Breaking News यवतमाळ सामाजिक

*कोरोणाचा कहर जिल्हा हादरला* *खाजगी कोव्हीड रुग्णालयातील अव्वाच्या सव्वा बिलाला बसणार आळा*

 

 

 

 

23 मृत्युसह जिल्ह्यात 953 नव्याने पॉझेटिव्ह

451 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 13 : गत 24 तासात 23 मृत्युसह जिल्ह्यात 953 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 451 जणांनना कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 70, 70, 62, 78 वर्षीय पुरुष व 40, 56, 68, 76 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 52, 60, 65 वर्षीय महिला, पुसद येथील 53 वर्षीय पुरुष, पुसद तालुक्यातील 60 व 75 वर्षीय पुरुष, वणी येथील 70 वर्षीय पुरुष व 75 वर्षीय महिला उमरखेड तालुक्यातील 52 व 57 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, मारेगाव येथील 58 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 60 वर्षीय पुरुष, नागपूर तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष आणि हतगाव (जि. नांदेड) येथील 53 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 953 जणांमध्ये 600 पुरुष आणि 353 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 396 पॉझेटिव्ह रुग्ण, पुसद 168, उमरखेड 83, पांढरकवडा 49, आर्णि 43, दिग्रस 38, दारव्हा 35, नेर 29, महागाव 22, घाटंजी 20, वणी 19, बाभुळगाव 15, मारेगाव 15, झरी 10, राळेगाव 4, कळंब 3 आणि इतर शहरातील 4 रुग्ण आहे.

मंगळवारी एकूण 4232 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 953 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3279 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3786 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2051 तर गृह विलगीकरणात 1735 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 35591 झाली आहे. 24 तासात 451 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 31023 आहे. तर जिल्ह्यात एकूण 782 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.12 असून मृत्युदर 2.20 आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 320007 नमुने पाठविले असून यापैकी 317823 प्राप्त तर 2184 अप्राप्त आहेत. तसेच 282232 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

____________________

 

खाजगी कोव्हीड रुग्णालयातील अव्वाच्या सव्वा बिलाला बसणार आळा

जिल्हा प्रशासनाने नियुक्त केले ऑडीटर

यवतमाळ, दि. 13 : जिल्ह्यातील खाजगी कोव्हीड रुग्णालयात भरती असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून सदर रुग्णालये अव्वाच्या सव्वा रक्कम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या बाबीची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून खाजगी कोव्हीड रुग्णालयात ऑडीटर नियुक्त केले आहे. त्यामुळे अतिरिक्त आकारण्यात येणा-या बिलाला आता आळा बसणार असून रुग्णांना व नातेवाईकांना दिलासा मिळण्यास मदत होईल.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यामध्ये 17 खाजगी रुग्णालयांना डेडीकेटेड कोव्हीड केअर सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सदर खाजगी रुग्णालयात भरती असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून जादा रक्कम घेतल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांकडून कोणत्याही प्रकारचे जादा शुल्क आकारणी होऊ नये, याकरीता निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

तर 17 खाजगी रुग्णालयामध्ये ऑडीटर नेमण्यात आले आहेत. यात यवतमाळातील शहा हॉस्पीटल, साईश्रध्दा हॉस्पीटल, राठोड इन्सेटिव्ह केअर युनीट हॉस्पीटल, संजीवनी हॉस्पीटल, धवणे हॉस्पीटल, यवतमाळ कोव्हीड सेंटर, उजवणे हॉस्पीटल, क्रिटीकेअर हॉस्पीटल, महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, पुसद येथील मेडीकेअर हॉस्पीटल, आयकॉन हॉस्पीटल, चव्हाण हॉस्पीटल, लाईफ लाईन हॉस्पीटल, वडते हॉस्पीटल, दिग्रस येथील डॉ. संदीप दुधे हॉस्पीटल, आरोग्यधाम हॉस्पीटल आणि वणी येथील सुगम हॉस्पीटल यांचा समावेश आहे.

या खाजगी रुग्णालयामध्ये नेमण्यात आलेल्या ऑडीटरमार्फत दैनंदिन भरत होणा-या रुग्णांची माहिती घेणे, रुग्णालयातील उपलब्ध बेड संख्या, ॲक्टीव्ह रुग्ण, पॉझेटिव्ह रुग्ण, सुट्टी देण्यात आलेले रुग्ण यांची अद्ययावत माहिती ठेवणे, कोरोनाबाधित रुग्णांकडून शुक्ल आकारणी होते किंवा नाही याची पडताळणी करणे, तसेच परिपत्रकानुसार शुल्क आकारणी होत नसल्यास एकंदरीत बिलाची तपासणी करून शुल्क आकारणी निश्चित करणे, रुग्णालयातील कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णांचे देयके तपासल्याशिवाय त्यांना सुट्टी होणार नाही,याची खात्री करणे, कोरोनाबाधित रुग्णांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून जादा रक्कम घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास तेथेच त्यांच्या तक्रारींचे निरसन करणे, तसेच याबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सादर करणे आदी कार्यवाही करण्यात येणार आहे.

सदर आदेश जिल्हाधिका-यांच्या स्वाक्षरीने 12 एप्रिल रोजी जारी करण्यात आले आहे.

Copyright ©