यवतमाळ

जिल्हाधिकारी आर्णि, महागाव व उमरखेडमध्ये ‘ऑनफिल्ड’

 

कोरोनासंदर्भात तालुकास्तरीय यंत्रणेचा घेतला आढावा

यवतमाळ, दि. 9 : जिल्ह्यातील विविध तालुक्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता तालुकास्तरीय यंत्रणेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आर्णि, महागाव व उमरखेड मध्ये जाऊन आढावा घेतला.

आर्णि तालुक्यातील भंडारी येथील कोव्हीड केअर सेंटरला त्यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच भरती असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांच्या काही अडअडचणी असल्यास त्याचे तात्काळ निराकरण करावे. तालुक्याचा पॉझिटीव्हीटी दर कमी करण्यासाठी टेस्टिंग वाढविणे आवश्यक आहे. तालुक्याला दिलेल्या टेस्टिंगच्या उद्दिष्टाप्रमाणे येत्या आठ दिवसांत पॉझिटीव्हीटी दर 5 पर्यंत आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. लसीकरणाबाबत बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, लसीकरण नियोजनबध्द पध्दतीने करा. कोणतीही लस वाया जाणार नाही, याची दक्षता घ्या. तसेच प्रतिबंधित क्षेत्र धोरण कडकपणे राबवा. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नागरिकांमध्ये शासन आणि प्रशासनाच्या सुचनांबाबत (नियमित मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन, सॅनिटायझरचा उपयोग) जनजागृती करा तसेच नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक दंडात्मक कारवाई करा, अशा सुचना त्यांनी दिल्या.

लवकर निदान तसेच टेस्टिंग झाले आणि वेळेवर उपचार मिळाला तर नक्कीच रुग्णसंख्येला आळा बसेल. परिणामी मृत्युदर कमी होण्यास मदत होईल. त्या दृष्टीने नियोजन करा. प्रशासनाच्यावतीने ‘आम्ही यवतमाळकर……मात करू कोरोनावर’ ही मोहीम यशस्वीपणे राबवा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसीलदार परसराम भोसले, तालुका आरोग्य अधिकारी श्यामसुंदर शिंदे, गटविकास अधिकारी आनंद लोहकरे, ठाणेदार पितांबर जाधव आदी उपस्थित होते.

उमरखेड येथे भेट व आढावा : उमरखेड येथील तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, सर्व पॉझिटीव्ह रुग्णांना कोव्हीड केअर सेंटरला दाखल करा. पॉझिटीव्हीटी दर पाच टक्यांपेक्षा कमी करणे व मृत्युदर 0.5 टक्के आणणे याला प्राधान्य द्या. यावेळी त्यांनी मरसूळ येथील कोव्हीड केअर सेंटर व उमरखेड येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.

बैठकीला उमरखेडचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, तहसीलदार आनंद देऊळगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे, मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कपाळे, ठाणेदार संजय चौबे आदी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

निमित्त मार्गदर्शक सुचना

यवतमाळ, दि. 9 : परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यावर्षी दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी साजरी केली जाणार आहे. सध्या कोविड – 19 च्या दुस-या लाटेमुळे उद्भवलेल्या अतिसंसर्गजन्य परिस्थितीचा व वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत.

यावर्षी कोविड -19 चा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणे अपेक्षित आहे. विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एकावेळी 5 पेक्षा जास्त नसावी. तसेच तेथे सोशल डिस्टंन्सींगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पालन करण्यात यावे.

कोविड – 19 विषाणूच्या पार्श्वभुमीवर चैत्यभुमी, दादर येथे गर्दी करण्यास निर्बंध असल्याने व दादर, मुंबई तसेच महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकावरही गर्दी करण्यास निर्बंध असल्याने शासनातर्फे जयंती निमित्त चैत्यभुमी येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळै सर्व अनुयायींनी चैत्यभुमी येथे न येता घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. जयंती साजरी करतांना सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जयंती निमित्ताने करण्यता येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्कद्वारे अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आरोग्यविषयक उपक्रम, शिबीरे (उदा. रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पुर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याद्वारे कोरोना, मलेरीया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल, असे शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे.

Copyright ©