यवतमाळ

“अशी असावी माझ्या मुलाची शाळा” वक्तृव स्पर्धेचे आयोजन

(सुसंस्कार विद्यामंदिर येथे पालकांसाठी नाविण्यपूर्ण स्पर्धा)
यवतमाळ सुसंस्कार विद्या मंदिर येथे पालकांसाठी एका नाविन्यपुर्ण स्पर्धेचे पालकांकरीता आयोजन करण्यात आले, या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन सचिव संजय कोचे सर व प्रमुख उपस्थीती मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे होते, याप्रसंगी विजेत्या पालकांसोबत सर्व स्पर्धक व शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.
कोरोना हे संकट आपल्यासोबत गत एक वर्षापासून असतांना सर्वच संकल्पना बदलल्या आहेत त्याचप्रमाणे शाळेचे हे स्वरुप बदललेले आहे. ऑनलाइन शाळा सुरू आहेत. या अनुषंगाने शाळेचे सचिव श्री. संजय कोचे सर यांच्या कल्पक विचाराद्वारे ‘अशी असावी माझ्या मुलाची शाळा’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पालकांचे विचार, सूचना जाणून घेणे, पालक म्हणून त्यांच्या पाल्याच्या शाळेकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेणे तसेच आपल्या आगामी प्रकल्पासाठी या सर्व बहुमूल्य सूचनांचा उपयोग करून शाळेला अधिक समृद्ध, प्रशस्त, शिस्तबद्ध व आल्हाददायक करणे हाच एक प्रांजळ उद्देश मनात ठेवून श्री. संजय सरांनी या स्पर्धेचे आयोजन केले.
पालकांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत या स्पर्धेत सहभाग घेतला. आपल्या पाल्याची शाळा कशी असावी? यावर आधारित अनेक विचार अत्यंत निर्धास्तपणे, मोकळेपणाने व्यक्त करीत ध्वनीचित्रफितीच्या माध्यमाने शाळेकडे पाठवीत या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील सौ. रुपाली पिवळटकर, सौ. नंदिनी इंगोले, कु. आँचल जाजू, सौ. स्मिता तगडपल्लीवार, सौ. प्रतिभा ठाकरे, सौ. दीप्ती हिंडोचा, श्री. रंजीत अग्रवाल व श्री. रमाकांत पवार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. सर्व निकषांना विचारात घेऊन एकूण तीन पारितोषिक देण्यात आले. ३००० रु. द्वितीय पारितोषिक सौ. नंदिनी इंगोले २००० रु. व तृतीय पारितोषिक सौ. प्रतिभा ठाकरे १००० रु. यांनी प्राप्त केले. सर्व विजयी स्पर्धकांचे शाळेचे सचिव श्री. संजय कोचे सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे मॅम यांनी खूप खूप अभिनंदन केले. तसेच पालकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले. तसेच पालकांनीही अनोखी स्पर्धा आयोजित करून विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल श्री. के. संजय सर व सौ. उषा कोचे मॅम यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली चौधरी व कु. वृषाली जोशी यांनी केले तसेच तांत्रिक कार्याची धुरा श्री. मोहित जयस्वाल यांनी सांभाळली. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभली.

Copyright ©