यवतमाळ सामाजिक

कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाचे टीमवर्क उत्तम केंद्रीय पथकाच्या सदस्याची यवतमाळ येथे भेट

 

प्रतिबंधित क्षेत्राची केली पाहणी

यवतमाळ, दि. 1 : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे, त्याची कारणे जाणून घेण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी केंद्रीय पथकाच्या सदस्याने यवतमाळला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतल्यानंतर शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून सुचना केल्या.

केंद्रीय पथकाचे डॉ. आशिष रंजन हे सोमवारी यवतमाळात दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनासोबत त्यांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन होणे अत्यावश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग तसेच पोलिस यंत्रणा यांच्यात उत्तम समन्वय असून कोरोनाला रोखण्यासाठी टीमवर्क म्हणून काम करणे सर्वांची जबाबदारी आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्युदर (2.7 टक्के) कमी असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांनी मास्क लावणे बंधनकारक असून, सामाजिक अंतराचे पालन करावे. गर्दी टाळावी, आदी सुचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलला भेट देऊन त्यांनी कोरोना रुग्णांसाठी असलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली. यानंतर शहरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी, शिरे ले-आऊट येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट दिली.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, न.प.मुख्याधिकारी सुनील बल्लाळ आदी उपस्थित होते.

______________&__________

जिल्ह्यात 122 जण कोरोनामुक्त, 59 नव्याने पॉझेटिव्ह

तीन मृत्यु

यवतमाळ, दि. 1 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 59 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 122 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळ येथील 89 आणि 56 वर्षीय पुरुष, तसेच माहुर तालुक्यातील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. सोमवारी पॉजिटिव आलेल्या 59 जणांमध्ये 37 पुरुष आणि 22 महिला आहेत. यात यवतमाळातील 23 रुग्ण, पुसद येथील 12, पांढरकवडा 6, घाटंजी 5, दिग्रस 3, महागाव 3, मारेगाव 2 , नेर 2, बाभुळगाव 1, वणी 1 आणि 1 इतर रुग्ण आहे.

सोमवारी एकूण 439 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 59 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 380 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1488 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 17575 झाली आहे. 24 तासात 122 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 15622 आहे. तर जिल्ह्यात एकूण 465 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 163746 नमुने पाठविले असून यापैकी 161556 प्राप्त तर 2190 अप्राप्त आहेत. तसेच 143981 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे
_________________&__________

सोमवार ते शनिवार दुकानांच्या वेळा सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत

जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुधारीत निर्देश

यवतमाळ, दि. 01 : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या शहरी व ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याकरीता प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उर्वरित यवतमाळ जिल्ह्यात खालीप्रमाणे सुधारीत निर्देश दिले आहे. सदर आदेश दिनांक 8 मार्च 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात येत असून सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना ह्या सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरु राहतील.

नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील ज्या उद्योगांना सुरु ठेवण्याकरीता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे ते सर्व उद्योग सुरु ठेवण्याकरीता परवानगी राहील. सर्व प्रकारची शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आरोग्य व वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस एनआयसी, अन्न व नागरी पुरवठा, एफसीआय, एन.वाय.के. बँका सेवा वगळून) ह्या 15 टक्के किंवा 15 व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरु राहतील. सर्व प्रकारच्या खाजगी कार्यालयातील आस्थापना ह्या एकूण 15 टक्के किंवा कमीतकमी 15 कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरु राहतील.

ग्राहकांनी दुकानामध्ये खरेदी करण्याकरीता जवळपास असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांचा वापर करावा. शक्यतो दुरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरु न ठेवता फक्त पार्सल सुविधेस परवानगी राहील. लग्न समारंभाकरीता 25 व्यक्तींना (वधू व वरासह) तहसिलदार/मुख्याधिकारी यांचेकडून परवानगी अनुज्ञेय राहील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (महाविद्यालय, शाळा) येथील अशैक्षणीक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानीक यांना ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे ई. कामाकरीता परवानगी अनुज्ञेय राहील.

मालवाहतुक ही नेहमी प्रमाणे सुरु राहील आणि वाहतूकसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करतांना चार चाकी गाडीमध्ये चालका व्यतिरिक्त इतर तीन प्रवासी अनुज्ञेय राहतील. तीन चाकी गाडी (उदा.ॲटो) मध्ये चालका व्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेलमेट व मास्कसह दोन प्रवासी यांना परवानगी राहील. आंतरजिल्हा बसवाहतूक करतांना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासीसह सोशल डिस्टन्सींग व निर्जंतुकीकरण करून वाहतूकीकरीता परवानगी अनुज्ञेय राहील. याकरीता विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अमरावती यांनी नियोजन करावे.

सर्व धार्मिकस्थळे ही एकावेळी 10 व्यक्तीपर्यंत मर्यादीत स्वरुपात नागरीकांसाठी सुरु राहतील. ठोक भाजीमंडई सकाळी 3 ते 6 या कालावधीत सुरु राहील. परंतु सदर भाजी मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांना प्रवेश राहील. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालये, शैक्षणीक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस हे बंद राहतील. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधीत ठिकाणे ही बंद राहतील. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणीक, सांस्कृतीक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसम्मेलन हे या कालावधीत बंद राहतील.

सकाळी 7 वाजेपावेतो मॉर्निंगवॉक व व्यायामास सुट राहील. दुग्ध विक्रेते/ डेअरी यांची दुकाने ही सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत आठवड्याचे सातही दिवस सुरु राहतील. यापूढे सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शनिवार नियमितपणे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहतील. आठवडा अखेर शनिवारी सायंकाळी 5 ते सोमवारी सकाळी 9 पर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी बंद राहतील. सदर संचारबंदीच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व दवाखाने, औषधी दुकाने (जनावरांचे दवाखाने व त्यांच औषधी दुकानासह), पेट्रोल पंप, गॅस वितरण इत्यादी अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.

जे वरील आदेशांचे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद आहे.

Copyright ©