Breaking News यवतमाळ सामाजिक

जिल्ह्यात 215 जण पॉझेटिव्ह, 56 जण कोरोनामुक्त एकाचा मृत्यु

 

यवतमाळ, दि. 24 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 215 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 56 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 71 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 215 जणांमध्ये 121 पुरुष आणि 94 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 100 रुग्ण, दारव्हा 28, पुसद 22, दिग्रस 17, पांढरकवडा 16, वणी 12, नेर 10, झरीजामणी 3, बाभुळगाव आणि उमरखेड प्रत्येकी 2, आर्णि, राळेगाव आणि इतर ठिकाणचा प्रत्येकी 1 रुग्ण आहे.

बुधवारी एकूण 1271 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 215 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1056 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1296 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16716 झाली आहे. 24 तासात 56 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14969 आहे. तर जिल्ह्यात एकूण 451 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 156701 नमुने पाठविले असून यापैकी 155579 प्राप्त तर 1122 अप्राप्त आहेत. तसेच 138863 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
_______________________

जिल्हाधिका-यांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस

इतरांनीही घेण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला दारव्हा येथून सुरवात झाली आहे. सुरवातीला शासकीय अधिकारी व कर्मचा-यांना लस देण्यात येत असून याच अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज (दि.24) कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली.

पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागासह महसूल, पोलिस, नगर पालिका यंत्रणा, पंचायत राज व्यवस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांना लस देण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत एकूण 28324 जणांची नोंदणी झाली असून यापैकी 16133 जणांचे लसीकरण झाले आहे. तर उर्वरीत 12191 जणांचे लसीकरण बाकी आहे. जिल्ह्याची लसीकरणाची टक्केवारी 57 असून सर्वाधिक लसीकरणाची टक्केवारी पोलिस विभागाची आहे. कोव्हीडची लस ही पूर्णपणे सुरक्षित असून नोंदणी झालेल्या सर्वांनी त्वरीत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
______________________

आर्णी तालुक्यातील जवळा गाव प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित

पुढील आदेशापर्यंत सिमा बंद

यवतमाळ, दि. 24 : यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे रुग्ण आढळून येणारा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत निर्देशित केले आहे. उपविभागीय अधिकारी, यवतमाळ यांनी आर्णी तालुक्यातील जवळा या गावात कोविड पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने सदर गावास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत प्रस्तावित केले आहे. त्यानुसार आर्णी तालुक्यातील जवळा या गावास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून सदर भागाच्या सिमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिला आहे.

या आदेशाच्या कालावधीत शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी / कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेकरीता कर्तव्य करण्याची मुभा राहील. तसेच जवळा ग्रामपंचायतीच्या सचिवांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना/ पासेस निर्गमित कराव्यात आणि सदर्हु परवाना/ पासेस धारकांची यादी संबंधित पोलीस स्टेशन अधिका-यांना तात्काळ द्यावी. सदर्हु परवाना / पासेस धारकांना अत्यावश्यक सेवा, पोलीस स्टेशन अधिकारी यांनी नेमून दिलेल्या ठराविक वेळेत पुरविण्याची मुभा राहील. तसेच सदर्हु अत्यावश्यक सेवा पुरवठा करतांना सामाजिक अंतरचे व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सचिव यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांचे मार्फत करावी.

तसेच प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू करण्यात आलेले नियम वरील नमूद प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू राहतील. जे वरील आदेशांचे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

_______________________

जात वैधता प्रमाणपत्राकरीता ऑनलाईन

अर्ज करण्यासंदर्भात वेबिनार द्वारे मार्गदर्शन

यवतमाळ, दि. 24 : जिल्‍ह्यातील मागासवर्गीय उमेदवाराच्या जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ कार्यरत आहे. विज्ञान 12 वी, व्यावसायिक अभ्यासक्रमातील मागासवर्गीय विद्यार्थी, मागास प्रवर्गातून नियुक्त असणारे अधिकारी / कर्मचारी, मागास प्रवर्गातून निवडणूक लढविणारे उमेदवार इत्यादींना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात येते.

