यवतमाळ

कोरोणाने जिल्हा हादरला

 

यवतमाळ, दि. 19 : गत 24 तासात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला असून 526 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटर येथे भरती असलेल्या 314 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 72 वर्षीय पुरुष आणि 70, 48, 11 वर्षीय महिला, दिग्रस शहरातील 41 वर्षीय पुरुष आणि दिग्रस तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 55 वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 52 वर्षीय महिला आणि माहूर (जि.नांदेड) येथील 55 वर्षीय महिला आहे. शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 526 जणांमध्ये 375 पुरुष आणि 151 महिला आहेत. यात यवतमाळातील 249, पुसद 81, दिग्रस 97, उमरखेड 24, महागाव 22, नेर 20, मारेगाव 11, कळंब 7, पांढरकवडा 3, घाटंजी 3, बाभुळगाव 2, दारव्हा 2, वणी 2, झरीजामणी 2 आणि आर्णि येथील 1 रुग्ण आहे.

शुक्रवारी एकूण 5039 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 526 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4513 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2244 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 23740 झाली आहे. 24 तासात 314 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 20956 आहे. तर जिल्ह्यात एकूण 540 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 220958 नमुने पाठविले असून यापैकी 210809 प्राप्त तर 10149 अप्राप्त आहेत. तसेच 187069 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले

आहे.

______&__________&_________

 

खाजगी कोचिंग क्लासेसला अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी

यवतमाळ, दि. 19 : जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता संपूर्ण जिल्ह्यासाठी सुधारीत सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

मात्र वर्ग दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. तसेच विविध स्पर्धा परिक्षांच्या तारखासध्दा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे वर्ग दहावी आणि बारावी तसेच विविध स्पर्धा परिक्षांचे वेळापत्रक लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी विभागातील खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस तसेच इतर प्रशिक्षण संस्था खालील अटींच्या अधीन सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था यांनी त्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरु करतांना आसान क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 20 विद्यार्थी राहतील. तसेच दोन बॅचमध्ये अर्ध्या तासाचा अवकाश ठेवून प्रत्येक वेळी हॉल, रुमचे निर्जंतूकीकरण करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. प्रशिक्षण देणाऱ्या आस्थापनेतील सर्व संबंधितांचे तसेच प्रशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करणे अनिवार्य राहील. शिक्षक व विद्यार्थी यांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील. तसेच बैठक व्यवस्था सामाजिक अंतर राखून करण्यात यावी व एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्यात यावा.

कोविड – 19 चे अनुषंगाने केंद्र शासन, राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही, याची संबंधित संचालकांनी संस्थेने दक्षता घ्यावी. वरील आदेशांचे जे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

 

______________&_&&&___________

जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखला बालविवाह

नवरदेवासह इतर मंडळीवर गुन्हा दाखल

यवतमाळ, दि. 19 : पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिस स्टेशन हद्दीतील दुर्गम भागात वसलेल्या पांढुर्णा (बु) येथे केदारालिंगी मंदिरात कोरोनाचे नियम डावलून लग्न समारंभ संपन्न होत असल्याची माहिती खंडाळा पोलिस स्टेशनला मिळाली. प्रत्यक्ष भेट दिली असता वेगळाच प्रकार पोलिस प्रशासनाच्या लक्षात आला. हिंगोली पोलिस व जिल्हा बाल संरक्षण कक्ष हिंगोली यांची टिम तेथे होती. त्यांनी शहानिशा केली असता त्याआधारे सदर नववधू ही अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ पोलिस प्रशासनाने अल्पवयीन बालिकेला व वऱ्हाडी मंडळीला ताब्यात घेतले.

कोरोनासंदर्भातील शासनाचे नियम धाब्यावर बसवून हिंगोली जिल्ह्यातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पांढूर्णा (बु.) येथील 30 वर्षीय मुलासोबत लग्न होणार असल्याची माहिती मिळताच ग्रामसेवक व बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी पांडुरंग बुरकुले यांनी याविषयीची तक्रार खंडाळा पोलिस स्टेशनला दाखल केली. बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 च्या कलम 9, 10, 11 व कोरोना काळात गर्दी जमविल्याबाबत विविध कायद्यांतर्गत नवरदेव, लग्न जुळवणारे व वऱ्हाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन बालिकेला तेव्हाच ताब्यात घेवून जिल्हा बाल संरक्षक कक्ष यवतमाळद्वारे बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले.

सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात तसेच खंडाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोपाल चावडीकर, पोलिस उपनिरिक्षक रवींद्र मस्कर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर यांच्या उपस्थितीत पार पडली. तसेच या कारवाईस हिंगोली येथील पोलीस उपनिरिक्षक एस.एस. घेवरे व हिंगोलीच्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी गणेश मोरे, रामप्रसाद मुडे, रेशमा पठाण, हिंगोली चाईल्ड लाईन तसेच यवतमाळ जिल्हा बाल संरक्षण कक्षचे महेश हळदे, माधुरी पावडे, सुनील बोक्से, वनिता शिरफुले, शिरिष इगवे यांचे सहकार्य लाभले.

बाल विवाह ही एक गंभसीर सामाजिक समस्या आहे. 18 वर्षाखालील मुलगी व 21 वर्षाखलील मुलगा यांचा विवाह करणे व त्यासाठी सहकार्य करणे हा एक दखलपात्र गुन्हा असून यामध्ये 2 वर्ष कारावास व एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. त्यामुळे बालविवाहबाबत नागरिकांनी अतिदक्ष रहावे. तसेच बाल विवाहबाबत माहिती असल्यास आपल्या गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दगडी इमारत, टांगा चौक, यवतमाळ 8888460260 यावर अथवा चाईल्ड लाईन 1098 यांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्याद्वारे करण्यात आले आहे.

_______&&&&&&_______________

 

 

लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसंदर्भाने कलम 144 लागू

यवतमाळ, दि. 19 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई मार्फत राज्यसेवा पूर्व परिक्षा 2020 दिनांक 21 मार्च 2021 ला रविवार रोजी जिल्हा मुख्यालयी यवतमाळ येथील विविध परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परिक्षेच्या कालावधीत अनुचित प्रकारांना आळा घालण्याकरीता व परिक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर परिक्षेच्या दरम्यान बंद ठेवण्याबाबत बंदी आदेश लागू करणेबाबत फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणे संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

त्यानुसार यवतमाळ शहरात राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 च्या परिक्षेसाठी निवडलेल्या शाळांच्या परिसरात बाह्य उपद्रव कमी करणे, परिक्षार्थींना कसलाही अडथळा होऊ नये तसेच परिक्षेशी संबंधीत नसलेल्या व्यक्तीस परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास पाबंद करणे, परीक्षा केंद्र परिसरात तसेच बाहेरील झेरॉक्स सेंटर वरून कॉपीच्या स्वरुपात झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना पुरवठा होऊ नये म्हणून परिक्षा केंद्राच्या परिसरा पासून 200 मीटर पर्यंतची झेरॉक्स केंद्र बंद करणे आवश्यक आहे.

त्यामुळे फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये दिनांक 21 मार्च 2021 रोजी परिक्षेच्या दिवशी परिक्षा चालू असतांना सकाळी 8 वा. ते सायं. 6 वा. पर्यंत परिक्षार्थी व परिक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतीरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करता येणार नाही. तसेच परिक्षेच्या कालावधीत परिक्षा केंद्राच्या परिसरापासून 200 मीटर पर्यंतची सर्व झेरॉक्स केंद्र चालू ठेवण्यास याद्वारे प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

_____&&&&______________________

 

वणी येथे दस्तऐवज नोंदणी सुविधा सुट्टीच्या दिवशीसुध्दा सुरु

यवतमाळ, दि. 19 : राज्य शासनाने मुद्रांक शुल्कामध्ये व अधिभारामध्ये दिलेली सुट 31 मार्च 2021 रोजी संपुष्टात येत आहे. या सवलतीचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी दस्तऐवज नोंदणीची सुविधा वणी येथील दुय्यम निबंधक श्रेणी – 1 या कार्यालयामध्ये सुट्टीच्या दिवशी म्हणजे 20 मार्च, 21 मार्च आणि 27 मार्च रोजी सुरू ठेवण्यात येईल.

या संधिचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी आर.एन. चौधरी यांनी केले आहे.

____________&&&______________&_

शिष्यवृत्तीचे अर्ज 23 मार्चपूर्वी सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 19 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती / शिक्षण फी परीक्षा फी योजनेचे शैक्षणिक वर्ष सन 2019-20 व 2020-21 मधील शिष्यवृत्तीचे / फ्रीशिपचे प्रलंबित अर्ज विद्यार्थीस्तर, महाविद्यालय स्तरावरील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गाचे विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे महाडीबीटी प्रणालीवरील प्रलंबित अर्ज तात्काळ तपासून व मंजूर करून ऑनलाईन दिनांक 23 मार्च 2021 च्या पूर्वी या कार्यालयास सादर करावे. अन्यथा विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या, फ्रीशिपच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील, याची नोंद घ्यावी, असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.

