्य धंदा व शेतमजूरी हेच कामगाराचे मुख्य साधन. गेल्या अनेक पिढ्या पासून झोपडीतून, गरिबांच्या घरातून मिळालेल्या मतावरच मंत्री, खासदार, आमदारांनी स्वतःचं व त्यांच्या मागे फिरणाऱ्या चेले चपाट्याचेच भलं करून घेतलं. मात्र तालुक्यात रोजगाराभिमुख कोणताही मोठा कार्यक्रम त्यांनी राबवला नाही. कोणताही प्रकल्प आणला नाही. त्यामुळे शेती व शेतमजुरी यावरच बहुतांश जनतेला आपली गुजराण करावी लागते. त्यातच पावसाचा लहरीपणा व वरून कोरोनाच्या माराने येथील शेतकरी तथा शेतमजूर बेहालीचे जिने जगताना दिसून येत आहे. असे असताना सुद्धा मागील वर्षापासून मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी समोर येऊन मतदार राजाला अडचणीच्या वेळी मदत करण्याची गरजच वाटली नाही. काही अपवादात्मक मदत वगळता, आयत्या पिठावर रांगोळी काढण्याचे कामच येथील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यां कडून होताना दिसले.

*आता एकदा दानदात्यांनी समोर येण्याची गरज*

मागील वर्षी कोरोना आजाराने तालुक्यात आपला पाय रोवला. म्हणून शासनाच्या वतीने लॉक डाउन करण्यात आले. प्रसंगी शासनाने स्वस्त धान्य दुकानातून ठराविक गरजूंना राशन दिले. तरी काही समाजसेवी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी व काही दानशूर व्यक्तींनी सुद्धा मदतीचा हात समोर करत तालुक्यातील, शहरातील गरीब, गरजू, अपंग, विधवा, परितक्त्या, एकल व निराधार व्यक्ती तसेच बाहेरच्या अडकून पडलेल्या परिवाराला वस्तू, धान्य व जेवणाचे डबे देऊन मदत केल्याने त्यांना बराच आधार मिळाला होता. मात्र यावर्षी कोरोनाने अतिशय वेगाने हात-पाय पसरायला सुरुवात केली तरी कोणीही समोर यायला तयार नाही. त्यामुळे ज्यांच्या घरी अन्न शिजत नाही असे अनेक चेहरे आशाळभूत नजरेने मदतीचा हात घेऊन येणाऱ्या व्यक्तीला गल्लोगल्लीत शोधताना दिसून येत आहे. त्यामुळे पुनच्छ दानदात्यांना बाहेर येऊन एकदा मदतीचा हात समोर करणे अगत्याचे झाले आहे.

Copyright ©