यवतमाळ

राज्यात सुरु असलेली वीज तोडणी थांबवा किसान काँग्रेसची मागणी

 

घाटंजी : महावितरण कंपनीतर्फे थकीत वीजबिलामुळे सुरु असलेली विजतोडणी थांबवून त्यावर योग्य व शेतकऱ्यांना परवडण्यासारखा तोडगा काढण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी केली आहे.

राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या अडचणीत आहेत. सततची नापिकी, गुलाबी बोंडअळी, कधी अतिवृष्टी तर कधी अवर्षण अशा विविध संकटांशी शेतकरी सामना करत आहेत.

कोरोनामुळे तर शेतीव्यवसाय आणखीच डबघाईला आला आहे. आता कुठे शेतकरी यामधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक चणचण व वीजबिलात असलेल्या तफावतीमुळे अनेकांनी वीजबिल भरले नाहीत. पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरु झाले आहे.

त्यामुळे या कालावधीत वीज तोडणी करणे योग्य नाही. उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांनी विधिमंडळात वीज तोडणी होणार नाही असे आश्वासन दिले होते. त्याचे पालन होणे आवश्यक आहे. शासनाने याबाबत सहानुभूतीपूर्वक व गांभीर्याने विचार करून वीज तोडणी थांबवावी असे आवाहन देवानंद पवार यांनी केले आहे.

विजातोडणीबाबत महावितरण कंपनीचे अधिकारीवर्ग अतिशय कठोरपणे वागत आहेत. अनेक शेतकऱ्यांना व घरगुती वीज ग्राहकांना आलेल्या अवास्तव बिलाचाही विचार न करता विजतोडणी केल्या जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी थांबली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सरासरी वीजबिले देऊन पठाणी वसुली त्यावेळी करण्यात आली होती. कृषिपंप जास्त क्षमतेचे दाखवून त्यावेळी मोठा घोळ करून ठेवण्यात आला आहे. वाढीव वीजबिलासाठी यापूर्वीच्या सरकारची पापे देखील तितकीच कारणीभूत आहे. शेतकऱ्यांना अवास्तव बिले देऊन वीज बिल माफीच्या नावाखाली ते पैसे लुटण्यात आले असा आरोप पवार यांनी केला. या लुटीचा परिणाम आता शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. महाविकास आघाडी सरकारने या प्रकारची सखोल चौकशी करावी अशी मागणीही देवानंद पवार यांनी केली.

कोरोनाच्या काळात शेतीव्यवसायाने सर्वांना तारले. सगळंकाही बंद असतांना शेतकरी राबत होता. आज तो संकटात आहे त्यामुळे त्याला दिलासा देणे हे शासन व प्रशासनाचे काम आहे. विजतोडणी मोहिमेला थांबवून या विषयावर ठोस तोडगा काढावा अशी आग्रही मागणी पवार यांनी केली आहे.

Copyright ©