यवतमाळ

जिल्ह्यात सहा मृत्युसह 367 पॉझेटिव्ह 243 जण कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 15 : गत 24 तासात जिल्ह्यात सहा मृत्युसह 367 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 243 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 55 आणि 25 वर्षीय महिला, दारव्हा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष आणि 78 वर्षीय महिला, दिग्रस तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष आणि मानोरा तालुक्यातील (जि. वाशिम) 70 वर्षीय महिला आहे. सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 367 जणांमध्ये 270 पुरुष आणि 97 महिला आहेत. यात दिग्रस येथील 126, यवतमाळातील 97, पांढरकवडा 26, महागाव 25, पुसद 24, नेर 23, वणी 14, कळंब 9, उमरखेड 6, दारव्हा 5, बाभुळगाव 4, आर्णि 2, राळेगाव 2, मारेगाव 1, झरी 1 आणि इतर ठिकाणचे 2 रुग्ण आहे.

सोमवारी एकूण 4161 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 367 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3794 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2854 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 22102 झाली आहे. 24 तासात 243 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 18736 आहे. तर जिल्ह्यात एकूण 512 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 193479 नमुने पाठविले असून यापैकी 189736 प्राप्त तर 3743 अप्राप्त आहेत. तसेच 167634 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

____&&&&&______________

­­‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमाचे शासकीय तंत्रनिकेतन येथे उद्घाटन

यवतमाळ, दि. 15 : भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा उपक्रम 12 मार्च ते 5 एप्रिल, 2021 या कालावधीत शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ येथे साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने यवतमाळ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे उदघाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. डी. एन . शिंगाडे यांनी केले. या प्रसंगी उपक्रमाचे विश्लेषण व माहिती विज्ञान विभाग प्रभारी प्रा. उज्ज्वला मंगेश शिरभाते यांनी दिली.

सदर कालावधित विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्वातंत्र्याचा लढा या विषयावर कार्यशाळा, आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांवर संस्थेतील विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन, स्वातंत्र्याचे महत्व या विषयावर ख्यातनाम व्याख्यात्यांचे व्याख्यान, प्रश्नमंजुषाचे आयोजन, संस्थेच्या परिसरातून सायकल रॅलीचे आयोजन, गायन स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच शहीद सैनिकांना मानवंदना देऊन या सर्व कार्यक्रमांचा समारोप दिनांक 5 एप्रिल, 2021 रोजी करण्यात येणार आहे.

या उदघाटन कार्यक्रमास ऑनलाईन पद्धतीने 188 विद्यार्थी उपस्थित होते. तसेच संस्थेतील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी देखील ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. प्रशांत सब्बनवार यांनी केले.

______&_&&________________

जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर

यवतमाळ, दि. 15 : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषयक प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश एम.आर.ए. शेख तर प्रमुख वक्ते म्हणून ॲड. प्राची निलावार व अॅड. एस.पी. पुसेगांवकर उपस्थित होते.

प्राची निलावार यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा या विषयावर मार्गदर्शन केले. हुंड्यासाठी विवाहित मुलीचे होणारे छळ दररोज आपल्याला वर्तमानपत्रामध्ये पाहावयास मिळते. ही बाब अत्यंत घृणास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. ॲड. एस.पी. पुसेगांवकर यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा यावर प्रकाश टाकला. महिलांवर अत्याचार होण्याचे मुळ कारण म्हणजे तीला समाजात असणारे विषमस्थान हे सर्वात मोठे कारण असल्याचे ते म्हणाले.

एम.आर.ए.शेख. म्हणाले, चांगल्याप्रकारे जगावं, अन्याय, अत्याचाराला बळी पडता कामा नये. तसेच हुंडा प्रतिबंधक कायदा व कौटुंबिक हिंसाचार यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच महाराष्ट्रात बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई योजना 2014 बाबत विस्तृत अशी माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचालन व आभार वकील सागर उदापुरकर यांनी केले. या कार्यक्रमाकरीता पॅरा विधी स्वयंसेवक मुली व महिला पॅनल वकील उपस्थित होत्या. कायदेविषयक शिबिराचे आयोजन कोरोना – 19 विषाणूच्या प्रादुर्भाव होणार नाही याबाबत संपूर्ण खबरदारी घेवून करण्यात आले होते.

_________________&_______

अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 15 : महिला व बाल विकास क्षेत्रातील उत्कृष्ठ काम करणाऱ्या समाज सेविकांच्या व संस्थांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्याहित करण्याच्या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सन 2015-16, 2016-17, 2017-18, 2018-19 व 2019-20 या वर्षासाठी जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर याकरीता पात्र समाजसेविका व सामाजिक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत.

प्रस्तावासोबत अर्जदाराचे संक्षिप्त परिचय, नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, शैक्षणिक कागदपत्रे, महिला व बाल विकास क्षेत्रातील उत्कृष्ठ काम केल्याबाबत अनुभवाचे पुरावे, कात्रणे, पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र व इतर आवश्यक माहितीसह प्रस्ताव सादर करावयाचे आहे.

