यवतमाळ

टेस्टिंग व लसीकरणासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – जिल्हाधिकारी अमोल येडगे

 

सामाजिक संघटनांसोबत बैठक

यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे. यासोबतच आता टेस्टिंग आणि लसीकरण याला सुध्दा प्राधान्य देण्यात आले असून यात सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते.

आयसोलेशन, टेस्टिंग, ट्रेसिंग, लसीकरण आदी कामे प्रशासनाकडून करीत आहे. मात्र नागरिकांचा प्रतिसाद कमी पडत असल्यामुळे विविध सामाजिक संघटनांनी यासाठी प्रशासनासोबत काम करून जनजागृती करणे आवश्यक आहे. कोव्हीडवर नियंत्रण तसेच मृत्युदर कमी करायचा असेल तर टेस्टिंग आणि लसीकरणावर भर देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. वाढता मृत्युदर ही अतिशय गंभीर बाब असून नागरिकांच्या सतत संपर्कात येणारे व्यापारी, दुकानदार, रिक्षाचालक यांनी टेस्टिंगसाठी समोर यावे. तसेच 45 वर्षापेक्षा जास्त वयोगट असलेल्या सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. यासाठी प्रशासनाने नियोजन केले असून यवतमाळ शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. या केंद्रावर लसीकरणासाठी आपापल्या भागातील 45 वर्षांवरील नागरिकांना सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी स्वत: घेऊन यावे.

पुढील 15 ते 20 दिवसांत शहरातील सर्वांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. टेस्टिंग तसेच लसीकरणाबाबत लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठीसुध्दा विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा. आपल्या संपर्कात येणा-या सर्वांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यामुळे सर्वांना लसीकरणाबाबत माहिती द्या, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.

यावेळी सावित्रीबाई समाजकार्य विद्यालयाचे प्रा. घनश्याम दरणे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे शंतनु शेटे, प्रयास संघटनेचे प्रशांत बनगिरवार, मुव्हमेंट फॉर पीस ॲन्ड जस्टीसचे राशिद अनवर, गायित्री परीवारचे गोविंद शर्मा, सावकलार सामाजिक संस्थेचे अजय बिहाडे, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे श्रीकांत लोडम, प्रकाश चहाकर, नारी रक्षा समितीचे सुकांत वंजारी, विनोद दोंदल यांच्यासह अनिल गायकवाड, राजू पडगीलवार आदी उपस्थित होते.

10 मृत्युसह जिल्ह्यात 441 जण पॉझेटिव्ह

351 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 30 : गत 24 तासात जिल्ह्यात 10 मृत्युसह 441 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 351 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 57 व 58 वर्षीय पुरुष आणि 43 व 74 वर्षीय महिला, महागाव तालुक्यातील 50 व 60 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 45 वर्षीय महिला, उमरखेड येथील 73 वर्षीय पुरुष आणि मानोरा (जि. वाशिम) येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच आज (दि.31) पॉझेटिव्ह आलेल्या 441 जणांमध्ये 276 पुरुष आणि 165 महिला आहेत. यात यवतमाळातील 163, पुसद 68, उमरखेड 41, वणी 27, दिग्रस 25, दारव्हा 21, आर्णि 18, महागाव 14, घाटंजी 13, नेर 11, पांढरकवडा 9, झरीजामणी 8, मारेगाव 7, कळंब 6, बाभुळगाव 2, राळेगाव 1 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.बुधवारी एकूण 4098 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 441 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3657 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2489 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1135 तर गृह विलगीकरणात 1354 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 28577 झाली आहे. 24 तासात 351 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 25433 आहे. तर जिल्ह्यात एकूण 655 मृत्युची नोंद आहे.सुरवातीपासून आतापर्यंत 269151 नमुने पाठविले असून यापैकी 262039 प्राप्त तर 7112 अप्राप्त आहेत. तसेच 233462 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

लोकसंख्येचे मनुष्यबळात परिवर्तन घडविण्याची गरज

– माहिती संचालक हेमराज बागुल

यवतमाळ, दि. 31: देशाचे महासत्तेत रूपांतरण करण्यासाठी येथील मोठ्या लोकसंख्येचे तंत्रकुशल मनुष्यबळात परिवर्तन घडवणे ही आजची सर्वाधिक महत्त्वाची गरज आहे. त्यात आपणास यश मिळाल्यास भारत निश्चितच एक जागतिक महासत्ता म्हणून उदयास येऊ शकेल, असे प्रतिपादन नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक हेमराज बागुल यांनी केले.

येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत श्री बागुल दूरदृष्यप्रणालीद्वारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. शिंगाडे उपस्थित होते. गेल्या 12 मार्चपासून महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. आज या उपक्रमांतर्गत संचालक हेमराज बागुल यांचे व्याख्यान झाले.भारताला एक महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्यासाठी समस्यांचे रूपांतर संधीत करण्याची गरज असल्याचे सांगून श्री. बागुल म्हणाले, आपली लोकसंख्या जास्त असली तरी तिच्या सध्याच्या रचनेमुळे त्यातील ‘प्रॉडक्टिव पाप्युलेशन’ ही जवळपास 62 टक्के इतकी मोठी आहे. जगात एवढी उत्पादनक्षम लोकसंख्या कोणत्याही देशाची नाही. परिणामी भारत हा डेमोग्राफिक डिव्हिडंडचा जगातील सर्वात मोठा लाभार्थी आहे. त्यातील पन्नास टक्क्यांहून अधिक लोकसंख्या तरुणांची आहे. हे तरुण चांगल्या पद्धतीने तंत्रकुशल झाल्यास भारत भविष्यातील जगाचे मॅन्युफॅक्चरिंग हब सिद्ध होऊ शकेल. त्यातून येथील अर्थव्यवस्था जगातील आघाडीची अर्थव्यवस्था म्हणून नावारूपास येऊ शकेल. कौशल्य विकासाचा कार्यक्रम शासनाकडून याच हेतूने राबविण्यात येत आहे.एक परिपूर्ण महासत्ता होण्यासाठी केवळ आर्थिक आघाडीवर काम करून चालणार नाही, असे स्पष्ट करून श्री. बागुल म्हणाले सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध आघाड्यांवर मोठे बदल घडले पाहिजेत. सरकार आपल्या पद्धतीने याबाबत प्रयत्नशील आहेच. मात्र या प्रयत्नांमध्ये व्यापक लोकसहभाग असला पाहिजे तरच त्यात आपणास पूर्ण यश मिळू शकेल. त्यासोबत राष्ट्रीय चारित्र्याची भावनाही सर्वांमध्ये रुजावी. व्यक्ती म्हणून स्वतःचा विकास करतानाच नागरिक म्हणूनही आपल्या जाणिवा विकसित व्हाव्यात, असेही ते म्हणाले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. प्रशांत सब्बनवार यांनी या महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. प्रा. उज्वला शिरभाते यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. यावेळी प्रा. जी. के. यादव, प्रा. एस. बी. भोसले आदी उपस्थित होते.

Copyright ©