यवतमाळ सामाजिक

“महत्वाचं काय? – घास, वास, भास, भीती की अफवा?”

 

. एका हॉटेल मध्ये सुप्रसिद्ध स्वयंपाक्याने उच्च प्रतीचा तांदूळ वापरून अतिशय चवदार पुलाव बनवला. पुलाव तयार होताच त्याचा सुगंध आसमंतात पसरला. प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटले. सगळ्यांना त्या पुलावाची चव घेण्याची घाई लागली. जवळपास शंभर लोकांना हॉटेल मध्ये वेटरने पुलाव वाढला.
प्रत्येकजण पहिला घास हातात घेऊन तोंडात घालणार, तोच स्वयंपाक्याने येऊन सांगितले कि, “यात गारेचा एक खडा पडला आहे. तो तांदळाच्या रंगाचा आणि आकाराचा असल्याने, मला सापडला नाही. तो कोणाला येईल सांगता येणार नाही. काळजी घ्या. कुणाच्या दाडेखाली आला तर इजा होऊ शकते म्हणून सांगितले.”
आता पुलावाचा स्वाद चांगला आहे…. चव उत्तम आहे…. तरी पण खाण्याची गंमत निघून गेली. प्रत्येकजण घास खाताना चवी कडे लक्ष न देता, याच घासात तर खडा नसेल ना या संशयाने एक एक घास ढकलत होता.
जो-तो सावध झाल्याने गप्पागोष्टी विनोद काहीही झाले नाही. एकत्र जेवणाची मजाच गेली होती. सर्वजण एकत्र असूनही एक-एकटे विचारात पडले होते. सगळ्यांनी शेवटपर्यंत जेवण केले. अगदी शेवटचा घास सुध्दा सावधपणे घेतला.
सर्वांनी आपल्याला खडा न आल्याबद्दल सुसस्कारा सोडला. हात धुतले. तेव्हा कोणाच्यातरी लक्षात आले कि, “अरेच्च्या! कुणालाच खडा आला नाही?”
मग त्यांनी त्या स्वयंपाक्याला बोलावले. त्याला विचारले “तू तर म्हणाला होतास खडा येईल!” तो स्वयपाकी म्हणाला, “मी बहुतेक सर्वच खडे काढले होते, परंतु न जाणो चुकून एखादा राहिला असेल तर…! आपल्याला सावध केलेले बरे, म्हणून सांगितले!”
सगळे एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागले. अतिशय उत्तम स्वादिष्ट झालेल्या पुलावाबद्दल चर्चाच झाली नाही. जेवण करून सगळे दमले होते. कारण प्रत्येक घास खाण्यातली सहजता गेली होती. सगळ्याच्या हालचालींची सहजता गेली होती. म्हणून भोजन करणे एवढे कष्टदायक झाले होते !!
या उदाहरणाने आपल्याला बरच काही पटलं असेल. नाही का! मित्रांनो! खुप काही शिकलो आपण आत्ता पर्यंत. पण ते अमलात आणले नव्हते. पण आता खरी गरज आहे. ते समजुन-उमजून घेवून कृतीत आणण्याची. कित्येक चांगले-चांगले जिव्हाळ्याचे नाते संबंध, जीवाचे जीव सोडून गेले. कित्येकांनी स्वतःला बंद करून घेतले, कित्येक गोतावळा जसाच्या तसा सोडून गेले. कित्येकांनी काही, तर कित्येकांनी काही गमावले. “ना मिलने की खुशी, ना बिछडने का गम|” “धरले तर चावते व सोडले तर पळते.” अशी द्विधा मनस्थिती झाली. कोणाला काहिच समजले नाही, की नेमके जगावे लागते तरी कसे?
एका रोगामुळे, सध्या आपली अवस्था पुलावातल्या खड्यासारखी झाली आहे. कोणाला हा खडा येईल हे सांगता येत नाही. जगण्यातली सहजता गेली. अगदी मदत करणारा हात देखील, कोरोनाचा असेल का? दूधवाला, भाजीवाला, किराणावाला, जीवनावश्यक वस्तू घेताना, वस्तू बरोबर काय येईल याचीच जास्त चिंता घेऊन जगतोय आपण….!
