यवतमाळ

दुचाकी चोरीचा प्रयत्न करणाऱ्याला नागरिकांनी पकडले यवतमाळ

– दुचाकी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शहरातील पांढरकवडा मार्गावर, बुधवार, दि. १० मार्चला घडली असून त्याच्याकडून शहर पोलिसांनी दोन दुचाकी जप्त केल्या. गणेश टेकाम वय ३१ वर्ष रा. वेणी कोठा बाभुळगाव असे आरोपीचे नाव आहे. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांत कमालीची वाढ होत आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास या युवकाला बाभुळगाव रोडवरील मोहा फाटा परिसरात काही नागरिकांनी पकडले. तिरंगा चौकातील आकृती प्लाझा येथून चोरलेली दुचाकी तो बाभुळगाव येथे नेत होता. जावेद नामक युवकाने ही दुचाकी त्याला पुनम चौकात दिली असल्याचे त्याने सांगीतले. दरम्यान, याबाबत शहर पोलिसांना माहिती देत त्या चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी शहर डीबी पथकाने त्या चोरट्याची सखोल चौकशी केली असता तो बाभुळगाव तालुक्यातील वेणी कोठा येथील गणेश टेकाम असल्याचे समोर आले. दरम्यान या चोरट्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने दोन दुचाकी चोरी केल्याची कबूली पोलिसांना दिली असून त्या दोन्ही दुचाकी शहर डीबी पथकाने जप्त केल्या. गुरुवारी पोलिसांनी दुचाकी चोरटा गणेश टेकाम याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस करत आहेत.

Copyright ©