यवतमाळ

ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सुचना

 

यवतमाळ जिल्‍हयाकरीता मार्गदर्शक सूचना दिनांक 15 एप्रिल 2021 च्‍या मध्‍यरात्री पर्यंत लागू करण्‍यात आल्‍या होत्‍या. मात्र आता मुख्‍य सचिव यांच्या आदेशान्वये महाराष्‍ट्रात दिनांक 30 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत ‘ब्रेक दि चेन’ (Break The Chain) अंतर्गत जिल्‍हयातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता संपूर्ण जिल्‍हयासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना लागू करण्‍यात आल्या आहेत.

जिल्‍हयात सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत जमावबंदी लागू करण्‍यात येत आहे. (सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना जमा होता येणार नाहीत.) सोमवार ते शुक्रवार रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत तसेच शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी (Curfew) लागू करण्‍यात येत आहे. कोणत्‍याही व्‍यक्‍तीस अत्‍यावश्‍यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. तथापि वैद्यकीय व इतर अत्‍यावश्‍यक सेवा यांना मुभा राहील.

अत्‍यावश्‍यक सेवामध्‍ये पुढील गोष्‍टींचा समावेश होईल. : रुग्‍णालये, औषधी दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने व त्‍यांची औषधाची दुकाने, आरोग्‍य विमा कंपनीची कार्यालये, औषध निर्मिती करणारे कारखाने व इतर आरोग्‍य विषयक सेवा यांना 24X7 सुरु ठेवण्‍यास मुभा राहील. किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, दुध विक्री, बेकरी, मिठाई दुकाने, धान्‍याची दुकाने, पशुखाद्य दुकाने. सार्वजनिक वाहतूक (रेल्‍वे, टॅक्‍सी, अॅटो व सार्वजनिक बसेस), स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थामार्फत होणारी मान्‍सुनपुर्व कामे, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था मार्फतच्‍या सर्व सार्वजनिक सेवा, माल वाहतूक, शेतीविषयक सेवा, ई-कॉमर्स सेवा, अधिकृत प्रसारमाध्‍यमे (Media), स्‍थानिक आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकारी यांचे कडून घोषित केलेल्‍या अत्‍यावश्‍यक सेवा. सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने सोमवार ते शुक्रवार रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. तसेच शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील.

सर्व दुकाने, बाजारपेठा व मॉल्‍स दिनांक 30 एप्रिल पर्यंत बंद राहतील.

अत्‍यावश्‍यक सेवा देणा-या दुकानांनी सामाजिक अंतर (Social Distancing) व त्‍यांच्या दुकानांचा परिसर व दुकानात सामाजिक अंतराचे पालन केले जाईल, याची दक्षता घ्‍यावी. दुकानाबाहेर सुध्‍दा सामाजिक अंतर राखण्‍याच्‍या अनुषंगाने व्‍यवस्‍था व शक्‍य तेथे मार्किंग करावी. अत्‍यावश्‍यक सेवांच्या दुकान मालकांनी व सदर दुकानातील कामगार यांनी कोवीड-१९ चे लसीकरण तात्‍काळ करुन घेणे बंधनकारक राहील.

सार्वजनिक वाहतूक सेवा खालील निर्बंधासह सुरु राहतील.: अॅटो रिक्‍शा वाहन चालक + २ प्रवासी

टॅक्‍सी (चार चाकी) वाहन चालक + ५० टक्‍के वाहनाची क्षमता, बस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्‍या परवान्‍यानूसार पुर्ण क्षमतेसह वाहतूक सुरु राहील. तथापी बसमध्ये कोणालाही उभे राहुन प्रवास करण्‍यास प्रतिबंध राहील. सार्वजनिक वाहतूकीतून प्रवास करतांना सर्वांनी योग्‍य पध्‍दतीने मास्‍क वापरने बधनकारक आहे. असे न आढळल्‍यास त्‍यांच्यावर शासकीय पथकाव्‍दारे 500 रुपये प्रती व्‍यक्‍ती दंड आ‍कारण्‍यात येईल. सार्वजनिक वाहतूकीच्‍या वाहनांच्‍या प्रत्‍येक फेरीनतंर त्‍या वाहनांचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. सार्वजनिक वाहतूकीच्‍या वाहनांचे चालक व इतर कर्मचारी त्‍यांनी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार पात्रतेनुसार तात्‍काळ लसीकरण करुन घेण्‍यात यावे आणि लसीकरण करेपर्यंत 15 दिवस वैध असलेले कोरोना निगेटीव्‍ह प्रमाणपत्र सेाबत बाळगावे. हे नियम दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून लागू राहील.

