यवतमाळ

सात मृत्युसह 327 जण पॉझेटिव्ह ; 337 कोरोनामुक्त

सात मृत्युसह 327 जण पॉझेटिव्ह ; 337 कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 6 : गत 24 तासात जिल्ह्यात सातमृत्युसह 327 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 337 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 62 व 72 वर्षीय पुरुष तसेच 58 वर्षीय महिला, महागाव 61 व 82 वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष, वणी येथील 78 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 327 जणांमध्ये 207 पुरुष आणि 120 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 106 पॉझेटिव्ह रुग्ण, उमरखेड 61, महागाव 29, पुसद 23, कळंब 14, नेर 14, झरीजामणी 14, घाटंजी 11, आर्णि 11, वणी 10, दारव्हा 9, दिग्रस 8, पांढरकवडा 5, बाभुळगाव 4 आणि इतर शहरातील 8 रुग्ण आहे.

मंगळवारी एकूण 3393 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 327 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3066 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3102 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1596 तर गृह विलगीकरणात 1506 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 31279 झाली आहे. 24 तासात 337 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 27476 आहे. तर जिल्ह्यात एकूण 701 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.71 असून मृत्युदर 2.24 आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 291981 नमुने पाठविले असून यापैकी 289095 प्राप्त तर 2886 अप्राप्त आहेत. तसेच 257816 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

०००००००

 

अत्यावश्यक सेवेत समाविष्ट बाबींना मुभा

यवतमाळ, दि. 6 : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून मुख्य सचिवांनी लॉकडाऊन (ब्रेक द चेन) ची घोषणा केली असून त्यानुसार यवतमाळ जिल्ह्याकरीता अधिसूचना जारी केली आहे. तसेच काही आवश्यक सेवांचा समावेश व काही बाबींना मुभा देण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्याकरीता सुट देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवामध्ये व काही बाबींना खालीलप्रमाणे मुभा देण्यात येत आहे. यात पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधीत उत्पादने, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, डेटा सेंटर, क्लाऊड सेवा पुरविणारे पुरवठादार, माहिती तंत्रज्ञान संबंधित पायाभुत सेवा, शासकीय व खाजगी सूरक्षा सेवा, फळविक्रेते या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

खालील खाजगी आस्थापना व कार्यालये सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र भारत सरकारच्या दिशा निर्देशानुसार त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शासन मार्गदर्शन सूचनेतील पात्रतेनुसार लवकरात लवकर लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. सेबी व सेबी मान्यताप्राप्त संस्था जसे की स्टॉक मार्केट, डिपॉझीट आणि क्लिअरींग महामंडळे व सेबी अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या मध्यस्था संस्था. सर्व नॉन बँकींग वित्तीय महामंडळे, सर्व सुक्ष्म पतपुरवठा संस्था, सर्व अधिवक्ता यांचे कार्यालये, जकात, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर (लस, औषधी, जीवरक्षक औषधांशी संबंधीत वाहतूक). ज्या व्यक्ती रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत तसेच शनिवारी व रविवारी रेल्वेने, बसेस, विमानाने प्रवास करीत असतील तर त्याला अधिकृत टिकीट बाळगावे लागेल. जेणेकरून संचारबंदीच्या कालावधीत स्थानकापर्यंत किंवा घरापर्यंत प्रवास करू शकेल.

औद्योगिक कामगारांना त्यांच्या कामाच्य ठिकाणी जाणे – येणे करण्याची व कामाच्या पाळीनुसार हजर होण्याकरीता आवश्यकतेनुसार खाजगी बसेस, खाजगी वाहने यांच्या सहाय्याने त्यांचे वैध ओळखपत्र दाखवून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच शनिवारी व रविवारी प्रवासात मुभा राहील. प्रार्थना स्थळे सद्यास्थितीत नागरिकांना बंद करण्यात आलेली आहेत, परंतु प्रार्थना स्थळामध्ये सेवा देणारे व्यक्ती त्यांच्या सेवा आणि धार्मिक कार्य चालू ठेवतील. प्रत्यक्ष परिक्षेला हजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे परिक्षेचे वैध ओळखपत्र दाखवून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच शनिवारी व रविवारी या कालावधीत प्रवास करायचा असेल तर मुभा राहील.

आठवड्याचा शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी संचारबंदीच्या दरम्यान विवाह समारंभ असल्यास स्थानिक प्राधिकरणांने त्यासंदर्भात जिल्ह्यातील कोविड स्थिती लक्षात घेवून दिनांक 4 एप्रिलमध्ये नमुद असलेल्या अटी व शर्ती नुसार परवानगी देण्याची कार्यवाही करावी. ह्यासाठी संबंधीत तालुक्याचे तहसिलदार यांना परवानगी देण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे.

घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी इ. लोकांच्या सेवाबाबत यांच्या रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच शुक्रवारी रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ये – जा करण्याच्या बाबतीत स्थानिक प्राधिकरण योग्य तो निर्णय घेईल. सदर आदेशाचे भंग करणाऱ्या व्यक्तिवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 कलमानुसार कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे.