पूर्वी शिंक आली कि वाटायचं कुणीतरी आठवण काढली ! परंतु आता वाटते कि निसर्गाने आपली फाईल बाहेर काढली कि काय…? माहिती नाही किती दिवस चालेल हे सर्व…! परंतु त्या चविष्ट जेवणाप्रमाणे आपले आनंदी जीवन मात्र आता बेचव होऊ देऊ नये ही नम्र विनंती. सर्वांच्याच जगण्यातला रंगीतपणा जावून जीवन ब्लॅक अँड व्हाईट झाले आहे. नकारात्मक बातम्या, पोस्ट न वाचता, मनाला उत्साही करणा-या पोस्ट, माहिती, पुस्तक वाचा, छंद जोपासा आणि किलो किलोमधे आपल्याच कडून आनंद विकत घ्या. बातम्या तर नुसत्या positive निघालेले व मयत झालेले असतात. जीवनाचे वाळवंट झाल्यासारखे वाटते. पण हेही दिवस निघुन जातील. माणसाने रोगाने नाही तर विचाराने सकारात्मक असावे.
समजा एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमात स्वयंपाक्याने खूप छान व स्वादिष्ट खीर बनवली. सगळ्यांनी मिटक्या मारत तिचा आस्वाद घेतला. भरपेट खाल्ली. काही तृप्त झाले. समाधानाच्या ढेकरा दिल्या. कार्यक्रमात शंभर ते सव्वाशे लोकांनी खीर आनंदित चेहऱ्याने खाल्ली व अचानकपणे विज पडावी, तसे त्या खीर बनविणाऱ्या स्वयंपाक्याने त्या कार्यक्रमात म्हटले की, “खीर कोणी कोणी खाल्ली? कशी होती…?” वगैरे वगैरे विचारले. तर किती लोकांचे हात वर जातील? ज्यांनी खीर खाल्ली त्या सर्वांचेच ना! त्यानंतर त्यांने एक अफवेची टाचणी तिथे टाकली की, “खीर बनविल्यानंतर त्या खिरीच्या कढईत कुत्र्याने तोंड टाकले होते.” तर हे ऐकून किती जणांना क्षणाचाही विलंब न होता, लगेच मळमळ, उलट्या, कसेतरी, व्यक्-व्यक् चालू होइल? त्या सर्वांनाच ना! की, ज्यांनी ती खीर आनंदाने खाल्ली होती. ज्यांची प्रतिकारशक्ती आहे व जे सकरात्मक विचार करणारे आहेत. त्यांना या अफवेच्या बातमीने काहीही फरक पडणार नाही. कारण त्यांनी मनोमन स्वीकारलेले असते की, “ही एक अफवा आहे.” पण जे खरंच हळव्या मनाचे व त्वरित मनावर घेणारे आहे. त्यांचे काय होईल? वास्तविक पाहता त्या स्वयंपाक्याला माहित असते की, तसे अगदी काहीही घडलेले नाही. तरी पण एका अफवेच्या टाचणीची सब्बल व्हायला काहीही वेळ लागणार नाही.
अगदी तसेच आहे मित्रांनो! कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आत्मविश्वास, आत्मसंयमाने जगा. कारण आपला भारतीय इतिहासच साक्षी आहे की, “आपण दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा जिवंत आहोत व जिवंत व्यवहार करतो आहोत.” याचे कारणच हे की, आपली रोगप्रतिकारकशक्ती किती जबरदस्त आहे!
============================
डॉ. आर. बी. हुमणे
पाटीपुरा, यवतमाळ.
90 21 37 73 30.
दि. 21/04/2021.
============================

Copyright ©