यवतमाळ

सहा मृत्युसह 556 पॉझेटिव्ह ; 423 जण बरे

 

यवतमाळ, दि. 8 : गत 24 तासात जिल्ह्यात सहा मृत्युसह 556 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 423 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 48, 65, 65, 70 वर्षीय पुरुष तसेच 57 वर्षीय महिला, आणि वणी तालुक्यातील 62 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच बुधवारी पॉझेटिव्ह आलेल्या 556 जणांमध्ये 353 पुरुष आणि 203 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 211 पॉझेटिव्ह रुग्ण, पुसद 100, उमरखेड 47, दिग्रस 36, महागाव 24, पांढरकवडा 22, वणी 20, दारव्हा 16, नेर 16, बाभुळगाव 14, कळंब 13, आर्णि 11, झरीजामणी 7, घाटंजी 4, राळेगाव 1 आणि इतर शहरातील 12 रुग्ण आहे.

गुरुवारी एकूण 3871 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 556 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3315 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3167 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1648 तर गृह विलगीकरणात 1519 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 32185 झाली आहे. 24 तासात 423 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 28303 आहे. तर जिल्ह्यात एकूण 715 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.71 असून मृत्युदर 2.22 आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 300554 नमुने पाठविले असून यापैकी 298666 प्राप्त तर 1888 अप्राप्त आहेत. तसेच 266481 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

०००००००

 

12 एप्रिलपासून जिल्ह्यात ‘आम्ही यवतमाळकर, मात करू

कोरोनावर’ अभियान

यवतमाळ, दि. 8 : जिल्ह्यात प्रत्येक गावात ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समिती तर प्रत्येक नगर पालिका क्षेत्रामध्ये नागरी कोरोना नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समिती मार्फत ‘आम्ही यवतमाळकर मात करू कोरोनावर’ ही विशेष मोहीम जिल्ह्यामध्ये 12 एप्रिल ते 19 एप्रिल 2021 या कालावधीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

सदर मोहिमेअंतर्गत ग्रामस्तरावर व नगरपालिका स्तरावर पथकांची निर्मिती करणे व या पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरीकांच्या आरोग्याबाबत सर्वेक्षण करण्यात यावे. त्यामध्ये कोविड – 19 पंचसुत्री, यात मास्कचा सतत वापर करणे, सुरक्षित अंतर, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे, लक्षणे असल्यास / सकारात्मक रुग्णांच्या संपर्कात आल्यास तात्काळ चाचणी करणे, 45 वर्ष पूर्ण झालेल्या पात्र व्यक्तींचे लसीकरण करणे, याबाबत जनजागृती करण्यात यावी.

तसेच दिलेल्या विवरणपत्रात सर्वेक्षणाबाबत माहिती घेऊन दैनंदिनरित्या जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी, असे आदेशात नमुद आहे. यात खालील बाबींचा समावेश असावा. कुटुंबातील व्यक्तींना ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास इत्यादी लक्षणे आढळून येत आहे काय, वृध्द, दिव्यांग, सहव्याधीने ग्रस्त व्यक्ती यांना काही त्रास आढळून येत आहे काय, कुटुंबातील कोणी व्यक्ती कोविड – 19 रुग्णांच्या संपर्कात आला आहे का तसेच त्यांना लक्षणे आहे काय, कुटुंबातील 45 वर्षावरील पात्र सदस्यांनी लसीकरण केले आहे काय. सर्वेक्षणादरम्यान एखाद्या व्यक्तीमध्ये कोविड 19 लक्षणे आढळून आल्यास त्यांची तात्काळ वैद्यकीय तपासणी करून उपचाराबाबत कार्यवाही करावी व दैनंदिन अहवाल सादर करावा, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेशात म्हटले आहे.

