यवतमाळ सामाजिक

कोरोनासंदर्भात तालुकास्तरीय यंत्रणेचा व्हीसीद्वारे आढावा

 

Ø टेस्टिंग आणि ट्रेसिंग गांभिर्यपूर्वक करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

यवतमाळ, दि. 4 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात यवतमाळ, पुसद, दिग्रस, दारव्हा, पांढरकवडा, बाभुळगाव आदी तालुक्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी सुरवातीपासूनच तालुकास्तरीय समितीचे गठण करण्यात आले असून टेस्टिंग आणि काँटॅक्ट ट्रेसिंग संदर्भात गांभिर्याने लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात यंत्रणेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड, तहसीलदार डॉ. संतोष डोईफोडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतिश मून आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा दर कमी करायचा असेल तर दररोज किमान 3 हजार ते 4 हजार नमुन्यांची चाचणी होणे आवश्यक आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्याबाबत काय नियोजन केले, अशी विचारणा त्यांनी केली. तसेच टेस्टिंग आणि ट्रेसिंगचा डाटा नियमित भरावा. काही तालुकास्तरीय समितीकडून डाटा अपडेट केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. वरिष्ठ स्तरावरून कोणतीही माहिती कधीही विचारली जाते. त्यामुळे माहिती अपडेट ठेवण्याबाबत सर्वांनी गांभिर्य राखावे.

रुग्ण जास्त येत असलेल्या भागाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव तालुकास्तरावरून त्वरीत जिल्हा प्रशासनाला पाठवावा. सुपर स्प्रेडरवर लक्ष केंद्रीत करावे. हाय रिस्क व लो रिस्क संपर्कातील नागरिकांचा शोध, त्यांचे नमुने घेऊन चाचणीकरीता पाठविणे, लॉकडाऊनसंदर्भात तातडीने तालुकास्तरीय समितीची बैठक घेणे आदी निर्देश त्यांनी दिले.

००००००

वृत्त क्रमांक : 183

जिल्ह्यात 175 जण कोरोनामुक्त

Ø एका मृत्युसह 161 जण नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 4 : जिल्ह्यात गत 24 तासात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 175 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात एका मृत्युसह 161 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळातील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. गुरुवारी पॉझेटिव्ह आलेल्या 161 जणांमध्ये 89 पुरुष आणि 72 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळातील 89, महागाव 12, पांढरकवडा 9, पुसद 9, दारव्हा 8, नेर 8, आर्णि 7, वणी 3, बाभुळगाव 3, झरीजामणी 3, मारेगाव 3, दिग्रस 2, घाटंजी 1, राळेगाव 1, उमरखेड 1 आणि इतर 2 रुग्ण आहे.

गुरुवारी एकूण 1213 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 161 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1052 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1726 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 18402 झाली आहे. 24 तासात 175 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 16206 आहे. तर जिल्ह्यात एकूण 470 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 167705 नमुने पाठविले असून यापैकी 166358 प्राप्त तर 1347 अप्राप्त आहेत. तसेच 147956 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

००००००

वृत्त क्रमांक : 184

काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या तीन अल्पवयीन बालिका ताब्यात

Ø जिल्हा महिला व बाल विकास विभागाची कारवाई

यवमताळ दि. 4 : ज्यांना काळजी व संरक्षणाची गरज आहे, अशा अनाथ, निराश्रीत, पालक सक्षम नसलेल्या बालकांना बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बालकल्याण समितीच्या परवानगी (आदेश) शिवाय एखाद्या निवासी संस्थेत ठेवणे बेकायदेशिर आहे. ही संवेदनशील बाब ओळखून बाल कल्याण समिती व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली.

सदर मुलींना तातडीने बालकल्याण समिती समक्ष सादर करण्यात आले तसेच या मुलींना काळजी व संरक्षणाची गरज आहे, हे ओळखून सध्या त्यांना बालकल्याण समितीच्या आदेशाने मान्यताप्राप्त बालगृहामध्ये दाखल करण्यात आले. सामाजिक भावनेने अनेक सेवाभावी संस्था जिल्ह्यात कार्यरत आहे. मात्र काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांना ठेवण्याकरीता बालकल्याण समितीची परवानगी असणे गरजेचे आहे. तसेच अशा संस्थांना बालन्याय अधिनियम 2015 च्या कलम 41 अन्वये नोंदणी बंधणकारक आहे. विना परवानगी काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांना कोणत्याही निवासी संस्थेत ठेवणे हे कायद्याने गुन्हा आहे. विनापरवानगी कुणीही निवासी संस्थेत मुले ठेवत असल्यास बालकल्याण समिती कार्यालय, शासकीय मुलांचे निरीक्षण गृह चापनवाडी, यवतमाळ 1098 व 07232-295022 या क्रमांकावर संपर्क करावा. जेणेकरून कोणत्याही बालकांचे शोषण होण्यापासून संरक्षण करता येईल, असे आवाहन ज्योती कडू यांनी केले आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, बालकल्याण समिती सदस्या संजू गभणे, तहसिलदार परसराम भोसले, ठाणेदार पी.एस.जाधव, विशेष बाल पोलीस पथकाच्या सहा. पोलीस निरीक्षक शुभांगी आगाशे, तालुका आरोग्य अधिकारी श्यामकुमार शिंदे, परिविक्षा अधिकारी गजानन जुमळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, महिला व बालविकास कार्यालयाचे रवींद्र गजभिये, सुनिल बोक्से, आकाश बुर्रेवार, वनिता शिरफुले, तसेच पोलीस विभागाचे संतोष गावंडे, अमित लोखंडे, अरूण राठोड आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.

Copyright ©