Breaking News यवतमाळ सामाजिक

*रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे यंत्रणेला निर्देश* ______*तर दिवसभरातील आणखी काही घडामोडी*

 

 

 

यवतमाळ, दि. 18 :

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला निर्देश दिले आहे. यात संबंधीत हॉल, लॉन्स, मंगल कार्यालयधारकांनी तसेच अन्य कोणतेही ठिकाणी समारंभ अथवा कार्यक्रम आयोजित करीत असतांना संबंधित आयोजकांनी अशा कार्यक्रमासाठी अथवा अशा समारंभाकरीता अनुज्ञेय मर्यादेमध्येच उपस्थितांची संख्या ठेवावी. समारंभात सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, हॅण्ड सॅनिटायझर वापरणे आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. याबाबत कोणतेही उल्लंघन दिसून आल्यास संबंधित लान्स, मंगल कार्यालय अथवा असा कार्यक्रम, समारंभ आयोजित ज्या जागेमध्ये केला जात आहे, असे आस्थापनाधारक तसेच समारंभ आयोजित करणाऱ्या आयोजकास व्यक्तिश व संयुक्त जबाबदार धरण्यात येईल.

 

गर्दी होणारे कोणतेही खाजगी अथवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी संबंधित पोलीस स्टेशन मधून रितसर परवानगी प्राप्त करून घेणे अनिवार्य राहील. तसेच कार्यक्रमस्थळी कोविड – 19 संदर्भातील तरतुदीचे कोणतेही उल्लंघन आढळून आल्यास साथरोग अधिनियम आणि तत्सक कायदेशीर तरतुदीनुसार संबंधित स्थानिक पोलिस स्टेशनमार्फत यथोचित कारवाई करण्यात येईल.

 

सर्व सार्वजनिक ठिकाणी नागरिक कोविड – 19 अनुषंगीक निर्देशांचे पालन करीत आहेत किंवा नाही याबाबत संबंधित यंत्रणेने खात्री करून तात्काळ उचित कार्यवाही करावी आणि मार्गदर्शक सूचनांचे बिनचूक पालन करावे. कन्टेनमेंट क्षेत्र बाबतीत निर्देशाचे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरावरून काटेकोर पालन करण्यात यावे. हॉटेल, रेस्टॉरेंट, उपहारगृहे बाबतीत नियमांचे पालन होत नसेल तर त्याबाबतीत संबंधीत विभागांनी कठोर कार्यवाही करावी. कोविड – 19 रुग्ण आढळून येताच नियमाप्रमाणे त्या रुग्णाचे सहवासात आलेल्या इतर व्यक्तीचा शोध घेवून तात्काळ निर्देशानुसार चाचण्याबाबत कार्यवाही करावी. वेळोवेळी स्वच्छता विषयक आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात.

 

जिल्ह्यातील सर्व संबंधित पोलिस व प्रशासकीय विभाग प्रमुखांनी या आदेशाची कोटेकोर अंमलबजावणी करावी. सदर आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग कायदा 1897 आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमूद आहे.

 

________________________

 

निरूपयोगी द्रवनत्र पात्रांचा 5 मार्च रोजी जाहिर लिलाव

 

यवतमाळ, दि. 18 : जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, यवतमाळ येथून निरुपयोगी, निर्लेखन केलेली द्रवनत्र पात्रे विक्री करावयाची आहेत. सदर पात्रे इच्छुकांना अवलोकनासाठी ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. तसेच लिलावाच्या इतर अटी व शर्ती कार्यालयात व खात्याच्या संकेतस्थळावर www.ahd.maharashtra.gov.in उपलब्ध आहे.