सदरचे आदेश हे आदेशाच्या दिनांकापासून 30 एप्रिल 2021 चे 23.59 वाजेपर्यंत संपूर्ण यवतमाळ शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे

 

पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील

यवतमाळ, दि. 6 : कोविड रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून सदर रुग्णांकरीता रेमडीसीवीर इतर संस्थेकडून उपलब्ध करून घेण्यात येत आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत वित्तीय मर्यादेत खरेदी करून गरजू रुग्णांना देण्यात येत आहे. जिल्ह्यातील रेमडीसीवीरबाबत हाफकीन महामंडळ, मुंबई यांच्याकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यांच्याकडून काही प्रमाणात साठा प्राप्त झाला आहे. पुरेसा औषधी साठा उपलब्ध ठेवण्याबाबत प्रशासन सतत प्रयत्न करीत असून पाठपुरावा सुरू आहे.

शासनाच्या धोरणानुसार कोविड – 19 रुग्णांकरीता लागणारी औषधी जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल अधिकारी यांनी पुरवठा करावा, असे निर्देश प्राप्त झाले आहे. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक तथा नोडल अधिकारी यांच्याकडे मागणी पाठविण्यात आली आहे. परंतु त्यांच्याकडून अत्यल्प प्रमाणात पुरवठा झाला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता औषधी भांडाराने इतर संस्थेकडून उसनवारी तत्वावर रेमडीसीवीर प्राप्त करून घेतले व गरजू रुग्णांना पुरवठा करण्यात आलेला आहे.

यात 1 जानेवारी रोजी जिल्हा शल्यचिकित्सक परभणी येथून 192 व्हायल्स, 16 जानेवारी जिल्हा शल्य चिकित्सक कोल्हापुर येथून 384 व्हायल्स, 5 फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथून 10 व्हायल्स, 11 फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय पुसद येथून 9 व्हायल्स, 5 मार्च रोजी जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली येथून 48 व्हायल्स, 25 सप्टेंबर 2020 रोजी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथून 40 व्हायल्स, 3 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथून 100 व्हायल्स, 5 फेब्रुवारी 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सोलापूर येथून 1 हजार व्हायल्स, 11 फेब्रवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथून 432 व्हायल्स उपलब्ध झाल्या होत्या.

सध्यास्थितीत महाराष्ट्रात कोविड – 19 रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता इतर संस्थेकडेही रेमडीसीवीर 100 एमजी औषधीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे इतर संस्थेकडूनही सदर औषधी प्राप्त होवू शकत नाही. सदर औषधीचे खरेदी आदेश दरपत्रकावर किमान दराने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत वित्तीय मर्यादेत खरेदी करून गरजू रुग्णांना पुरवठा करण्यात येत आहे. याबाबत हाफकीन महामंडळ, मुंबई यांच्याकडे मागणी नोंदविण्यात आली, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आहे.

_____________________

19 एप्रिलचा महिला लोकशाही दिन रद्द

Ø ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 6 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने एप्रिल महिन्यातील तिसऱ्या सोमवारी 19 एप्रिल 2021 रोजी होणारा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. तथापी dwomenchild@yahoo.com या ईमेलद्वारे अर्ज स्विकारून त्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. जिल्ह्यातील तक्रारग्रस्त महिलांनी सदर महिला लोकशाही दिनी आपल्या तक्रारी मांडाव्यात.

महिला लोकशाही दिनात तक्रार / निवेदने वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर, न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राची प्रती न जोडलेल्या अर्ज, सेवा विषयक, आस्थापनाविषयक बाबी स्विकारले जाणार नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

___________________________

आधार लिंक करून शिष्यवृत्तीचे अर्ज 15 एप्रिलपूर्वी भरण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 6 : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत देण्यात येणारी अनु.जाती, इमाव, विजाभज, विमाप्र मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशीप संबंधीत सर्व योजनाचे कामकाज https://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर करण्यात येते. या अनुषंगाने लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकांची बँक खात्याशी संलग्न करून सन 2020-21 चे अर्ज 15 एप्रिल 2021 पूर्वी भरण्यात यावेत व तसेच परीपूर्ण भरलेले अर्ज 15 एप्रिल पूर्वी सादर करण्यात यावेत.

विद्यार्थी सदर लाभापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील. तसेच पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क घेता येणार नाही, याची नोंद घ्यावी. संबंधीत विद्यार्थ्यांनीसुध्दा अर्जाची नोंदणी करून अर्ज महाविद्यालयास सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.

__________&_&____&___

यवतमाळ, दि. 6 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरून दिनांक 10 एप्रिल 2021 रोजी यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. परंतु आता 10 एप्रिल रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालत पुढील आदेश होईपर्यंत तहकूब करण्यात आल्याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, यवतमाळ या कार्यालयास कळविण्यात आले आहे.

संबंधित सर्व पक्षकारांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.आर.ए. शेख आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष जे.एम. बारडकर यांनी केले आहे.

 

Copyright ©