Breaking News यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

*जिल्ह्यात 246 जण पॉझेटिव्ह, 158*    *जणकोरोना मुक्त  दोघांचा मृत्यु*. *इतर दिवसभरातील घडामोडी*

 

 

यवतमाळ, दि. 23 : गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 246 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 158 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय महिला आणि दारव्हा तालुक्यातील 83 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 246 जणांमध्ये 154 पुरुष आणि 92 महिला आहेत. यात यवतमाळातील 132 रुग्ण, दिग्रस 39, पुसद येथील 25, दारव्हा 17, पांढरकवडा 17, नेर 5, वणी 4, आर्णि 3, बाभुळगाव 3 आणि महागाव येथील 1 रुग्ण आहे.

 

सोमवारी एकूण 1339 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 246 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1093 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1138 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16501 झाली आहे. 24 तासात 158 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14913 आहे. तर जिल्ह्यात एकूण 450 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 155044 नमुने पाठविले असून यापैकी 154308 प्राप्त तर 736 अप्राप्त आहेत. तसेच 137807 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

_________________________

 

आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश

 

10 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

यवतमाळ, दि. 23 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा अंतर्गत केळापूर, घाटंजी, वणी, मारेगाव, झरी, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, यवतमाळ हे तालुके येतात. या कार्यक्षेत्रातील सन 2021-22 या वर्षाकरीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी प्रवेशाकरीता अर्ज विनामुल्य मागविण्यात येत आहे.

 

इयत्ता 1 ली 2 री मध्ये प्रवेश देण्यासाठी लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी अनुसूचित जमातीच्या असावा. प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जन्म तारखेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित जोडावी. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे कुटूंबातील वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रुपये 1 लक्ष इतकी राहील. विद्यार्थ्याचे आधारकार्ड छायांकित प्रत प्रवेश अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पूर्ण असावे. विधवा, घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. तसे प्रमाणपत्र प्रवेश अर्जासोबत जोडावे लागेल.

 

विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येतील. निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थित पालकाच्या व पाल्याच्या विनंती नुसार शाळा बदलता येणार नाही. अर्ज सादर करतांना विद्यार्थ्यांचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र, पालकाचे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अंगणवाडीचा दाखला (पहिल्या इयत्तेसाठी) ग्रामसेवकाचा दाखला, दारिद्रय रेषेखालील असल्याबाबतचा दाखला/ग्रामसेवकाचा दाखला, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड, महिला पालक विधवा/ घटस्फोटीत/निराधार/परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे.

 

वरीलप्रमाणे प्रत्येक शासकीय, अनुदानित आश्रमशाळांच्या पातळीवर व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा या कार्यालयात प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. आवश्यक त्या कागदपत्रासह अचूक माहिती भरून अर्ज दिनांक 10 मार्च 2021 पर्यंत या कार्यालयात सेतू विभागात अर्ज सादर करण्यात यावे. नामांकित शाळा योजनेंतर्गत पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपयेपेक्षा कमी असावे, असा नियम असतांना काही विद्यार्थ्यांचे पालक (आई – वडील) शासकीय, खाजगी नोकरीदार असतांना या योजनेचा लाभ घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेव्हा अशा पालकांनी विभागाला चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेऊन इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत आपल्या पाल्याचे प्रवेश घेतला असल्यास तो रद्द करून या योजनेचा लाभ सोडावा.

 

या कार्यालयाच्या तपासणीमध्ये असे विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतल्याचे आढळून आल्यास त्या विद्यार्थ्यांच्या पालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन यांनी कळविले आहे.

________________________

 

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ

 

यवतमाळ, दि. 23 : केंद्र तसेच राज्य शासन पुरस्कृत कौशल्य विकास योजनांचा माध्यमातून विविध तांत्रिक अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 योजनेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी दयानंद सिडाम यांचे हस्ते करण्यात आले.