खालील खाजगी कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.

सहकारी, बॅंका, शासनाचे सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी बॅंका, बीएसई/एनएसई, विदयुत पुरवठा करणा-या कंपन्‍या, टेलीकॉम सेवा पुरविणारे कार्यालय, विमा व वैद्यकीय विमा कंपनी, उत्‍पादन व वितरणच्‍या अनुषंगाने औषध कंपनी कार्यालये. शासकीय कार्यालये मंजुर क्षमतेच्‍या 50 टक्‍के उ‍पस्थितीत सुरु राहतील. कोरोना विषयाचे अनुषंगाने काम करणारी कार्यालये 100 टक्‍के क्षमतेने सुरु राहतील. विज, पाणी, बॅंकीग व ईतर वित्‍तीय सेवा देणारे सर्व शासकीय कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु राहतील. शासकीय कार्यालय किंवा शासकीय कंपनी मध्‍ये कोणत्‍याही अभ्‍यागतांना प्रवेश करता येणार नाही. शासकीय आणि खाजगी कार्यालयामध्‍ये लवकरात लवकर भारत सरकारचे मार्गदर्शक सूचनांनुसार पात्रतेनुसार लसीकरण करणे बंधनकारक आहे.

खाजगी वाहन ज्‍यामध्ये खाजगी बसेसचा समावेश आहे त्‍या सर्व सामान्‍यपणे सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत सोमवार ते शुक्रवार पर्यंत चालू राहील. चित्रपटगृहे बंद राहतील. नाटयगृहे आणि सभागृहे बंद राहतील. मनोरंजन पार्क/आर्केड / व्हिडीओ गेम पार्लर बंद राहतील. क्‍लब, जलतरण तलाव, जिम आणि क्रिडा संकुल बंद राहतील. निवासी हॉटेलच्‍या अंतर्गत भागात असलेले उपहार गृह सोडून ईतर सर्व उपहारगहे, बार आणि हॉटेल बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार पावेतो सकाळी 7 ते रात्री 8 पावेतो उपहारगृहामध्‍ये येऊन खादय पदार्थ घेऊन जाणे, पार्सल सुविधा व होम डिलेव्‍हरी सेवेला परवानगी राहील. आठवडयाच्‍या शेवटी सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत फक्‍त होम डिलेव्‍हरी सेवेला परवानगी राहील.

सर्व धार्मिक व प्रार्थना स्‍थळे बंद राहतील. सर्व सलुन /स्‍पॉ/ब्‍युटी पार्लर दुकाने बंद राहतील. सलुन /स्‍पॉ/ब्‍युटी पार्लर मधील सर्व कर्मचारी यांचे शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार पात्रतेनुसार लवकरात लवकर लसीकरण करणे बंधनकारक राहील जेणेकरुन सलुन /स्‍पॉ/ब्‍युटी पार्लर पुन्‍हा सुरु करणे सोयीचे होईल.

वर्तमानपत्रे छापन्‍याची व वाटप करण्‍याची मुभा राहील. सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपावेतो आठवडयातील सर्व दिवशी वर्तमान पत्राची होम डिलेव्‍हरी करण्‍याची मुभा राहील. सर्व शाळा व महाविद्यालये बंद राहतील. हा नियम 10 वी व 12 वीच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या परिक्षांना लागू होणार नाही. सर्व प्रकारचे खाजगी शिकवणी वर्ग बंद राहतील. कोणत्‍याही धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्‍कृतीक कार्यक्रमास परवानगी राहणार नाही.

लग्न समारंभ जास्‍तीत जास्‍त 50 व्‍यक्‍तीच्‍या उपस्थितीत करण्‍याची परवानगी राहील. सदरची परवानगी हि संबधीत मुख्‍याधिकारी/तहसिलदार यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. मंगल कार्यालय हॉलच्‍या सर्व कर्मचा-यांचे लसीकरण करणे बंधनकारक राहील. अंत्‍यविधी जास्‍तीत जास्‍त 20 व्‍यक्‍तींच्‍या उपस्थितीत करण्‍याची परवानगी राहील.

