Breaking News यवतमाळ सामाजिक

बाधितांपेक्षा कोरानामुक्त रुग्णांची संख्या 249 ने जास्त जिल्ह्यात 855 नव्याने पॉझेटिव्ह, 1104 कोरोनामुक्त, 31 मृत्यू

 

यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. लगातार दोन दिवस (28 व 29 एप्रिल) कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनातून बरे होणा-यांचा आकडा जास्त आहे. ही नक्कीच जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. गुरुवारी तर कोरोनामुक्त होणा-यांची संख्या बाधितांपेक्षा तब्बल 249 ने जास्त होती.
गत 24 तासात जिल्ह्यात 855 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 1104 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 31 मृत्यु झाले. यातील 21 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, चार मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर सहा मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले.

जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 5546 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 855 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4691 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6831 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2524 तर गृह विलगीकरणात 4307 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 51850 झाली आहे. 24 तासात 1104 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 43776 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1243 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.60 असून मृत्युदर 2.40 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 59, 50, 44, 74 वर्षीय पुरुष व 58 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष व 33 वर्षीय महिला, वणी येथील 72, 65, 55 वर्षीय महिला, तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष व 54 वर्षीय महिला, आर्णि येथील 55 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला, महागाव तालुक्यातील 75 वर्षीय महिला, कळंब येथील 61 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 58 वर्षीय महिला आणि मारेगाव तालुक्यातील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 47 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय महिला, वणी येथील 46 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 80 वर्षीय महिला, आर्णि येथील 58 वर्षीय पुरुष आणि घाटंजी येथील 48 वर्षीय महिला आहे. तर डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यांमध्ये पुसद तालुक्यातील 45 वर्षीय महिला, वणी येथील 65 वर्षीय पुरुष व 85 वर्षीय महिला आणि मारेगाव तालुक्यातील 48 वर्षीय पुरुष आहे.

गुरुवारी पॉझेटिव्ह आलेल्या 855 जणांमध्ये 542 पुरुष आणि 313 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 208 पॉझेटिव्ह रुग्ण, वणी 46, पांढरकवडा 129, घाटंजी 41, दारव्हा 128, उमरखेड 13, आर्णि 35, दिग्रस 50, पुसद 55, नेर 36, महागाव 14, मारेगाव 30, झरीजामणी 33, बाभुळगाव 5, राळेगाव 20, कळंब 6 आणि इतर शहरातील 6 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 411544 नमुने पाठविले असून यापैकी 404767 प्राप्त तर 6777 अप्राप्त आहेत. तसेच 352917 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

__________________

 

 

खाजगी रुग्णालयांना ‘कोव्हीड सुविधा पोर्टल’वर माहिती भरणे बंधनकारक

बेड व रेमडेसीवर उपलब्धतेबाबत नागरिकांना मिळणार माहिती

जिल्हाधिका-यांनी घेतली खाजगी रुग्णालयांच्या डॉक्टरांची बैठक

यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी त्यांच्या उपचाराबाबत जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. शासकीय रुग्णालयासोबतच खाजगी कोव्हीड रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना योग्य उपचार, बेड, ऑक्सीजन, रेमडेसीवर आदी बाबींची माहिती होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘covidsuvidhaytl‘ या नावाने पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर खाजगी कोव्हीड रुग्णालयांनी दैनंदिन माहिती भरणे बंधनकारक आहे. सदर माहिती नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांची फसवणूक टाळण्यास मदत होईल.

याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी खाजगी कोव्हीड रुग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तथा नोडल अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी यांच्यासह इतर डॉक्टर्स उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यामध्ये 24 खाजगी रुग्णालयांना डेडीकेटेड कोव्हीड केअर सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली. कोरोनाबाधित रुग्णांकडून कोणत्याही प्रकारच जादा शुल्क आकारणी होऊ नये, यासाठी खाजगी रुग्णालयात ऑडीटर नेमण्यात आले आहेत. या ऑडीटरांना त्यांच्या कामात संबंधित रुग्णालयांनी सहकार्य करावे. तसेच आपल्या रुग्णालयातील बेडची उपलब्धता नियमित भरणे, प्रोटोकॉलप्रमाणे रेमडेसीवीर इंजक्शन दिलेल्या रुग्णांची नावे, त्यांचा एचआरसीटी स्कोर, ऑक्सीजन स्तर आदी बाबी नियमितपणे पोर्टलमध्ये भरणे आवश्यक आहे.

