यवतमाळ

गृहविलगीकरणासाठी आता रुग्णांना लिहून द्यावे लागणार बंधपत्र

 

मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक

यवतमाळ, दि. 12 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 10 टक्के कोरोनाबाधित रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्याचे निर्देशित केले आहे. परंतु गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांकडून कोरोना नियमावलींचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे आता गृहविलगीकरणाची मान्यता देतांना कोरोनाबाधित रुग्णाकडून बंधपत्र लिहून घ्यावे व त्यांच्याकडून नियमांचे पालन होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहे. तसेच गृहविलगीकरणातील रुग्णांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी व दुस-यांना उल्लंघन केल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे.

गृह विलगीकरणातील रुग्णांसाठी मार्गदर्शक सुचना : अतिदक्षतेकरीता विलगीकरणाचा कालावधी 17 दिवसांचा पाळणे जास्त परिणामकारक आहे. विलगीकरणाचा कालावधी रुग्णाच्या संपर्कात आल्याच्या शेवटच्या दिवसापासून धरावयाचा असतो. या कालावधीमध्ये रुग्णांनी दुस-या व्यक्तिंशी (घरातील व घराबाहेरील) संपर्कात येऊ नये. किंवा बाहेरील व्यक्तीस घरात येऊ देऊ नये. विलगीकरणामध्ये आपल्या अंगावरील कपडे, वापरलेला हातरुमाल, टॉवेल, नॅपकीन कोरडेच असतांना थेट कपडे धुणा-याच्या संपर्कात येणार नाही व त्यास प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सर्व कपडे साबणाच्या पाण्यात किंवा गरम पाण्यात टाकल्यास त्यापासून प्रादुर्भाव होणार नाही.

दोन माणसांमध्ये पाच ते सहा फुटांचे अंतर ठेवणे अतिशय परिणामकारक ठरते. बाधित रुग्णांनी मास्कचा वापर करावा आणि इतर लोकांपासून दूर राहावे. साबण व पाणी वापरून किंवा सॅनिटायझर वापरून साधारण प्रत्येक एक-दोन तासांच्या अंतराने हात स्वच्छ धुवावे. खोकलतांना किंवा शिंकतांना नाकावर व तोंडावर रुमाल अथवा टिश्यु पेपर धरावा. सकाळी व संध्याकाळी दिवसातून दोन वेळा ऑक्सीजन स्तर, ताप मोजून डॉक्टराला कळवावे. तसेच प्रकृतीमध्ये होणारे बदल व उद्भवणारी लक्षणे, ताप, श्वास घेण्यास त्रास आदी बाबी तातडीने डॉक्टरांना कळवावे. स्वत:चे पल्स ऑक्सीमीटर व थर्मोमीटर वापरावे.

वैद्यकीय अधिका-यांच्या सल्ल्यानुसार काळजीवाहू व्यक्ती व सर्व निकट संपर्कातील व्यक्तिंनी प्रोटोकॉलनुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्विनची मात्रा घ्यावी. गृहविलगीकरणातील रुग्णाच्या खोलीचे दार आतून बंद ठेवू नये. तसेच बाथरुम-संडासमध्ये जातांना दाराला आतून कडी लावू नये. भाजी, किराणा, दूध इत्यादी दैनंदिन गरजेच्या वस्तु आणण्यासाठी रुग्णाने स्वत: किंवा घरातील सदस्यांनी जाऊ नये. गृहविलगीकरणामध्ये राहणा-या रुग्णाने काळजी घेणारी एक व्यक्ती जवळ ठेवणे बंधनकारक आहे.

रुग्णाने व काळजीवाहू व्यक्तिंनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे. धाप लागणे, श्वासोच्छवास अडथळा निर्माण होणे, ऑक्जीन सॅचूरेशनमध्ये कमतरता, छातीमध्ये सतत दुखणे, वेदना होणे, संभ्रामावस्था / शुध्द हरपणे, अस्पष्ट वाचा / झटके, हात किंवा पायामध्ये कमजोरी किंवा बधिरता, ओठ / चेहरा निळसर पडणे यासारखी गंभीर लक्षणे / चिन्हे आढळून आल्यास त्वरीत वैद्यकीय मदत घ्यावी. कोरोनाबाधित व्यक्तिपासून उत्पन्न होणार जैवैद्यकीय कचरा स्वतंत्र ठेवावा व त्याला कोणत्याही परिस्थितीत इतर कच-यासोबत मिसळू नये, असे मार्गदर्शक सुचनांमध्ये म्हटले आहे.*******