 

सदर कार्यक्रमासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम ओरिएन एज्युटेक प्रा.लि. प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र, यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाच्या संबंधाने आयोजित करण्यात आला होता. सदर संस्था सेव्हिंग मशीन ऑपरेटर, फिल्ड टेक्निशिएन अदर होम अप्लान्सेस, रिटेल सेल्स असोशिएट तसेच हॅन्डसेट रिपेअर इंजिनिअर व रुम अटेन्डट इ. व्यवसायीक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देत असून सदर प्रशिक्षण रोजगार तथा स्वयंरोजगारभिमुक आहे.

 

सहाय्यक आयुक्त विद्या‍ शितोळे यांनी उपस्थितांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी घ्यावा आणि आपली कार्यक्षमता दाखवून रोजगाराचे साधन तयार करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे प्रमुख प्रमोद खोडे यांनी केले.

_________________________

 

पारधी समाजाच्या बेरोजगार युवक – युवतींकडून

 

28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

 

यवतमाळ, दि. 23 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा यांचेमार्फत आदिवासी लाभार्थ्यांसाठी (पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविणे) योजनेचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील खालील नमूद योजना राबविणेकरीता पारधी समाजाच्या बेरोजगार युवक, युवतींकडून दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या पारधी समाजातील लोकांनी नमूद योजनांकरीता चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये यापूर्वी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा या कार्यालयास अर्ज सादर केला असेल त्यांनी पुन्हा सदर योजनेकरीता अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

 

सदर योजनांमध्ये पारधी समाजाच्या सुशिक्षीत बेरोजगार युवकांना मालवाहू ॲटो रिक्षा (बॅटरी वरील) यासाठी देणे तीन चाकी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. तसेच पारधी समाजाच्या बेरोजगार युवक युवतींना हळद, मिरची कांडप मशिन पुरवठा करणे, बेरोजगार युवक युवतींना बटेर फॉर्म / कुक्कुटपालन व्यवसायाकरीता अर्थसहाय्य आणि पारधी समाजाच्या बेरोजगार लाभार्थ्यांना आटा चक्की पुरवठा करणे यांचा समावेश आहे.

 

यासाठी लाभार्थी हा पारधी अनुसूचित जमातीचा असावा. लाभार्थी हा प्रकल्प कार्यालय, पांढरकवडा कार्यक्षेत्रातील असावा. दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यास प्राधान्य देण्यात येईल. कांडप मशिन/ आटा चक्की करीता विज जोडणी असणे आवश्यक राहील सोबत विज बिल जोडावे. कांडप मशिन/आटा चक्की करीता अपंग विधवा लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. मिळणारी वस्तू दुसऱ्यास हस्तांतरण किंवा विकता येणार नाही. तीन चाकी वाहन करीता प्राप्त अर्जापैकी पात्र अर्जामधून लॉटरी पध्दतीने एका बेड्यावरील एकाच लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन यांनी कळविले आहे.

 

_________________________

 

 

माहिती अधिकार कायदा व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिकार कायद्याबाबत

 

मार्गदर्शन शिबीर

 

यवतमाळ, दि. 23 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजा चेतना भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात माहितीचा अधिकार कायदा 2005 तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या विषयावर शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश आर.ए.शेख यांनी भुषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे तहसिलदार भाग्यश्री देशमुख, तहसिलदार डॉ. संतोष डोईफोडे आणि नायब तहसिलदार एकनाथ बिजवे उपस्थित होते.