तरी इच्छुक समाज सेविका व सामाजिक संस्था यांनी सात दिवसाचे आत परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, यवतमाळ येथे दोन प्रतीत सादर करावे. उशिरा प्राप्त होणारे प्रस्ताव स्विकारले जाणार नाही, असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.

______________&_________

निरुपयोगी द्रवनत्र पात्रे खरेदीकरीता 16 मार्च रोजी लिलाव

यवतमाळ, दि. 15 : जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, यवतमाळ येथून निरुपयोगी, निर्लेखन केलेली खालीलप्रमाणे द्रवनत्र पात्रे विक्री करावयाची आहेत. सदर पात्रे इच्छुकांना अवलोकनासाठी ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. तसेच लिलावाच्या इतर अटी व शर्ती कार्यालयात व खात्याच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे.

मंगळवार दिनांक 16 मार्च 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, वाघापूर रोड, यवतमाळ येथे फेर जाहिर लिलाव करण्यात येत आहे. ज्या संस्था, कंपन्या, व्यापारी यांना निरुपयोगी द्रवनत्र पात्रे खरेदी करावयाची असतील, अशा संस्थांनी, कंपनी, व्यापारी यांनी भाग घेण्यासाठी अनामत रक्कम 6 हजार रुपये रकमेचा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, यवतमाळ यांच्या नावे काढलेला किंवा रोख रक्कम भरणे आवश्यक आहे. जाहिर लिलावाच्या प्रक्रीयेचा निर्णय, लिलाव समितीचा अंतीम राहील. विक्री करण्यात आलेल्या द्रवनत्र पात्राचे हस्तांतरण करण्यापूर्वी चेपूण टाकण्यात येतील जेणेकरून त्यांचा पुर्नवापर, परत करणे शक्य होणार नाही, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. आर. रामटेके यांनी कळविले आहे.

____________________&&&________

वयोवृध्दांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांकडून

20 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

यवतमाळ, दि. 15 : ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत दिनांक 1 ऑक्टोबर रोजी जागतिक वृध्द दिन साजरा करण्यात येतो. त्यानुसार या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त केंद्र शासनाकडून दिनांक 1 ऑक्टोबर 2021 रोजी साजरा करण्यात येणाऱ्या एकात्मिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वयोवृध्दासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना विविध प्रवर्गातील वयोवृध्द सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून संबंधीत क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्या नावाने दिनांक 20 मार्च 2021 पर्यं‍त विहीत नमुन्यातील अर्ज इंग्रजीमध्ये टंकलिखीत करून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यवतमाळ यांनी केले आहे. सदर नमुना अर्ज कार्यालयात उपलब्ध आहे.

____&&&&_______&&&____

‘विकेल ते पिकेल’ योजनेचा शुभारंभ

यवतमाळ, दि. 15 : मुख्यमंत्री यांची महत्वकांक्षी योजना ‘संत सवता माळी विकेल ते पिकेल’ या योजनेचा शुभारंभ कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी तालुक्यामधील भाजीपाला उत्पादक शेतकरी यांना थेट ग्राहकाला विक्री करण्याकरीता प्रोत्साहन देण्यात येत आहे. याकरीता शेतकऱ्यांना प्रोत्याहन म्हणून राशी सिडस प्रा.लि. यांनी 100 छत्र्या दिल्या व या सोबतच शेतकऱ्यांनी कृषी विभाग यततमाळ येथे विक्री सुरु केली.

या ठिकाणी तालुक्यातील महिला बचत गट व छोटे शेतकऱ्यांनी उत्कृष्ठ प्रतिसाद दिला. ही योजना यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये राबविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक एस.बी.जाधव, तालुका कृषी अधिकारी एस.टी.धनुडे, सचिन पाईकराव आणि राशी सिडस यांचे विभागीय व्यवस्थापक शंतनू देशकर, क्षेत्रीय व्यवस्थापक बबन काळबांडे उपस्थित होते.

___________&______&

गुणपत्रक व संविदा करारपत्रासह संपर्क साधण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 15 : 105, 106, 107 अखिल भारतीय व्यवसाय शिकाऊ उमेदवारी परिक्षा उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे अंतीम प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.‍ शिकाऊ उमेदवारी अंतर्गत अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा एप्रिल 2017, ऑक्टोबर 2017 आणि एप्रिल 2018 मध्ये उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे अंतीम प्रमाणपत्र पडताळणी करीता डेटा व प्रमाणपत्र वरिष्ठ कार्यालयाकडून या कार्यालयास प्राप्त झाले आहे. परिक्षा उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी आपले गुणपत्रक व संविदा करारपत्रासह (कॉनट्रॅक्ट फॉर्म) मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे अंशकालीन प्राचार्य के.व्ही.बुटले यांनी कळविले आहे.

Copyright ©