यवतमाळ

सात मृत्युसह 458 जण पॉझेटिव्ह 548 जण कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 26 : गत 24 तासात जिल्ह्यात सात मृत्युसह 458 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 548 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 58, 90, 67, 68, 62 वर्षीय पुरुष आणि 62 आणि 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच आज (दि.26) पॉजिटिव आलेल्या 458 जणांमध्ये 312 पुरुष आणि 146 महिला आहेत. यात यवतमाळातील 178, उमरखेड 64, पुसद 57, दिग्रस 32, दारव्हा 25, बाभुळगाव 20, नेर 19, आर्णि 15, महागाव 15, पांढरकवडा 12, वणी 7, राळेगाव 5, कळंब 4, घाटंजी 3 आणि इतर शहरातील 2 रुग्ण आहे.

शुक्रवारी एकूण 4892 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 458 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4434 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2427 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून रुग्णालयात भरती 1318 आणि गृह विलगीकरणात 1109 रुग्णांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 26733 झाली आहे. 24 तासात 548 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 23703 आहे. तर जिल्ह्यात एकूण 603 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 253587 नमुने पाठविले असून यापैकी 243874 प्राप्त तर 9713 अप्राप्त आहेत. तसेच 217141 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

०००००००

 

मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज चार महिन्याच्या आत सादर करण्याची सोय

Ø नोंदणी कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 26 : शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत दिनांक 31 मार्च 2021 अखेरपर्यंत असली तरी मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज चार महिन्यांच्या आत सादर करता येऊ शकते. त्यामुळे 31 मार्चच्या पार्श्वभुमीवर नोंदणी कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी आर. एन. चौधरी यांनी केले आहे.

कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजावर अनुसूची 1 च्या अनुच्छेद 25 च्या खंड (बी) अन्वये अन्यथा आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क 1 सप्टेंबर 2020 पासून सुरु होणाऱ्या आणि दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी संपणाऱ्या कालावधीकरीता दोन टक्क्यांनी तर दिनांक 01 जानेवारी 2021 पासून सुरु होणाऱ्या आणि दिनांक 31 मार्च 2021 रोजी संपणाऱ्या दिड टक्केने कमी केले आहे.

तसेच नगर विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये, महाराष्ट्र नगरपरीषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 147 (अ) अन्वये, महानगरपालिका क्षेत्रात स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कवरील अधिभार दिनांक 1 जानेवारी 2020 ते दिनांक 1 डिसेंबर 2020 या कालावधीकरीता 1 टक्का इतका कमी तसेच दिनांक 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 या कालावधीकरीता अर्धा टक्के इतका कमी करण्यात आले आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समितीचा अधिनियम 1961 अन्वये स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणारा एक टक्का अधिभार हा दिनांक 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीकरीता शुन्य टक्के तर दिनांक 1 जानेवारी ते 31 मार्च 2020 अर्धा टक्का करण्यात आले आहे.

शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत दिनांक 31 मार्च 2021 अखेरपर्यंत असल्याने या संबंधीचा लाभ घेण्याकरीता जिल्ह्यातील एकूण 17 दुय्यम निबंधक कार्यालयात सवलत संपत असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. माहे मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीच्या उपरोक्त प्रमाणे लाभ घेण्याच्या दृष्टीकोनातून निष्पादीत केलेले व आवश्यक मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 23 अनुसार दस्त निष्पादीत केलेल्या दिनांकापासून चार महिन्याच्या आत नोंदणीसाठी सादर करता येते. कोव्हिड – 19 च्या प्रादुर्भाव लक्षात घेता मार्च 2021 शेवटी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी न करता नोंदणी कायद्यातील तरतुदीचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी आर.एन.चौधरी यांनी केले आहे.

आयटीआयमध्ये 1 एप्रिल पासून अल्प कालावधीचे प्रशिक्षण

यवतमाळ, दि. 26 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धामणगाव रोड, यवतमाळ येथे प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना व स्ट्रीव प्रोजेक्ट अंतर्गत अल्पकालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाची सुरुवात 1 एप्रिल 2021 पासून नियमित सुरु होत असून संस्थेमध्ये अल्पमुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम ब्युटी थेरास्पीस्ट, रिपेअर वेल्डर, सीएनसी सेंटर कम ऑपरेटर (व्हीएमसी), फिल्ड टेक्नीशियन ऐअर कंन्डीशनर व्यवसायनिहाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तरी इच्छुक उमेदवारांनी गुगल फार्मवर https://forms.gle/iGSw78XVtJUwHTKY9 या लिंकवर लवकरात लवकर नोंदणी करावी व अधिक माहितीकरीता प्रा. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे प्राचार्य के.व्ही. बुटले यांनी कळविले आहे.

 

धुलिवंदननिमित्त मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश

यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात 29 मार्च रोजी धुलिवंदन असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व मद्य अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 चे कलम 142 (1) अन्वये यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या 29 मार्च रोजी धुलिवंदननिमित्त संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. बंदच्या कालावधीत अनुज्ञप्ती मद्य विक्रीसाठी उघडी ठेवल्याचे आढळून आल्यास संबंधित अनुज्ञप्ती व अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.

Copyright ©