 

अत्यावश्यक सेवांमध्ये अतिरिक्त बाबींचा समावेश

यवतमाळ, दि. 12 : यवतमाळ जिल्ह्याकरीता 30 एप्रिल 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत मार्गदर्शक सुचना लागू आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाकडून काही बाबींचे स्पष्टीकरण केल्यामुळे त्या बाबी जिल्ह्यासाठी लागू करण्यात आल्या आहेत. यात शेतीशी निगडीत शेती अवजारे, बियाणे, खते, इतर साहित्य व त्याची दुरुस्ती इत्यादी अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. अन्न या अत्यावश्यक सेवेमध्ये चिकन, मटन, अंडी, मच्छी दुकाने यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच दूरसंचार सेवा दुरुस्ती व देखरेख आणि गॅस वितरण यांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करण्यात आला असून त्यांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

परवानगी असलेल्या उत्पादन प्रक्रियेत आणि उत्पादन प्रक्रिया व उत्पादन चक्र पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणा-या सर्व सेवा सुरू ठेवण्यास मुभा राहील. 500 पेक्षा अधिक कामगार असलेल्या उद्योगातील कामगारांना सर्व मुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे आवश्यक राहील. तसेच उद्योगाच्या परिसराबाहेर ही सुविधा उभारून बाधित व्यक्तिंना त्या ठिकाणी हलवावे. मात्र बाधित व्यक्तिंचा इतरांशी संपर्क होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

आरटीपीसीआर टेस्टऐवजी ॲन्टीजन टेस्टची तपासणी करण्यास मुभा : सार्वजनिक वाहतूक, खाजगी वाहतूक जाहिरात, घरपोच सेवा, परीक्षा आयोजनाकरीता नेमलेला अधिकारी / कर्मचारी वर्ग, मंगल कार्यालयाच्या ठिकाणचा कर्मचारी वर्ग, खाद्यपदार्थ विक्रेते, कामगार, उत्पादक क्षेत्रात काम करणारे कामगार, ई-कॉमर्सचे कर्मचारी, परवानगी देण्यात आलेल्या बांधकामावरील कामगार व इतर क्षेत्र येथे काम करणा-या कर्मचारी / कामगार यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेशित करण्यात आले होते. परंतु आता आरटीपीसीआर चाचणीचा पर्याय म्हणून रॅपीड ॲन्टीजन चाचणी करण्याची मुभा देण्यात आली आहे.

एक खिडकी योजना राबवून विविध शासकीय सेवा पुरविणारे आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्र, सीएससी सेंटर, पासपोर्ट सेवा केंद्र, सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहील. वर्तमानपत्रे, मासिके, जर्नल आणि नियतकालिके यांचासुध्दा समावेश करण्यात आला आहे.

वरील आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिताचे कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियमांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद आहे.

 

 

फिरत्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनद्वारे व

लोककलेच्या माध्यमातून जनजागृती

अमरावती येथील क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोचा उपक्रम

जिल्हाधिका-यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

यवतमाळ दि. 12 : अमरावती क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो मार्फत कोविड-१९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यात बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. या अनुषंगाने फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, अमरावतीचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला, क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, लसीकरणाबाबत पारंपारिक कलेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंचसुत्रीच्या नियमांचे पालन करावे. यात नियमित मास्क वापरणे, सामाजिक अंतर, वारंवार हात स्वच्छ धुणे, लक्षणे असल्यास त्वरीत चाचणी आणि पात्र नागरिकाचे लसीकरण यांचा समावेश आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात 15 व्हॅनव्दारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड लसीकरण मोहिम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, अमरावतीच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, कळंब, दारव्हा, आर्णि, दिग्रस, महागाव, उमरखेड, पुसद आदी तालुक्यातील दररोज 10 गावांमध्ये 20 दिवस व्हॅनव्दारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत लसीकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविणे, हा या मागील उद्देश आहे. लसीकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना करून देण्यात येणार आहे.

यावेळी नवचैतन्य बहुदेशीय विकास मंडल आणि श्रीकृष्ण बहुदेशीय विकास मंडल, यवतमाळ कलापथकातील कलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण करून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाचे आणि जिल्हा माहिती कार्यालयाचे सहकार्य लाभले आहे.

Copyright ©