यवतमाळ सामाजिक

मानवतेचा संदेश देणारा – रमजान महिना

 

 

रोजा करणारा मुसलमान कयामतच्या दिवशी अल्लाचा प्रामाणिक बंदा म्हणून ओळखला जातो. हा महिना म्हणजे मनुष्याच्या वाईट प्रवृत्तीला नियंत्रणात ठेवणारा सर्वात श्रेष्ठ महिना आहे. या दिवसात वर्षभर गुन्हेगारी करणार्‍या मनुष्याच्याही मनात असे येते की, आपण केलेल्या गुन्ह्यांचा जवाब अल्लाला द्यायचा आहे. याचा अर्थ रमजान – उल – मुबारक गुन्हा करण्यास रोखून मनुष्याला आपल्या ईश्वराप्रती सदाचारी व प्रामाणिक राहण्याचे सांगतो. रमजानचा हा पवित्र व प्रामणिक महिना मनुष्याला स्वत: ची इंद्रिये ताब्यात ठेवण्याची तालीम देतो. त्याचबरोबर भुकेलेल्याची भूक, तहानलेल्याची तहान भागविणे व मानवतेचा धर्म पाळण्याचा संदेश रमजान देतो. मानवतेचे कर्तव्य पार पाडण्याचा सल्ला रमजान देतो. रोजा करणार्‍या मुसलमानावर अल्लाचा आशीर्वाद असतो. या दिवसात मनुष्य नमाज पठण आणि अल्लाच्या प्रेमात दंग झालेला असतो. आपल्या डोक्यातील वाईट विचार कायमचे काढून टाकण्याचा उद्देश यामध्ये असतो. अशा प्रकारे हा महिना मानवाला मानवतेचा संदेश देऊन प्रेमाने, बंधुभावाने एकत्र नांदण्याचा संदेश देतो. मनुष्याला दुसर्‍याची मदत करण्यासाठी रस्ता दाखविण्याचे काम केले जाते. रमजानच्या काळात सकाळी चंद्र उगवण्याच्या अगोदरपासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही खाऊ नये. रोजा सोडल्यानंतरच अन्नपदार्थ खाण्याची परवानगी आहे. केवळ उपाशी राहणे म्हणजे रोजा नाही. ईश्वरालाही उपाशीपोटी राहणे आवडत नाही. जे लोक प्रामणिकपणे रोजा पूर्ण करतात त्यांच्यावर ईश्वर प्रसन्न असतो. रोजा करणारा प्रत्येकजण आपल्याला वाईटापासून दूर ठेवून पावित्र्य पाळण्याचा प्रयत्न करतो. प्रामाणिकपणे प्रत्येकाने ईश्वरापुढे आपल्या गुन्ह्यांची माफी मागावी आणि यापुढे कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीत सहभागी होणार नसल्याची प्रतिज्ञा करावी. या काळात दिवसातून अनेक वेळा नमाज पठण केले पाहिजे. रमजानच्या महिन्यात एकीकडे वाईटापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला जातो तर दुसरीकडे मानवता प्रस्थापित करणे हे प्रत्येक मुसलमानाला आवश्यक आहे. प्रत्येक मनुष्याने मानवतेचे नाते घट्ट करून रमजान – उल – मुबारकच्या प्रामाणिक आणि दयेचा संदेश जगभर पसरविला पाहिजे.
आपल्या मुस्लीम बांधवांच्या उपवासाच्या महिन्याला नुकताच प्रारंभ झाला आहे. यालाच ” रमजान ” चा अर्थात ” बरकती ” चा महिना असे म्हणतात. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना असतो.संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना होय. माणसाला वाईटापासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना. या महिन्याचे महात्म्य, पावित्र्य सांगावे तेवढे थोडेच आहे.