तसेच रुग्णालयांनी ऑक्सीजन ऑडीट, सुरक्षिततेच्या दृष्टीने फायर ऑडीट करावे. कोणत्याही रुग्णाची फसवणूक होणार नाही व जास्त बिल आकारणी होणार नाही, याची संबंधित रुग्णालयांनी दक्षता घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

००००००००

वृत्त क्रमांक : 363

केवळ जिल्हा मुख्यालयी साधेपणाने होणार ध्वजारोहण कार्यक्रम

पालकमंत्र्यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता ध्वजारोहण

यवतमाळ, दि. 29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेला 1 मे 2021 रोजी 61 वर्षे पूर्ण होत आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम केवळ जिल्हा मुख्यालयी अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या शासनाच्या सुचना प्राप्त झाल्या आहे. त्यानुसार शनिवार दि. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न होणार आहे.

_______________________

कृषी निविष्ठाचा काळाबाजार करणा-यांवर कडक कारवाई करा

जिल्हाधिका-यांचे कृषी विभागाला निर्देश

यवतमाळ, दि. 29 : शेतक-यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याला आवश्यक असलेले बियाणे, खते, किटकनाशक आदींचे सुक्ष्म नियोजन कृषी विभागाने करावे. तसेच कृषी निविष्ठांचा काळाबाजार होणार नाही, याबाबत दक्ष राहून काळाबाजार करणा-यांवर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम 2021 मध्ये कृषी निविष्ठांच्या नियोजनासाठी जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर पोलिस अधिक्षक खांडेराव धरणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जि.प.कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे आदी उपस्थित होते.

आढावा बैठकीमध्ये आवश्यक बियाणे व खते, याबाबत महिनानिहाय नियोजनाबाबत चर्चा झाली. तसेच शेतकऱ्यांना अप्रमाणित कृषी निविष्ठांचा पुरवठा होणार नाही, याबाबत दक्ष राहावे. तसेच कृषी निविष्ठांची परिणामकारक गुणवत्ता तपासणी होण्यासाठी आणि खरीप हंगामात कृषी निविष्ठांच्या संदर्भात तक्रारी येऊ देऊ नका. शेतकऱ्यांना पुरवठा होणाऱ्या कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेसाठी जिल्ह्यामध्ये स्थापन केलेल्या 17 भरारी पथकापर्यंत तपासणी कराव्यात व अनधिकृत बियाणे व खतांबाबत कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

अवैधरित्या अनधिकृत कापूस बियाण्यांची (एचटीबीटी) वाहतूक, वितरण, विक्री व साठवणूक होवू नये याकरीता भरारी पथकांपर्यंत तपासण्या करून कारवाई करावी. कृषी निविष्ठांचा काळाबाजार करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. तसेच खरीप हंगाम 2021 मध्ये शेतकऱ्यांनी पेरणीसाठी राखून ठेवलेले घरचेच सोयाबीन बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले.

बैठकीला महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे, जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापक श्री. गावंडे, कृषी विक्रेता संघाचे अध्यक्ष संजय पालतेवार आणि सचिव कमल बागडे उपस्थित होते.

_______________________

औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण

यवतमाळ, दि. 29 : राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. याप्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई, नियोजन व वित्त राज्य मंत्री शंभुराज देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, नियेाजन विभाग व उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, उद्योग आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग संचालनालयाचे सर्व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चित करणे, औद्योगिक विकासाच्या योजना ठरविणेसाठी औद्योगिक क्षेत्रातील चढउताराचे मोजमाप आवश्यक असते. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये तसेच एकूण उत्पादनामध्ये राज्याचा हिस्सा मोठा आहे. सदर निर्देशांक राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, देशातील, राज्यातील औद्योगिक प्रगती मोजणे, यासाठी तसेच नियोजन करण्याच्या उद्देशाने अत्यंत उपयुक्त आहे.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यामधील निवडलेल्या 568 कारखान्याकडून दरमहा विहीत कालावधीत माहिती या वेब पोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, यांचेवर सोपविण्यात आली आहे, असे जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांनह कळविले आहे.

_____________________

जिल्ह्यात कलम 37 नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू

यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदी अन्वये 1 मेपासून 15 मे च्या मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात कलम 37 (1)(3) प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.

या आदेशान्वये जिल्ह्यात जमाव करणे, शस्त्र बाळगणे, माणसांचे एकत्रिकरण व पुतळ्याचे प्रदर्शन करणे आदी प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे. या कलमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 37 (1) व 37 (3) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी प्रसिध्दी पत्रकांद्वारे कळविले आहे.

Copyright ©