Breaking News यवतमाळ

जिल्ह्यात सहा मृत्युसह 382 जण पॉझेटिव्ह 222 जण कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 11 : गत 24 तासात जिल्ह्यात सहा मृत्युसह 382 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 222 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 84 वर्षीय पुरुष आणि 67 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 78 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 83 वर्षीय महिला, दारव्हा शहरातील 68 वर्षीय आणि दारव्हा तालुक्यातील 62 वर्षीय महिला आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 382 जणांमध्ये 229 पुरुष आणि 153 महिला आहेत. यात पुसद येथील 106, यवतमाळातील 84, दिग्रस 54, बाभूळगाव 32, महागाव 27, दारव्हा 26, नेर 11, पांढरकवडा 10, कळंब 9, उमरखेड़ 9, वणी 5, राळेगाव 4, आर्णि 3, मारेगाव 1 आणि झरीतील 1 रुग्ण आहेत.

गुरुवारी एकूण 1791 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 382 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1409 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2226 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 20554 झाली आहे. 24 तासात 222 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 17833 आहे. तर जिल्ह्यात एकूण 495 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 178619 नमुने पाठविले असून यापैकी 176983 प्राप्त तर 1636 अप्राप्त आहेत. तसेच 156429 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
_______________________

रोज पाच हजार टेस्टिंग करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

पॉझेटिव्ह दर कमी करण्यासाठी तालुकानिहाय उद्दिष्ट

यवतमाळ, दि. 11 : गत पंधरवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मृत्युचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझेटिव्ह रुग्णांचा सरासरी दर हा 13.85 आहे. त्यामुळे हा दर कमी करायचा असेल तर जिल्ह्यात रोज पाच हजार टेस्टिंग होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सर्व तालुकास्तरीय समितीला आरटीपीसीआर / रॅपिड ॲन्टीजन टेस्टिंगचे उद्दिष्ट निर्धारीत करून दिले आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक पॉझेटिव्ह रुग्णांचा दर हा यवतमाळचा असून तो 31.70 असल्यामुळे रोज किमान 1000 चाचण्या करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यानंतर दिग्रस (दर 20.38) चाचण्या 850, पुसद (दर 16.69) चाचण्या 650, दारव्हा (दर 10.15) चाचण्या 450, नेर (दर 10.28) चाचण्या 350, बाभुळगाव (दर 9.72) चाचण्या 250, उमरखेड (दर 9.99) चाचण्या 200, केळापूर (दर 5.55) चाचण्या 200, घाटंजी (दर 9.13) चाचण्या 200, वणी (दर 7.81) चाचण्या 190, आर्णि (दर 12.04) चाचण्या 170, महागाव (दर 7.34) चाचण्या 140, राळेगाव (दर 4.87) चाचण्या 130, कळंब (दर 3.52) चाचण्या 80, मारेगाव (दर 3.94) चाचण्या 80 आणि झरीजामणी तालुक्याचा पॉझेटिव्ह दर 2.13 असून 60 चाचण्या रोज करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

याकरीता जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठानांमधील कर्मचारी, शासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी, कोरोना स्प्रेडर जसे दुध, भाजी, वृत्तपत्रे विक्रेते, पोष्टमन, घरोघरी जाऊन साहित्य विक्री करणारे व इतर घरपोच साहित्य विक्री करणारे, आठवडी बाजार व घाऊक भाजीमंडीमधील विक्रेते, फळ विक्रेते, आद्योगिक कारखान्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, तसेच गर्दी होण्याची संभावना ज्या ठिकाणी जास्त असते, अशा ठिकाणी आरटीपीसीआर / रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात यावी. प्रत्येक तालुक्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याकरीता महसूल, पोलिस, आरोग्य, पंचायत तसेच इतर विभागांनी समन्वयातून काम करावे. तसेच जिल्ह्यातील जी प्रतिष्ठाने चालू करण्याकरीता परवानगी देण्यात आली आहे, अशा प्रतिष्ठानांमध्ये सर्व कर्मचा-यांची टेस्ट करणे बंधनकारक आहे. ज्या प्रतिष्ठानांमध्ये टेस्टिंग होणार नाही, त्यांच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिका-यांनी आदेशात म्हटले आहे.

लसीकरणासंदर्भातही सुचना : जिल्ह्यात ज्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे, अशा प्रत्येक केंद्रात दिवसाला किमान 100 लसीकरण करण्यात यावे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर रोज किती जणांना लस देण्यात आली, त्याचा नियमित अहवाल प्रशासनाला सादर करावा. कोरोनाबाधित ज्या रुग्णाला गृह विलगीकरणाची सुविधा देण्यात आली आहे, त्या नियमाचे पालन संबंधितांकडून होते की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून कोरोनाबाधित रुग्णावर नियंत्रण ठेवावे. सुचनांचे पालन न करणा-यांवर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी केले

______________________
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत

यवतमाळ जिल्हा परिषदेला द्वितीय पुरस्कार पुरस्कार

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली पुरस्कारांची घोषणा

यवतमाळ, दि. ११ : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार पटकावला असून यवतमाळ जिल्हा परिषदेने द्वितीय आणि सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त या जिल्हा परिषदांसाठी अनुक्रमे ३० लाख रुपये, २० लाख रुपये आणि १७ लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट पंचायत समितीमध्ये प्रथम क्रमांक कुडाळ (जि. सिंधुदूर्ग) पंचायत समितीने पटकावला. कागल (जि. कोल्हापूर) पंचायत समितीने द्वितीय तर भंडारा (जि. भंडारा) पंचायत समितीने तृतीय क्रमांक पटकावला. या पंचायत समित्यांसाठी अनुक्रमे २० लाख रुपये, १७ लाख रुपये आणि १५ लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यशवंत पंचायत राज अभियान सन २०२०-२१ अंतर्गत हे पुरस्कार आहेत. दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी १२ मार्च रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा या दिवशी हा कार्यक्रम होणार नाही.

Copyright ©