यवतमाळ

भाचाच ठरला मामाचा वैरी

 

● पैशाच्या लालसेतून भाच्यानेच घडविले हत्याकांड

महागांव : महागांव तहसील कार्यालयातून वर्षभरापुर्वी सेवानिवृत्त झालेले नायब तहसीलदार मोहन नामदेव पेंदुरकर (वय ५९ ) यांचा निर्घृण हत्या करण्यात आली. काल गुरुवारी सायंकाळी महागांव ते फुलसावंगी रस्त्यावर पिंपळगाव फाट्यावर हा थरार घडला. पैशाच्या लालसेतून सख्ख्या भाच्यानेच मोहन पेंदूरकर यांना ठार केल्याचे निष्पन्न झाले आहे. पवन श्रीराम मंगाम (वय ३३) असे आरोपी भाच्याचे नाव आहे. तो लोहारा (यवतमाळ) येथील रहिवाशी आहे.

मोहन पेंदुरकर हे महागांव येथे नायब तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त झाले. ते मुळचे यवतमाळ येथील रहिवासी होते. पेंदुरकर यांना मुलबाळ नाही.आरोपी भाचा पवन मंगाम हा मोहन पेंदुरकर यांना सातत्याने पैशाची मागणी करायचा. वृद्धापकाळी मीच सेवाश्रूषा करणार त्यामुळे संपत्ती माझ्या नावे करण्याची धमकी पवन सातत्याने देत होता परंतू मोहन पेंदुरकर मात्र भाच्याला दाद देत नव्हते. यावरून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. काल पवन मंगाम महागांव येथे मामाच्या निवासस्थानी आला. मामाचा काटा काढण्याचा विचार – त्याच्या मनात होता. घरातील कैची त्याने खिशात लपविली व स्विफ्ट डिझायर क्र. एम.एच. २० सीएच ०८४० मध्ये मोहन पेंदुरकर यांना घेऊन तो सायंकाळी फुलसावंगी रस्त्याने निघाला.

पिंपळगाव फाट्यावर गाडी थांबवून त्याने पैशासाठी हुज्जत घातली व धारदार कैचीने सपासप वार करून मोहन पेंदूरकर यांचा निघृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह रस्त्यालगत फेकून त्याने वाहनासह यवतमाळकडे पलायन केले. नायब तहसीलदारांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे कळताच यंत्रणा खडबडून जागी झाली.पोलीस आणि तहसील प्रशासन लगेच घटनास्थळी पोहचले. पेंदुरकर यांचा पोटावर व छातीवर मोठे घाव होते, त्यामुळे आरोपीचा छडा लावण्याचे आव्हान होते. यात वेगाने तपास करून एलसीबीने रात्रीच आरोपी पवन मंगाम यास यवतमाळ येथे ताब्यात घेतले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©