____________&______________&___

 

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेंतर्गत

लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 19 : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया योजना ही योजना राज्यात सन 2020-21 पासून पाच वर्षासाठी म्हणजे सन 2024-25 पर्यंत राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर योजनेकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 60:40 या प्रमाणात खर्च करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष तसेच जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

योजनेचे उद्देश : सध्या कार्यरत असलेले वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट व उत्पादक सहकारी संस्था यांची पतमर्यादा वाढविणे, उत्पादनांचे ब्रॅन्डींग व विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे, सध्या कार्यरत असलेल्या दोन लाख उद्योगांना औपचारीक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे, सामाईक सेवा जसे की सामाईक प्रक्रीया सुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सुक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवूण देणे, अन्नप्रक्रीया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे, सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करणे.

योजनेचे वैशिष्टये : सदर योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षात ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या धर्तीवर राबविण्यात येईल. सदर योजनेंतर्गत केंद्र – राज्य खर्चाचे प्रमाण 60:40 असे राहील. सदर योजना क्लस्टर आधारीत व प्रामुख्याने नाशवंत मालावर आधारीत राबविली जाईल. योजनेंतर्गत विविध प्रशिक्षणावर भर दिला जाणार असून त्याकरीता एकूण खर्चाच्या 100 टक्के अनुदान देण्यात येईल. या योजनेंतर्गत राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात येतील. योजनेंतर्गत विविध राज्य व केंद्र योजनांमधून एकत्रिकरणचा लाभ घेण्याची लाभार्थ्यांना मुभा राहील. योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व आकांक्षित जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात येईल.

योजनेतील समाविष्ट घटक व पात्र लाभार्थ्यींचे निकष : वैयक्तिक सुक्ष्म उद्योगाला, उपक्रमांना एकूण प्रकल्प किमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत क्रेडीट लिंक सबसिडी आधारावर अनुदानाचा लाभ, लाभार्थी गुंतवणूक किमान 10 टक्के आवश्यक असून उर्वरित रक्कम बँक कर्ज म्हणून घेण्यास मुभा राहील. सदर योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघ, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता गट, सहकारी उत्पादक यांना सार्वजनिक पायाभुत सुविधा, मुल्यवर्धन इत्यादीकरीता प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के व ब्रॅन्डींग व बाजार सुविधेकरीता प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अनुदान तसेच प्रशिक्षण सुविधा खर्चाच्या 100 टक्के अनुदानानुसार उपलब्ध करून देण्यात येईल.

स्वयंसहाय्यता गटांना खेळते भांडवल व छोट्या औजारांची खरेदी याकरीता अन्न प्रक्रीया उद्योगांशी संबंधीत कमाल 10 सदस्यांना कर्ज किंवा गुंतवणूक, भांडवल म्हणून फेडरेशनमार्फत कमाल रुपये 40 हजार प्रती सदस्य अनुज्ञेय राहील. यवतमाळ जिल्हा हा हळद पिकाकरीता निवडण्यात आलेला असून नवीन हळद प्रक्रीया केंद्र उभारण्यास प्राधान्य देण्यात यावे त्याकरीता जास्तीत जास्त वैयक्तिक लाभार्थ्यांनी तसेच बचत गट यांनी एमआयएस पोर्टल वर https://pmfme.mofpi.gov.in वर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

___________&&&_&__________

 

27 मार्च रोजी वणी पोलिस स्टेशनमध्ये दुचाकींचा लिलाव

यवतमाळ, दि. 19 : वणी येथील पोलिस स्टेशनमध्ये बेवारस मोटार सायकलींचा लिलाव करण्याच्या परवानगी संबंधाने एकूण 23 बेवारस मोटार सायकलचा जाहिर लिलाव करण्यात येणार आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडून उपरोक्त मोटारसायकल यांची निर्लेखन मुल्य मापन अहवाल प्राप्त झाल्याने नमुद मोटारसायकल यांचे जाहिर लिलाव दिनांक 27 मार्च 2021 रोजी पो. स्टे. वणी येथे ठेवण्यात आल्याचे वणीचे ठाणेदार यांनी कळविले आहे.

____________&_&&______&

जवाहर नवोदय विद्यालयाकरीता निवड चाचणी आता 16 मे रोजी

यवतमाळ, दि. 19 : जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी वर्ग 6 करीता निवड चाचणी ही 10 एप्रिल 2021 ला होणार होती. परंतू काही प्रशासकीय कारणांमुळे या परिक्षेच्या तारखेत बदल झालेला असून ही निवड चाचणी आता दिनांक 16 मे 2021 (रविवार) रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या वेळेत होणार आहे. या परिक्षेच्या फक्त तारखेत बदल झालेला आहे.

तरी संबंधीत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी नोंद घेऊन जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी परिक्षेकरीता उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य गंगाराम सिंग यांनी केले आहे.

Copyright ©