०००००

 

ज्वारी, मका व गहू खरेदीकरीता 30एप्रिल पर्यंत ऑनलाईन नोंदणी

यवतमाळ, दि. 8 : आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम 2020-21 मध्ये राज्य शासनामार्फत ज्वारी, मका व गहू खरेदीकरीता शेतकऱ्यांची नोंदणी करण्याकरीता महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. मार्फत 8 खरेदी केंद्र व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यवतमाळ मार्फत 2 खरेदी केंद्र उघडण्यात आले आहे.

यात तालुका खरेदी विक्री समिती दिग्रस, तालुका खरेदी विक्री समिती उमरखेड, तालुका खरेदी विक्री समिती महागाव, तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा, तालुका खरेदी विक्री समिती वणी, बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रीया सहकारी संस्था पाटण ता. झरी, किसान मार्केट यार्ड शेलू (बु.) पुसद, शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपूर आर्णी, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ (संस्थेमार्फत) कळंब आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ (संस्थेमार्फत) यवतमाळ चा समावेश आहे.

जिल्ह्यातील ज्वारी, मका व गहू खरेदीकरीता ऑनलाईन नोंदणी 1 ते 30 एप्रिल 2021 पर्यंत करण्यात येत आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे (आधारकार्ड, 7/12 उतारा, पिकपेरा व बँकेचे पासबुकची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत) संबंधीत खरेदी केंद्रावर देवून ज्वारी, मका व गहू खरेदीकरीता ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे यांनी केले आहे.

०००००

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उपकेंद्राकरीता सूचना निर्गमित

यवतमाळ, दि. 8 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 11 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2020 आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेच्या उपकेंद्राच्या कामामध्ये अडचणी निर्माण होऊ नये म्हणून सूचना निर्गमित केल्या असून सदर सूचना यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ शहर व दारव्हा शहर येथील उपकेंद्राकरीता खालीलप्रमाणे लागू करण्यात येत आहे.

ह्या परीक्षेकरीता निश्चित करण्यात आलेली शाळा, महाविद्यालय ह्या परीक्षेच्या पूर्व तयारीकरीता तसेच परीक्षेच्या प्रत्यक्ष आयोजनाकरीता खुली ठेवण्यास अनुमती देण्यात येत आहे. या परीक्षेच्या कामाकरीता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या नेमणुकाचे आदेश प्रवासाकरीता पास म्हणून ग्राह्य धरण्यात यावेत. तसेच सेवा पुरवठादार संस्थेच्या प्रतिनिधींना आयोगामार्फत जारी करण्यात आलेल्या पत्राच्या आधारे प्रवासासाठी तसेच संबंधित परीक्षा उपकेंद्रावर पोहचण्यासाठी अनुमती देण्यात येत आहे.

परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच सेवा पुरवठादार संस्थेच्या प्रतिनिधींना परीक्षेसंदर्भातील आवश्यक व्यवस्था करण्याकरीता संबंधित परीक्षा उपकेंद्रावर जाण्यास परवानगी देण्यात येत आहे. या परीक्षेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व संबंधितांना तसेच संबंधीत उमेदवारांना टाळेबंदी कालावधीत प्रवासासाठी मुभा देण्यात येत आहे. परीक्षेकरीता बसलेले उमेदवार, सेवा पुरवठादार संस्थेचे प्रतिनिधी अथवा पर्यवेक्षकीय अधिकारी, कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय निर्माण होणार नाही, ह्याची पोलीस विभागाने दक्षता घ्यावी

कलम 144 लागू : दिनांक 11 एप्रिल 2021 रोजी परीक्षेच्या दिवशी परीक्षा चालू असतांना सकाळी 8 वा ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परीसरात प्रवेश करता येणार नाही. तसेच परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परीसरापासून 200 मीटर पर्यंतची सर्व झेरॉक्स केंद्र चालू ठेवण्यास याद्वारे प्रतिबंध करण्यात येत आहे. हा आदेश जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने 7 एप्रिल 2021 पासून देण्यात आला आहे.

Copyright ©