उत्‍पादक क्षेत्र खालील अटींसह कार्यरत राहतील. : कारखाने आणि उत्‍पादक युनिट यांनी कामगारांचे प्रवेशाच्‍या वेळेस त्‍यांचे शरीराचे तापमानाची तपासणी करणे आवश्‍यक आहे. उत्‍पादक क्षेत्रातील सर्व कार्यरत कर्मचारी यांनी लवकरात लवकर लसीकरण करणे बंधनकारक राहील. जर एखादा कामगार किंवा कर्मचारी पॉझीटीव्‍ह आल्‍यास त्‍यांच्‍या संपर्कात येणा-या सर्व कर्मचा-यांना वेतनासह विलगिकरण करणे आवश्‍यक आहे.

जी कारखाने/युनिटे 500 कामगारापेक्षा जास्‍त संख्‍येने कार्यरत आहेत त्‍यांनी त्‍यांची स्‍वतःची विलगिकरण व्‍यवस्‍था करणे आवश्‍यक आहे.

ऑक्‍सीजन उत्‍पादक : एखादया कारखान्‍यामध्‍ये ऑक्‍सीजन कच्‍चा माल म्‍हणून वापरत असेल तर त्‍यावर दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून वापरावर बंदी घालण्‍यात येत आहे. ऑक्‍सीजन निर्माण करणारे सर्व उद्योजकांनी त्‍यांच्‍या उत्‍पादनाच्‍या 80 टक्‍के ऑक्‍सीजन वैद्यकीय व औषधी निर्माण करणा-या कारणाकरीता राखीव ठेवण्‍यात यावा.

कोणत्‍याही सहकारी संस्‍थेमध्‍ये पाचपेक्षा जास्‍त कोरोना पॉझीटीव्‍ह रुग्‍ण आढळून आल्‍यास सदर संस्‍था हि सुक्ष्‍म प्रतिबंधीत क्षेत्र (Micro Containment ) समजण्‍यात येईल. अशा संस्‍था त्‍यांच्‍या प्रवेश व्‍दाराजवळ नोटिस बोर्ड लावून प्रवेश करणा-या व्‍यक्‍तींना व भेट देणा-या व्‍यक्‍तींना याबाबत माहिती देईल आणि त्‍यांना प्रवेश नाकारेल. सुक्ष्‍म प्रतिबंधीत क्षेत्रास लागू असणारे सर्व निर्बंध येणा-या व जाणा-या व्‍यक्‍तीवर नियंत्रण ठेवून त्‍यावर लक्ष ठेवण्‍याची जबाबदारी सदर संस्‍थेची राहील. जर अशा संस्‍थेने यामध्‍ये कसूर केल्‍यास प्रथम गुन्‍हयासाठी रु. दहा हजार रुपये दंड करण्‍यात येईल.

बांधकामाबाबत सुचना : ज्‍या कामाच्‍या ठिकाणी मजूरांची राहण्‍याची व्‍यवस्‍था आहे असी कामे सुरु ठेवण्‍यास मुभा रा‍हील. तसेच सदर कामावर बांधकाम विषयक सामान ने-आण करण्‍याव्‍यतिरिक्‍त ईतर व्‍यक्‍तींची बाहेरुन येणे-जाणे करण्‍यास प्रतिबंध राहील. जर एखादा कामगार कोवीड-१९ पॉझीटीव्‍ह आला असल्‍यास तो किंवा तिला वैद्यकीय रजेची परवानगी राहील आणि अशा कामगाराला या कारणासाठी अनुपस्थित राहील्‍याचे कारणाने काढून टाकता येणार नाही. अशा कामगाराला जर तो कोरोना बाधीत झाला नसता तर त्‍याने किंवा तिने जेवढे उत्‍पन्‍न मिळविले असते त्‍या उत्‍पन्‍नाप्रमाणे त्‍याला किंवा तीला सदर कालावधीतील पुर्ण वेतन देय राहील.

सदर आदेशात नमुद संपुर्ण निर्देशांचे तंतोतंत पालन होते किंवा नाही, याबाबी तपासून आवश्‍यक कायदेशीर व दंडात्‍मक कारवाई करण्‍यास खालील यंत्रणेस प्राधिकृत करण्‍यात येत आहे.

नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रात : नगरपरिषद/नगरपंचायत व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत.

गावपातळीवर : ग्रामपंचायत व पोलीस विभागांचे संयुक्‍त पथक गठीत करावेत.

सदर आदेश सोमवार दिनांक 5एप्रिल, 2021 च्‍या रात्री 8 वाजेपासून ते दिनांक 30 एप्रिल, 2021 च्‍या मध्‍यरात्रीपर्यंत लागू राहील. वरिल आदेशांचे उल्‍लंघन करतील त्‍यांचेवर आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम, 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897 , भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 व इतर संबधित कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्‍यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

Copyright ©