Breaking News यवतमाळ

जिल्ह्यात एक हजार जण पॉझेटिव्ह ; 520 कोरोनामुक्त वर्धा येथील एका मृत्युसह एकूण 25 मृत्यु

अतिरिक्त बील आकारल्याप्रकरणी सहा कोव्हीड रुग्णालयांना नोटीस

48 तासात उत्तर सादर करण्याचे निर्देश

यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यातील खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांकडून मनमानी बील घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या रुग्णालयात ऑडीटर नियुक्त केले आहे. या ऑडीटरांनी बिलांच्या तपासण्या करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार यवतमाळ शहरातील सहा खाजगी कोव्हीड रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यामध्ये 24 खाजगी रुग्णालयांना डेडीकेटेड कोव्हीड केअर सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली. कोरोनाबाधित रुग्णांकडून कोणत्याही प्रकारचे जादा शुल्क आकारणी होऊ नये, याकरीता निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

रुग्णालयात नियुक्त केलेल्या ऑडीटर यांनी बिलाच्या तपासण्या करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार अतिरिक्त बील आकारल्याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांच्या स्वाक्षरीने सहा खाजगी कोव्हीड हॉस्पीटलला नोटीस देण्यात आली आहे. यात धवणे हॉस्पीटल, यवतमाळ कोव्हीड केअर सेंटर, उजवणे हॉस्पीटल, क्रिटीकेअर हॉस्पीटल, राठोड इन्टेंसिव्ह केअर युनीट आणि महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचा समावेश आहे. सदर हॉस्पीटलला नोटीस मिळाल्यापासून 48 तासात उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे रुग्णालयांचे उत्तर समाधानकारक नसल्यास वसुलीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

खाजगी कोव्हीड रुग्णालयात प्रशासनाने नेमलेल्या ऑडीटरमार्फत दैनंदिन भरती होणा-या रुग्णांची माहिती घेणे, रुग्णालयातील उपलब्ध बेड संख्या, ॲक्टीव्ह रुग्ण, पॉझेटिव्ह रुग्ण, सुट्टी देण्यात आलेले रुग्ण यांची अद्ययावत माहिती ठेवणे, कोरोनाबाधित रुग्णांकडून शुक्ल आकारणी होते किंवा नाही याची पडताळणी करणे, तसेच परिपत्रकानुसार शुल्क आकारणी होत नसल्यास एकंदरीत बिलाची तपासणी करून शुल्क आकारणी निश्चित करणे, रुग्णालयातील कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णांचे देयके तपासल्याशिवाय त्यांना सुट्टी होणार नाही,याची खात्री करणे, कोरोनाबाधित रुग्णांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून जादा रक्कम घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास तेथेच त्यांच्या तक्रारींचे निरसन करणे, तसेच याबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सादर करणे आदी कार्यवाही करण्यात येते.

______&_________&___

जिल्ह्यात 284 लसीकरण केंद्राचे नियोजन

यवतमाळ शहरातील पाटीपूरा केंद्रावर सर्वाधिक लसीकरण

यवतमाळ, दि. 27 : कोरोनाविरुध्दच्या लढाईत कोव्हीड प्रतिबंधात्मक लस हे एक प्रभावी शस्त्र ठरत आहे. शासनाने लसीकरणाला प्राधान्य दिले असून आपापल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात 284 केंद्र कार्यरत करण्यात येणार आहे.

16 जानेवारी 2021 पासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरवातीच्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर (यात महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत राज व्यवस्थेतील कर्मचारी) यांनाच लस देण्यात आली. आता मात्र 45 वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसेच 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या वयोगटातील जवळपास 21 लक्ष लोकसंख्येला लस देण्याचे जिल्ह्यात उद्दिष्ट आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 130 लसीकरण केंद्रावर लस देण्याचे काम सुरू आहे. यात 112 शासकीय केंद्र तर 18 खाजगी केंद्रांचा समावेश आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार असल्यामुळे ग्रामीण भागात 230 लसीकरण केंद्र, शहरी भागात वाढीव 38 केंद्र आणि प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 16 मोबाईल टीम कार्यरत करण्यात येईल. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ घेण्यात येणार आहे. लस देणारी मुख्य व्यक्ती ही प्राथमिक आरोग्य केंद्रातून तर कोव्हीन ॲप हाताळण्यासाठी शिक्षक किंवा इतर कर्मचारी मानधनावर घेण्याचे नियोजन आहे.

जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लस मिळण्यासाठी शासन स्तरावर मागणी नोंदविण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर रोज 100 याप्रमाणे 284 केंद्रावर दिवसाअखेर जवळपास 28 हजार लसीकरण होऊ शकते. मात्र लसीचा साठा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाकडून नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे, असे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांनी सांगितले.

 

आतापर्यंत जिल्ह्यात 2.25 लाखांच्या वर नागरिकांचे लसीकरण : जिल्ह्यात लसीकरणाला प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत 2 लक्ष 25 हजार 144 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात आरोग्य यंत्रणेतील 17321 जणांना पहिला डोज, 8488 जणांना दुसरा डोज, 23178 फ्रंटलाईन वर्कर यांना पहिला डोज, 7089 जणांना दुसरा डोज, 45 वर्षांवरील 156481 जणांना पहिला डोज आणि 12587 जणांना दुसरा डोज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यवतमाळ शहरातील पाटीपुरा शहरी प्राथमिक केंद्रावर सर्वाधिक म्हणजे 13750 जणांचे लसीकरण करण्यात आले असून त्यानंतर वणी येथील ग्रामीण रुग्णालयात 9700 जणांचे लसीकरण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 9150 जण, उमरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात 8620 जण, पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात 7970 जण आणि पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात 7350 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

 

____&________&____

यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यात गत 24 तासात 1000 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 520 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 25 मृत्यु झाले. यातील 20 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, एक मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर चार मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. एक मृत्यु जिल्ह्याबाहेरील म्हणजे वर्धा येथील आहे.

जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 5608 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1000 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4608 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7158 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2690 तर गृह विलगीकरणात 4468 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 50132 झाली आहे. 24 तासात 520 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 41792 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1182 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.54 असून मृत्युदर 2.36 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 64, 65, 72, 75 वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष, नेर येथील 77 वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील 40 व 60 वर्षीय पुरुष, केळापूर येथील 45 वर्षीय पुरुष व 49 वर्षीय महिला, कळंब येथील 60 व 75 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 77 वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 78 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 50 वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील 67 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 70 वर्षीय महिला आणि वर्धा येथील 64 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये पुसद येथील 69 वर्षीय पुरुष तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 52 व 66 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 73 वर्षीय पुरुष, वणी येथील 42 वर्षीय पुरुष आहे.

मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1000 जणांमध्ये 593 पुरुष आणि 407 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 301 पॉझेटिव्ह रुग्ण, मारेगाव 110, घाटंजी 106, पांढरकवडा 80, दिग्रस 70, पुसद 66, वणी 53, नेर 49, बाभुळगाव 42, आर्णि 33, झरी 30, कळंब 22, महागाव 11, दारव्हा 10, उमरखेड 9, राळेगाव 2, आणि इतर शहरातील 6 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 399847 नमुने पाठविले असून यापैकी 393818 प्राप्त तर 6029 अप्राप्त आहेत. तसेच 343686 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

Copyright ©