कोराना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयीन गर्दी कमी करून अर्जदारांना ऑनलाईन पध्दतीने वैधता प्रमाणपत्र मिळावे, याकरीता शासनाने ऑनलाईन सुविधा ऑगस्ट 2020 पासून सुरु केली आहे. मात्र यावर अर्ज करतांना उमेदवारांना अनेकदा अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन अर्जाकरीता मोफत मार्गदर्शन वेबीनार 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4.30 वाजता गुगल मिट या ॲपवर आयोजित करण्यात आली आहे.

सदर वेबिनारची लिंक https://meet.google.com/wca-gcza-hvj अशी आहे. यामध्ये अर्ज सादर कसे करावे, अर्ज सादर करतांना सोबत कोणते दस्ताऐवज सादर करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन पॉवर प्रेझेंटेशन द्वारा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या मागास प्रवर्गातील उमेदवारांनी महाविद्यालयातील प्राचार्य, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, इंटरनेट कॅफे व्यावसायिक इत्यादींनी सदरील वेबीनारमध्ये सहभागी होवून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे

_______________________

बाल संरक्षण कक्षाने रोखला बालविवाह

मुलीने शिक्षण पूर्ण करू देण्याची केली विनंती

यवतमाळ, दि. 24 : घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा खुर्द येथे सोळा वर्षाच्या व 10 वी मध्ये शिकत असलेल्या मुलीचे वडिलाचे छत्र हरवल्यामुळे लग्न करून लवकर जबाबदारी मधून मुक्त व्हावे, म्हणून बाल विवाहाचा घाट घातला होता. मात्र जबाबदार व्यक्तीने सदर मुलीचे भविष्य अंधारात जाण्यापासून वाचवले व जिल्हा बाल संरक्षण कक्षास माहिती दिली. त्यानंतर तत्परतेने बाल संरक्षण कक्षाची चमू गावात धडकली.

बालिकेच्या कुटुंबाला सदर बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. पालकांना मुलीचे लग्न सज्ञान झाल्यानंतर करण्याबाबत समजावून सांगितले. तसेच बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 पेक्षा कमी असेल तर असा विवाह करणे हा बाल‍ विवाह प्रतिबंध अधिनिमय 2006 अन्वये दखल पात्र गुन्हा आहे, याबाबत माहिती देण्यात आली. शेवटी मुलीच्या कुटुंबियाकडून बाल विवाह न करणे बाबत लेखी बंधपत्र उपस्थित पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या समक्ष लिहून देण्यात आले. यावेळी बालिकेने शिक्षण पूर्ण करू द्या मला दहावीची परीक्षा द्यायची आहे, पुढे शिक्षण घेऊ द्या अशी विनवणी उपस्थितांना केली.

सदर बालविवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर यांच्या मार्गदर्शनात बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी माधुरी पावडे, आकाश बुर्रेवार, नायब तहसिलदार डी.एम. राठोड, संरक्षण अधिकारी एस.बी.राठोड, ग्रामसेविका मिना मिसाळ, तलाठी एस.पी.राऊत, अंगणवाडी सेविका मिना देठे यांनी कार्यवाही पार पाडली.

बाल विवाहबाबत नागरिकांनी दक्ष राहावे, तसेच बाल विवाह बाबत माहिती असल्यास आपल्या गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दगडी इमारत, टांगा चौक, यवतमाळ अथवा चाईल्ड लाईन 1098 यांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.

_______________________

अखिल भारतीय व्यवसाय परिक्षाचे फॉर्म भरण्याची

अंतिम मुदत 26 फेब्रुवारीपर्यंत

यवतमाळ, दि. 24 : शिकाऊ उमेदवारी अंतर्गत 110 वी अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेला जे प्रशिक्षणार्थी कोविड – 19 च्या प्रादुर्भावामुळे ऑक्टोबर 2019 व एप्रिल 2020 करीता परिक्षा फॉर्म भरू शकले नाही. अशा प्रशिक्षणार्थ्यांकरीता (दुसरी फेरी, दुसरा टप्पा) मध्ये परिक्षेला बसण्याकरीता परिक्षा फॉर्म भरणे सुरु झाले आहे. परिक्षा फॉर्म भरण्याचा कालावधी दिनांक 17 फेब्रवारी 2021 ते दिनांक 26 फेब्रुवारी 2021 राहील याची नोंद घ्यावी, असे मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अंशकालीन प्राचार्य के.व्ही. बुटले यांनी कळविले आहे.

Copyright ©