यवतमाळ

कोरोणाचां पुन्हा उद्रेक

 

जिल्ह्यात एकाच दिवशी 1007 जण कोरोनामुक्त

चार जणांचा मृत्यु तर 435 नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 17 : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणसुध्दा वाढले आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी तब्बल 1007 जण कोरोनामुक्त झाले. तर जिल्ह्यात गत 24 तासात चार जणांचा मृत्यु झाला असून 435 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 1007 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 78 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 69 वर्षीय पुरुष आणि दिग्रस तालुक्यातील 72 वर्षीय पुरुष आहे.

बुधवारी पॉझेटिव्ह आलेल्या 435 जणांमध्ये 326 पुरुष आणि 109 महिला आहेत. यात यवतमाळातील 159, पुसद 87, दिग्रस 59, दारव्हा 49, पांढरकवडा 19, बाभुळगाव 15, उमरखेड 14, महागाव 13, नेर 5, वणी 4, आर्णि 3, झरीजामणी 2, घाटंजी 1, मारेगाव 1 आणि इतर ठिकाणचे 4 रुग्ण आहे.

बुधवारी एकूण 6181 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 435 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5746 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2418 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 22889 झाली आहे. 24 तासात 1007 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 19947 आहे. तर जिल्ह्यात एकूण 524 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 209492 नमुने पाठविले असून यापैकी 202125 प्राप्त तर 7367 अप्राप्त आहेत. तसेच 179236 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले

आहे.

 

आस्थापना व दुकानांच्या वेळेत बदल : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता बाजारपेठेतील सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना सोमवार ते रविवार या सातही दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच सुरु राहतील. दुध विक्रेते / डेअरी यांची दुकाने सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दवाखाने, औषधी दुकाने (जनावरांची दवाखाने त्यांच्या औषधी दुकानांसह), पेट्रोल पंप व गॅस वितरण कोणत्याही निर्बंधाशिवाय नियमित वेळेनुसार सुरू राहतील, असे जिल्हा प्रशासनाच्या आदेशात नमुद आहे.

 

 

___________________&&____&______

 

 

 

बाभुळगाव तालुक्यातील वाटखेड (बू.) प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

यवतमाळ, दि. 17 : बाभुळगाव तालुक्यातील मौजा वाटखेड बू. येथील कोरोना रुग्ण वाढीचा वेग व संख्या लक्षात घेता वाटखेड हे संपूर्ण गाव पुढील 15 दिवसांकरीता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केले आहे.

बाभुळगाव येथील कोविड – 19 सेंटर, क्षमता लक्षात घेता वाटखेड येथील रुग्णांना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये गृहविलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र गृहविलगीकरणामध्ये ठेवण्यात आलेले रुग्ण नजर चुकवून गावामध्ये इतर कोणत्याही कामाकरीता जाणे – येणे करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे कोविड- 19 चा प्रसार व प्रभाव वेगाने होण्याची शक्यता आहे. सदर बाबी विचारात घेता मौजा वाटखेड बू. येथील कोविड – 19 ची रुग्ण संख्या मर्यादित ठेवणे व गावातील संसर्ग संपविण्याचे दृष्टीने संपूर्ण गाव पुढील 15 दिवसाकरीता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत उपविभागीय अधिकारी यवतमाळ यांनी प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार मौजा वाटखेड बू. हे संपूर्ण गाव 15 दिवसाकरीता प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. वरील नमुद क्षेत्रात प्रतिबंधित आराखड्यानुसार कार्यवाही करण्याबाबत आदेशित करण्यात येत आहे. सदर आदेशाची प्रसिध्दी देण्यासंबंधाने संबंधीत पोलीस स्टेशन अधिकारी, बाभुळगाव व सचिव, ग्रामपंचायत वाटखेड बू. यांनी कार्यवाही करावी.

सदर मनाई हुकुम आदेशाच्या कालावधीत शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेस्तव कर्तव्य करण्याची मुभा राहील. तसेच गटविकास अधिकारी, पं.स. बाभुळगाव यांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना, पासेस निर्गमित कराव्यत आणि सदर्हु परवाना, पासेस धारकांची यादी संबंधीत पोलीस स्टेशन अधिकारी यांना नेमून दिलेल्या ठराविक वेळेत पुरविण्याची मुभा राहील. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करतांना सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) चे व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी, पं.स. बाभुळगाव यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांच्या मार्फत करावी.

वरील आदेशांचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंडा संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी कळविले आहे.

___________________&________

आर्णि तालुक्यातील गणगाव येथील काही भाग प्रतिबंधित घोषित : आर्णी तालुक्यातील मौजा गणगाव येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने सदर रुग्णाच्या घराच्या परिसरातील भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत प्रस्तावित केले आहे. त्यानुसार आर्णी तालुक्यातील मौजा गणगांव येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या घराच्या परिसरातील भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून सदर भागाच्या सिमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याचा आदेश देण्यात येत आहे.

Copyright ©