यवतमाळ

जिल्ह्यात 13 मृत्युसह 247 जण पॉझेटिव्ह 305 जण कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 22 : गत 24 तासात जिल्ह्यात 13 मृत्युसह 247 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 305 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 69, 67, 87, 36 वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील 18 वर्षीय पुरुष आणि 78 वर्षीय महिला, दिग्रस येथील 75 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 78 वर्षीय पुरुष आणि 63 वर्षीय महिला, दारव्हा तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष आणि 56 वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील 84 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

तसेच पॉजिटिव आलेल्या 247 जणांमध्ये 173 पुरुष आणि 74 महिला आहेत. यात यवतमाळातील 101, पुसद 29, दिग्रस 33, बाभुळगाव 20, मारेगाव 13, घाटंजी 12, नेर 12, राळेगाव 7, दारव्हा 6, वणी 6, कळंब 3, पांढरकवडा 2, आर्णि 2 आणि 1 इतर शहरातील रुग्ण आहे.

सोमवारी एकूण 2466 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 247 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2219 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1965 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 24840 झाली आहे. 24 तासात 305 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 22302 आहे. तर जिल्ह्यात एकूण 573 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 234940 नमुने पाठविले असून यापैकी 223066 प्राप्त तर 11874अप्राप्त आहेत. तसेच 198226 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

__&&____&&____&___&____

मृत्युदर कमी करण्यासाठी लसीकरण आणि टेस्टिंगवर लक्ष केंद्रीत करा

जिल्हाधिका-यांनी घेतला तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा

यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यात गत पंधरवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश मृत्युचे सरासरी वय 60 वर्षांच्या वर आहे. त्यामुळे 60 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने करून टेस्टींगवरसुध्दा लक्ष केंद्रीत करा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीसीद्वारे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात सद्यस्थितीत 93 केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, लसीकरणाची गती अतिशय संथ आहे. प्रत्येक केंद्राला रोज किमान 100 याप्रमाणे 9300 जणांना लस देणे अपेक्षित आहे. सध्यास्थितीत लसीकरणाचा आकडा केवळ 2600 ते 2700 आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करण्याचे शासनाचे निर्देश आहे. त्यामुळे लसीकरणाची गती वाढवा. फ्रंट लाईन वर्कर्स चे केवळ 70 ते 75 टक्केच लसीकरण झाले आहे.

कोरोना पॉझेटिव्ह असलेल्या प्रत्येक रुग्णामागे किमान 20 ते 25 काँटॅक्ट ट्रेसिंग होणे आवश्यक असतांना यात हलगर्जीपणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच गृह विलगीकरणात केवळ 10 ते 15 टक्केच नागरिकांना ठेवण्याच्या भारत सरकारच्या सुचना आहेत. इतरांना कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर आणि विलगीकरण कक्षात ठेवावे. गृह विलगीकरणात असणारे नागरिक शासनाच्या सुचनांचे पालन करीत नाही, असे निदर्शनास आले आहे. रॅपीड ॲन्टीजन किट कोणत्या तालुक्यात किती शिल्लक आहेत. तसेच उपयोगात आणलेल्या किटबाबत अजूनही डाटा भरण्यात आला नाही. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिका-यांनी लक्ष देऊन अहवाल सादर करावा.

प्रत्येक तालुक्याने काँटॅक्ट ट्रेसिंगचा डाटा काळजीपूर्वक भरावा. तालुक्याला जे उद्दिष्ट दिले आहे, ते कोणत्याही परिस्थतीत पूर्ण करणे तालुकास्तरीय यंत्रणेची जबाबदारी आहे. यात हयगय होऊ देऊ नका. गत दहा दिवसांत जिल्ह्यात रोज किमान पाच हजार नमुन्यांची चाचणी करण्यात आली, ही चांगली बाब असून हेच प्रमाण पुढील काही दिवस कायम ठेवा. जेणकरून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, प्रत्येकाची चाचणी करणे आवश्यक आहे. सारीचे रुग्ण कमी करणे आणि हाय रिस्क ट्रेसिंग वाढविणे, याला प्राधान्य द्या. लसीकरणासंदर्भात तालुकास्तरीय टास्क फोर्सच्या अद्यापही मिटींग झाली नाही. ती त्वरीत घ्यावी. 45 ते 60 वयोगटातील को-मॉरबिड लोकांचा शोध घ्या. तसेच 60 वर्षांवरील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करा, अशा सुचना त्यांनी केल्या.