 

यावेळी डॉ. डोईफोडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाबाबत माहिती दिली. सामान्य लोकांना शासकीय कार्यालयामार्फत कोणत्या योजना तसेच कोणत्या सेवा पुरविल्या जातात, याबाबतची माहिती प्रत्येक कार्यालयाने दर्शनी भागात लावण्याबाबत या सेवा हमी कायद्यामध्ये सांगितले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

ललितकुमार वऱ्हाडे यांनी माहितीचा अधिकार याबाबत सामान्य लोकांमध्ये जनजागृती करणे खूप महत्वाचे आहे. तसेच आपण ज्या ठिकाणी काम करतो त्याबाबत परिपूर्ण माहिती असायला पाहिजे. ऑनलाईन सर्व सेवा ह्या उपलब्ध झाल्यास कामकाजामध्ये गतिमानता येते व पारदर्शकता सुध्दा दिसून येईल, याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष एम.आर.ए. शेख यांनी माहितीचा अधिकार कायदा व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदा ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगितले.

 

कार्यक्रमाचे संचालन व आभार सागर उदापुरकर यांनी केले. या कार्यक्रमाकरीता मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर शिबीराचे आयोजन कोरोना – 19 विषाणूचा प्रसार व प्रचार होवू नये तसेच शासनाने दिलेल्या नियम व अटीचे पालन करून तसेच त्याबाबतची संपूर्ण खबरदारी घेवून करण्यात आले होते.

_____________________

 

27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन

 

यवतमाळ, दि. 23 : वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

मराठी भाषा गौरव दिन हा कार्यक्रम मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या मुख्य धोरणास अनुसरून मराठी वाचन प्रेरणा दिन मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा या अन्य मराठी भाषा प्रचार प्रसार कार्यक्रमाबरोबर साजरा करण्यात येत असला तरी सध्याच्या कोविड – 19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जास्तीत जास्त कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (जिथे प्रत्यक्षरित्या कार्यक्रम करणे शक्य आहे, तिथे केंद्र शासन/राज्य शासन यांनी आखून दिलेल्या कोविड मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.)

 

______________________

 

नेहरू युवा केंद्र द्वारा ‘कॅच द रेन’ व जिल्हा युवा कार्यक्रम

 

सल्लागार समितीची बैठक

 

यवतमाळ, दि. 23 : नेहरू युवा केंद्र युवा कार्यालयाद्वारा अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे यांच्या अध्यक्षतेखाली कॅच द रेन या कार्यक्रमाचे उद्घाटन व जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. जलशक्ती मंत्रालय भारत सरकारद्वारा भारतातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा केंद्राच्या माध्यमाने करण्यात येत आहे.

 

प्रायोगिक तत्वावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 50 गावांमध्ये पावसाचे पाणी कश्याप्रकारे वाचवता येईल याबाबबत युवा मंडळ, स्थानिक सामाजिक संस्था, पाणी फाऊंडेशन, ग्रामपंचायत, नगरपालिका, स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, पाटबंधारे विभाग, शेती व फलोत्पादन विभाग, वनविभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अश्याप्रकारे विविध विभागाच्या माध्यमाने लोकांमध्ये जनजागृती करून लोकांना पाण्याबाबत जागृत करणे गरजेचे आहे.

 

अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी ‘कॅच द रेन’ या कार्यक्रमाचे पोष्टरचे विमोचन केले. कार्यक्रमाच्या जनजागृती करीता संपूर्ण विभागाचे नेहरू युवा केंद्राद्वारे आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती जाणून घेवून नेहरू युवा केंद्राने युवकांसोबत कार्य करून जनजागृती करावी अशी अपेक्षा केली. अमर दिनकर यांनी पावसाचे पाणी कश्याप्रकारे वाचवता येईल, याबाबत विविध उदाहरणे देवून उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाला समाजकल्याण निरिक्षक अरूण मोथरकर, प्रकाश दौलत मानवतकर, बुध्दीमान कांबळे, अमर दिनकर, सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे प्रबंधक अमर गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक (प्रतिनिधी) डॉ. मनोज तगलपल्लेवार, महेंद्र गुल्हाणे, निलिमा पाटणकर, डॉ.जी.ए.रहाटे, पुजा मते, सुमंत मलंगुलरकर, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, अनिल ढेंगे, सुभाष गिरी, संगम वाघमारे उपस्थित होते.

Copyright ©