यवतमाळ

13 मृत्युसह जिल्ह्यात 247 जण पॉझेटिव्ह 312 जण कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 30 : गत 24 तासात जिल्ह्यात 13 मृत्युसह 247 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 312 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 56, 82, 68, 73, 73, 77 वर्षीय पुरुष आणि 65 वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील 68 आणि 63 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 32 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 85 वर्षीय पुरुष तर तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष आणि पुलगाव (जि. वर्धा) येथील 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि.30) पॉझेटिव्ह आलेल्या 247 जणांमध्ये 166 पुरुष आणि 81 महिला आहेत. यात यवतमाळातील 123, वणी 25, पांढरकवडा 24, बाभुळगाव 17, दारव्हा 17, पुसद 10, उमरखेड 10, महागाव 9, दिग्रस 3, कळंब 2, नेर 2, राळेगाव 2, आर्णि 1, घाटंजी 1 आणि झरीजामणी येथील 1 रुग्ण आहे.

मंगळवारी एकूण 1972 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 247 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1725 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2409 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1161 तर गृह विलगीकरणात 1248 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 28136 झाली आहे. 24 तासात 312 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 25082 आहे. तर जिल्ह्यात एकूण 645 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 265455 नमुने पाठविले असून यापैकी 257941 प्राप्त तर 7514 अप्राप्त आहेत. तसेच 229805 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

तिथीनुसार शिवजयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या सूचना

यवतमाळ दि. 30 : छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा उत्सव तिथीनुसार 31 मार्च 2021 रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड – 19 मुळे उद्भवलेल्या संसर्ग परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार रोजीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार) उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. त्या अनुषंगाने खालील मार्गदर्शक सुचना जिल्हा प्रशासनाने निर्गमित केल्या आहेत.

कोविड – 19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात यावा. दरवर्षी शिवजयंती साजरी करतांना जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतू यावर्षी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादीचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात येवू नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबतची व्यवस्था करण्यात यावी. तसेच दरवर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणूका काढण्यात येऊ नये. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयेाजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन व्हावे व 100 व्यक्तीच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

शिवजयंतीच्या‍ दिवशी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करतांना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. कोविड – 19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य, पर्यावरण, नगरपालिका, नगर पंचायत, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

वरील आदेशांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व‍ नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद आहे.

__________________

10 वी, 12 वी परिक्षेसंदर्भात अफवांवर विश्वास ठेऊ नये

राज्य शिक्षण मंडळाचे आवाहन

यवतमाळ दि. 30 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एप्रिल – मे 2021 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10) वी परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे 2021 व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दिनांक 23 एप्रिल ते दिनांक 21 मे 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच इ. 10 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व तत्सम परीक्षा दिनांक 12 एप्रिल ते 28 एप्रिल व इ.12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी तत्सम परीक्षा 5 एप्रिल ते 22 एप्रिल 2021 या कालावधीत प्रचलित पध्दतीने व मंजूर आराखड्यानुसार आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

राज्यात कोविड -19 विषाणूचा प्रादूर्भाव अद्यापही सुरु आहे. त्या अनुषंगाने उपरोक्त परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच निर्धारीत कालावधीत पार पडण्याच्या दृष्टीने मंडळ स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तथापी, विविध समाज माध्यम, प्रसार माध्यमाद्वारे इ. 10 वी व इ. 12 वी परीक्षेसंदर्भात विविध बातम्या व अफवा प्रसारीत होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या परीक्षेशी संबंधीत घटकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मंडळामार्फत सर्व संबंधीत घटकांना आवाहन करण्यात येते की, अशा कोणत्याही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. या संदर्भात मंडळामार्फत वेळोवेळी पूर्वीप्रमाणे अधिकृत निवेदने मंडळाच्या संकेतस्थळावर व प्रसिध्दी माध्यमांद्वारे प्रसिध्द करण्यात येतील. तसेच परीक्षेच्या अनुषंगाने विभागीय मंडळामार्फत या संदर्भातील लेखी सुचना वेळोवेळी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येतात. त्याच सुचना अधिकृत मानण्यात याव्यात.

कोविड – 19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित एप्रिल – मे 2021 मधील लेखी, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी मंडळामार्फत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. त्याचे काटेकोर पालन करून सर्व विद्यार्थ्यांनी उपरोक्त परीक्षांना तणावमुक्त वातावरणात सामोरे जावे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे

मान्यताप्राप्त दिव्यांग कर्मचाऱ्यांनी माहिती भरण्याचे आवाहन

यवतमाळ दि. 30 : राज्यातील 30 जून 2020 पर्यंत बंद पडलेल्या, रद्द केलेल्या दिव्यांगांच्या अनुदानित विशेष शाळा, कर्मशाळा मधील मान्यता प्राप्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे नावे आयुक्तालयात ठेवण्यात आलेल्या परीक्षा यादीत समाविष्ठ करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार आयुक्तालयाचे गुगल फार्मस मध्ये https://bit.ly/Absorptionapplication अशी लिंक तयार करून कार्यान्वित करण्यात आली त्याद्वारे संबंधीत मान्यता प्राप्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आवश्यक त्या प्रमाणित कागदपत्राच्या प्रती अपलोड करून माहिती दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत भरण्यात यावी.

सदर दिनांक पर्यंत संपूर्ण माहिती प्रमाणित कागदपत्रासह परिपूर्ण माहिती उपरोक्त लिंकमध्ये न भरल्यास संबंधीत समायोजन बाबत कार्यवाही करणे शक्य होणार नाही. तसेच समायोजनासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव तात्काळ कार्यालयास सादर करावे. याची नोंद जिल्ह्यातील बंद पडलेल्या, रद्द केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घ्यावी, असे जिल्हा समजा कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांनी कळविले आहे.

_____________________

विकेंद्रीत गहू खेरदी योजनेंतर्गत नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

नोंदणी कालावधी 1 ते 30 एप्रिल पर्यंत

यवतमाळ दि. 30 : रब्बी पणन हंगाम 2021-22 मध्ये (गहू) साठी विकेंद्रीत खरेदी योजनेंतर्गत करावयाच्या पूर्व तयारीबाबत शासनाने दिलेल्या सूचनेनुसार रब्बी पणन हंगामात खरेदी सुरु होण्याअगोदरच म्हणजे दिनांक 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत एनईएमएल च्या वेब पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावयाची आहे. तसेच शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी न झाल्यास दिनांक 1 मे 2021 ते 30 जून 2021 या वेळी कालावधीत कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करीता येणार नाही.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून शेतकऱ्यांना हमी किंमतीपेक्षा कमी किंमतीने (डिस्ट्रेस सेल) धान्य विकावे लागू नये, म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे. 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत एनईएमएल च्या वेब पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी. तरी सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी केले आहे.

_________________

5 एप्रिलचा लोकशाही दिन रद्द

यवतमाळ दि. 30 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होत असल्याने महिन्यातील पहिला सोमवार दि. 5 एप्रिल 2021 रोजी बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही. तथापी rcd_yavatmal@rediffmail.com या ईमेलद्वारे अर्ज स्वीकारून त्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी कळविले आहे.

Copyright ©