बैठकीला संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, न.प. मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

____________&_____________&

 

महिला व बालविकास मंत्री आज यवतमाळमध्ये

यवतमाळ, दि. 22 : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर ह्या दि. 23 मार्च 2021 रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

23 मार्च रोजी सकाळी 8 वाजता पुसद येथे आगमन व सुर्यकांत देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, सकाळी 8.45 वाजता यवतमाळ करीता प्रयाण, 9.45 वाजता दर्डा नगर, शक्ती स्थळ येथे ज्योत्स्नाताई दर्डा यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपस्थिती, सकाळी 10.15 वाजता दीप नगर करीता प्रयाण, सकाळी 10.25 वाजता दीप नगर येथे वसंतराव घुईखेडकर यांच्या निवासस्थानी आगमन व सदिच्छा भेट, सकाळी 11 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे आगमन व सदिच्छा भेट, सकाळी 11.50 वाजता संत चिकित्सा प्रसारक मंडळ द्वारे साई समृध्दी हॉस्पीटलचे भुमीपूजन व कोनशिला समारंभ कार्यक्रम तसेच सर्वधर्म सामुहिक विवाह मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1.15 वाजता दत्त चौक येथे राजकुमार निलावार यांच्या निवासस्थानी आगमन व सदिच्छा भेट, दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे महिला व बालभवन कामांचे सादरीकरणसंदर्भात बैठक, दुपारी 3 वाजता झरीजामणी व इतर तालुक्यांमध्ये कुमारी माता यांच्या संदर्भात करावयाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक, दुपारी 3.45 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, दुपारी 3.55 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, 4.30 वाजता नागपूरकरीता प्रयाण.

____&_______________&____

जलसंवर्धनाची चळवळ निर्माण करण्यासाठी

22 ते 27 मार्च जागतिक जल सप्ताह

यवतमाळ, दि. 22 : पिण्याचे पाण्याचे महत्व सर्वांना कळविण्यासाठी तसेच पाण्याचे मुल्य टिकण्याकरीता लागणाऱ्या उपाययोजनांची जनजागृती करण्यासाठी 22 ते 27 मार्च 2021 हा सप्ताह जागतिक जल सप्ताह म्हणून जिल्हाभरात राबवण्यिात येत आहे. या अनुषंगाने जागतिक जल दिनानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कार्यालयात जलदिन साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप कोल्हे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले व जागतिक जल दिनानिमित्त सर्वांना शपथ दिली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गटविकास अधिकारी यांनी जागतिक जल दिनानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना जलदिनाची शपथ दिली. तसेच वेबिनार माध्यमातून सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अर्चना जतकर यांनी पाणी व्यवस्थापन व महिलांची भुमिका या विषयांवर वेबिनार मध्ये मार्गदर्शन केले.

पाण्याचे महत्व अधोरोखीत करून आणि त्याच्या सर्वकाळ उपलब्धतेसाठी सर्वांचे लक्ष केंद्रीत करून सर्वव्यापी उपाययोजना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे सन 1993 पासून दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने जगातील शुध्द व सुरक्षित पाणशिवाय जगणाऱ्या जनसमुदायात जागृती निर्माण केली जात आहे. जागतिक जलदिन व्यापक जनजागृती करून लोकांना पिण्याच्या पाण्याचे महत्व त्याचे मुल्य व ते टिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनाबाबत जागृती करण्यात येत आहे.

जागतिक जल सप्ताहामध्ये सर्व विभागांचा, संस्थाचा सक्रीय सहभागी करून घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सध्याची कोविड – 19 या संसर्गजन्य रोगाची परिस्थिती पाहता सर्व माध्यमांचा वापर करून आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करून सर्व वयोगटातील ग्रामीण भागातील नागरीकांपर्यंत पिण्याच्या पाण्याचे महत्व पोहोचविण्याकरीता जिल्ह्यात जाणीव जागृती करण्यासाठी विविध तालुकास्तरावर विषयांवर कार्यक्रमाचे नियोजन करायचे सुचित करण्यात आले आहे. यात पिण्याचे स्त्रोतांचे मुल्य नैसर्गिक जल संसाधने जलचक्र आणि परिसंस्था, पाण्याच्या पायाभुत सुविधांचे मुल्य, पाण्याच्या सेवांचे मुल्य, उत्पादन आणि सामाजिक आर्थिक क्षेत्रातील पाण्याचे मुल्य, पाण्याशी निगडीत सामाजिक सांस्कृतिक पैलुंचे मुल्य या विविध विषयावर तालुकास्तरावर जाणीव जागृती करण्याकरीता सुचित करण्यात आले आहे.

22 ते 27 मार्च 2021 हा सप्ताह जागतिक जल सप्ताह जिल्ह्यातील सध्याची कोविड -19 या संसर्गजन्य रोगाची परिस्थिती पाहता सर्व माध्यमांचा वापर करून आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करून जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

Copyright ©