यवतमाळ

दहा मृत्युसह 301 जण पॉझेटिव्ह ; 345 कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 5 : गत 24 तासात जिल्ह्यात दहा मृत्युसह 301 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 345 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 54 व 63 वर्षीय पुरुष तसेच 53, 72 व 76 वर्षीय महिला, दारव्हा येथील 71 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 78 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 68 वर्षीय पुरुष, नेर येथील 55 वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 310 जणांमध्ये 189 पुरुष आणि 112 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 125 पॉझेटिव्ह रुग्ण, पुसद येथील 32, दिग्रस 26, उमरखेड 25, पांढरकवडा 20, बाभुळगाव 16, घाटंजी 11, वणी 11, नेर 10, आर्णि 8, दारव्हा 5, कळंब 5, महागाव 3, मारेगाव 1 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे.

सोमवारी एकूण 2651 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 301 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2350 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3119 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1584 तर गृह विलगीकरणात 1535 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 30952 झाली आहे. 24 तासात 345 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 27139 आहे. तर जिल्ह्यात एकूण 694 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.75 असून मृत्युदर 2.24 आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 287991 नमुने पाठविले असून यापैकी 285702 प्राप्त तर 2289 अप्राप्त आहेत. तसेच 254750 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

__________________

अतिरिक्त शुल्काच्या तक्रारीसाठी आता

मेल आयडी व व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध

यवतमाळ, दि. 5 : शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराकरीता खाजगी रुग्णालयांना डेडीकेटेड कोव्हिड हॉस्पीटल म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. मात्र या रुग्णालयांमध्ये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अभ्यांगत, तक्रारदार यांना कार्यालयात येण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे अतिरिक्त शुल्काबाबतच्या तक्रारी आता मेल आयडी किंवा व्हॉट्सॲप क्रमांकावर स्वीकारले जाणार आहेत. प्रशासनाने याकरीता संबंधित मेल आयडी व व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

खाजगी रुग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्णांकडून उपचाराकरीता घ्यावयाचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. परंतु काही खाजगी रुग्णालयाकडून कोरोनाबाधित रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क घेतल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. या अनुषंगाने नागरिकांच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त होवून कमीत कमी कालावधीत तक्रारीचे निराकरण व्हावे याकरीता covid१९takrar@gmail.com हा ईमेल आयडी व 7276190790 हा व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नागरीकांनी अतिरिक्त स्वरुपात शुल्क घेतल्याची तक्रार वरील ईमेल आयडी / व्हॉटस्ॲप क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी केले आहे.

_______________

शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिलपर्यंत लस घेणे बंधनकारक

अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड

यवतमाळ, दि. 5 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. करीता शासकीय कार्यालयातील सर्व पात्र अधिकारी / कर्मचा-यांनी 9 एप्रिल 2021 पर्यंत जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून स्वत: व कुटुंबातील पात्र सदस्यांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच 100 टक्के पात्र अधिकारी / कर्मचा-यांनी लस घेतल्याबाबतचा अहवाल 9 एप्रिल रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत सादर करावा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व शासकीय यंत्रणांना दिले आहे.

तालुकास्तरावरील कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांनी लस घेतल्याबाबतचा अहवाल संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे व जिल्हास्तरावरील कार्यालयांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे सादर करावा. ज्या पात्र अधिकारी / कर्मचा-यांनी कोविड लस घेतली नाही त्यांना 10 एप्रिल पासून दररोज 1 हजार रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करावी व तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

शासकीय कार्यालयात अभ्यांगतांना प्रतिबंध : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची व मृत्युसंख्या वाढत असल्यामुळे शासनाद्वारे व जिल्हा प्रशासनाद्वारे वेळोवेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सुरु आहे. अशा कालावधीत शासकीय कार्यालयात विविध अडीअडचणी, तक्रार, विनंती अर्ज, निवेदने घेवून येणाऱ्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होवू नये, याकरीता शासकीय कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना प्रतिबंधीत केले आहे. तसेच शासकीय कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी फक्त लोकप्रतिनिधी तसेच ज्यांना अत्यावश्यक सभेकरीता बोलविण्यात आले आहे, त्यांनाच प्रवेश मुभा राहील.

यासंदर्भात सर्व विभाग प्रमुखांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर संसर्ग वाढू नये, याकरीता आपल्या कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना कार्यालयात येण्यास प्रतिबंध करून त्यांची निवेदने तक्रारी, विनंती अर्ज कार्यालयापर्यंत पोहचविण्याकरीता व्हॉटस्अॅप क्रमांक व शासकीय ई-मेल आयडी जाहिर करावा व त्यांच्या प्राप्त तक्रारींचे निराकरण करावे, असे आदेश देण्यात आले आहे.

_________&_&_____

जिल्ह्यात रेमडेसिवीर मुबलक प्रमाणात उपलब्ध

यवतमाळ, दि. 5 : यवतमाळ जिल्ह्यातील ऑक्सीजन पुरवठा ऑक्सि लाईफ गॅसेस व मुकुंदराय गॅसेस यांच्याकडून निरंतर सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. जिल्ह्याची एकूण ऑक्सीजनची मागणी व त्या अनुषंगाने पुरवठ्याचे नियोजन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासन व अन्न व औषध प्रशासनामार्फत केले जात आहे. पुरेसा ऑक्सीजनसाठा शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात उपलब्ध आहे. तसेच गरज भासल्यास नजीकच्या जिल्ह्यातून ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी प्रशासन कटीबध्द आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी प्रभावी ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा जिल्ह्यात नियमित राहण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न सुरु आहेत. सध्या रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असून भविष्यातही ते उपलब्ध राहणार आहे.

जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालय तसेच विविध तालुक्यातील औषधी दुकानांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहे. यात रिधान मेडिकल स्टोअर्स (डॉ. भारत राठोड हॉस्पीटल, यवतमाळ), श्री स्वामी समर्थ मेडिकल स्टोअर्स (डॉ.ढवणे हॉस्पीटल, यवतमाळ ), पार्श्वनाथ मेडिकल (डॉ. शहा हॉस्पीटल, यवतमाळ), संजीवनी मेडीकल (संजीवनी हॉस्पीटल, यवतमाळ), एशियन फार्मा, यवतमाळ, श्री राधे हेल्थ केअर यवतमाळ, पुसद येथील आयकॉन फार्मा (आयकॉन हॉस्पीटल), दिग्रस येथील अथर्व मेडिकोज, वणी येथील सुखकर्ता मेडिकल (सुगम हॉस्पीटल, वणी) यांचा समावेश आहे.

तसेच रेमडिसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहे. सर्व रुग्णांना व वैद्यकीय व्यावसायिकांना कळविण्यात येते की, रेमडिसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत काही अडचणी भासल्यास औषध निरिक्षक सविता दातीर यांच्याशी संपर्क करावा, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सविता दातीर यांनी कळविले आहे

Copyright ©