महाराष्ट्र

मी तर यातला छोटासा हिस्सा, शिवसेना…’; वाझेंनी NIAला कबुली दिल्याचा भाजपाचा दावा

मुंबई प्रतिनिधी १६ मार्च : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. त्याचवेळी ही स्फोटके पेरण्यामागील मास्टरमाईंड शोधण्यासाठी एनआयएने मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) विभागातील अधिकाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले दोन अधिकारी व दोघा वाहनचालकांची साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. आणखीही काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.

सचिन वाझेंना अटक झाल्यानंतर भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्य सरकारने सचिन वाझे यांना सातत्याने वाचविण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्यांची एकप्रकारे वकिली केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून ‘एनआयए’ला तपासादरम्यान अनेक पुरावे मिळाले असून आणखी बरीच माहिती समोर येईलच, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याचदरम्यान भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील आता मोठा दावा करण्यात आला आहे.

भाजपा महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटरवर, सचिन वाझेंनी चौकशीत कुठल्या शिवसेना नेत्यांची नावं घेतली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच मी तर यातला छोटासा हिस्सा आहे. यामध्ये काही शिवसेनेच्या नेत्यांचा सहभाग असल्याची कबुली सचिन वाझेंनी एनआयएकडे दिल्याचा दावादेखील भाजपाने केला आहे. भाजपाच्या या दाव्यानंतर राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Featured

Copyright ©