आपल्या मनाचं मागणं पूर्ण करणार्‍या,बरकतीची मुक्तपणे उधळण करणार्‍या या महिन्याच्या चंद्राची तमाम मुस्लीम बांधव आतुरतेने प्रतीक्षा करीत असतात. चंद्राच्या दर्शनाने प्रत्येकाच्या चेहर्‍यावर प्रसन्नतेची पहाट फुलत असते. घरादारात, मुहल्ल्यात आनंद भरभरून ओसंडत असतो. चाँद दिख,चाँद दिख चा गलका आसमंतात चैतन्याचे कारंजी उडवू लागतो. मुस्लीम बांधव आपापसातील वैरत्व, द्वेष विसरून हस्तांदोलन करतात, आलिंगन देतात. त्यांच्या निखळ जिव्हाळ्याने सबंध माहोल स्नेहमय होऊन जातो. संपूर्ण महिनाभर अत्यंत कडकडीत रोजे, पाच वेळेचा नियमित नमाज, कुराणपठण अन् अल्लाहचे स्मरण, चिंतन करायचे असते. या तीस दिवसात उपासधारकांच्या तनमनाची शुद्धी होते. म्हणून इस्लाम धर्मात रमजान महिन्याला अनन्साधारण महत्त्व देण्यात आले आहे. हा महिना अत्यंत पवित्र अन् मंगलमय मानला गेला आहे.
या महिन्यातच हजरत मुहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येचे फळ प्राप्त झाले. अर्थात त्यांना अल्लाहचे दर्शन झाले. ज्या परमेश्वराच्या साक्षात्कारासाठी हजरत मुहम्मद पैगंबरांनी तहान, भूक, दुनियादारी या सार्‍या गोष्टींना तिलांजली देऊन परमेश्वराची इमाने इतबारे इबादत केली, तो परमेश्वर याच महिन्यात त्यांना प्रसन्न झाला. त्यांची ईशसेवा खर्‍या अर्थाने कबूल झाली. पैगंबरांची इबादत स्वत:साठी नव्हतीच मुळी. ती इबादत होती लोककल्याणासाठी, समस्त मानवमुक्तीसाठी. या महिन्यापासूनच पवित्र कुराणाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचण्याला सुरुवात झाली. ईश्वराच्या प्रसन्नतेची, विशालतेची साक्ष देणारा महिना म्हणूनही या महिन्याचे आगळेवेगळे स्थान अबाधित आहे. माणसाला त्याच्या भल्या बुर्‍याची, पाप व पुण्याची जाणीव करून देणार्‍या या महिन्यात उपवास करायाचे असतात. उपवास म्हणजे आत्म्याचे, आचारविचारांचे शुद्धीकरण होय. माणसाच्या या आचार – विचारांच्या शुद्धीकरणाची ही निकड कितीतरी वर्षापूर्वी सांगण्यात आली आहे. आजही त्याची नितांत निकड भासते. यावरून पैगंबरांच्या दूरदृष्टीची कल्पना सहजगत येऊ शकते. रमजानमधील रोजा म्हणजे सहरीपासून इफ्तारपर्यंत निव्वळ अन्न – पाण्यापासून दूर राहून भुकेची जीवघेणी यातना सहन करणे एवढेच नव्हे तर आखून देण्यात आलेली कुंपणे, बंधने, मर्यादा यांचे तंतोतंत पालन या महिन्याच्या वर्तुळात राहून करणे होय. या महिन्यातील बंद्याची इबादत अल्लाहला अधिक पसंत असते. या महिन्यातल्या इबादतीचा असर,नूर काही वेगळाच असतो.
अनीती, अनाचार, अत्याचार, अवास्त या गोष्टींकडे कानाडोळा करून दुनिेयेतल्या चांगुलपणावर, मांगल्यावर अंत:करणपूर्वक प्रेम करणे, डोळ्यात पावित्र्य साठविणे, मनात नीतिमूल्यांची जपणूक करणे, परोपकाराची भावना रुजविणे, कानांना फक्त चांगले, उदात्त, विधायक विचार ऐकण्याची सवय लावणे ही या महिन्याची विशेष शिकवणूक असते. महिनाभराच्या त्यागाने, शुद्ध आचरणाने तावून सुलाखून निघालेल्या रोजदारांनी ईदचा शिरकुर्मा आनंदाने प्यायचा असतो. ईद म्हणजे आनंदोत्सवच असतो. जो एकमेकांच्या शुभेच्छांनी, सदिच्छांनी साजरा करायचा असतो. अशा या मानवतेचा संदेश देणाऱ्या पवित्र रमजान महिन्याच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा…!!!रमजान मुबारक…!!!

लेखन गजानन गोपेवाड

Copyright ©