 

दिनांक 5 मार्च 2021 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, वाघापुर रोड, यवतमाळ येथे जाहीर लिलाव करण्यात येत आहे. ज्या संस्था, कंपन्या, व्यापारी यांना निरुपयोगी द्रवनत्र पात्रे खरेदी करावयाची असतील अशा संस्थांनी, कंपनी, व्यापारी यांनी भाग घेण्यासाठी अनामत रक्कम 6 हजार रुपये रकमेचा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यवतमाळ यांच्या नावे काढलेला किंवा रोख रक्कम भरणे आवश्यक आहे. जाहीर लिलावाच्या प्रक्रियेचा निर्णय, लिलाव समितीचा अंतिम राहील. विक्री करण्यात आलेल्या द्रवनत्र पात्राचे हस्तांतरण करण्यापूर्वी चेपूण टाकण्यात येतील जेणेकरून त्यांचा पुर्नवापर, परत वापर करणे शक्य होणार नाही, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी.आर. रामटेके यांनी कळविले आहे.

 

_______________________

 

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत तांत्रिक प्रशिक्षण

 

यवतमाळ, दि. 18 : केंद्र तसेच राज्य शासन पुरस्कृत कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून विविध तांत्रिक अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध तांत्रिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

 

या योजनेंतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण हे उमेदवारांकरीता पुर्णत: निशुल्क असून 15 ते 45 वयोगटातील विद्यार्थी उमेदवारांना प्रशिक्षणास सहभाग घेता येईल. प्रशिक्षणाअंती उमेदवारांना संबंधित विभागाचे शासनमान्य प्रमाणपत्र प्राप्त होणार असून सदर प्रमाणपत्राचे आधारे उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होवू शकेल. सदर कौशल्य विकास प्रशिक्षण मेडीया, लेदर, डोमेस्टीक वर्कर, अपॅरल, इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड हार्डवेअर, टेलिकॉम, रिटेल, ब्युटी ॲन्ड वेलनेस, कॅपिटल गुड्स ऑटोमोटीव्ह, फिल्ड टेक्नीशिअन ऐअर कंडीशनर इ. विविध क्षेत्रात आत्पकालीन प्रशिक्षण देण्यात येईल.

 

प्रशिक्षणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उद्योग भवन, 4 था माळा, दारव्हा रोड, यवतमाळ या कार्यालयास संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यातील शाळा महावद्यालये, स्वयंसेवी संस्था, कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था आदींनी पुढाकार घेवून कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेची माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

 

__________________________

 

चना खरेदीकरीता ऑनलाईन नोंदणी सुरु

 

यवतमाळ, दि. 18 : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम 2020-21 मध्ये नाफेडमार्फत चना खरेदीकरीता शेतकऱ्यांची नोंदणी करण्याकरीता 8 खरेदी केंद्र उघडण्यात आले आहे. चना खरेदीकरीता ऑनलाईन नोंदणी दिनांक 15 फेब्रु 2021 पासून सुरु करण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे (आधारकार्ड, 7/12 उतारा, पिकपेरा व बँकेचे पासबुकची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत) संबंधीत खरेदी केंद्रावर देवून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे यांनी केले आहे.

 

______________________

 

आदिवासी महिला बचत गटाला शेळीवाटप पुरवठ्यासाठी अर्ज आमंत्रित

 

यवतमाळ, दि. 18 : विशेष केंद्रीय सहाय्य योजनांतर्गत आदिवासी महिला बचत गटाला शेळीगट पुरवठा करणे ही योजना शासन निर्णयान्वये मंजूर आहे. त्यासाठी महिला बचतगट हा अनुसूचित जमातीचा असावा. लाभार्थी गट हा नोंदणीकृत असावा. गटातील किमान एका सदस्याकडे 7/12 दाखला असणे आवश्यक आहे. तसेच शेळ्यांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक राहील. गटातील सदस्यांनी अथवा त्यांच्या कुटूंबातील इतर सदस्यांनी सदर योजनेचा लाभ यापूर्वी आदिवासी विकास विभाग अथवा इतर कोणत्याही शासकीय विभागाकडून घेतला नसल्याबाबत दाखला जोडणे आवश्यक आहे.

 

बचतगटाचे सर्व सभासदांचे (अनुसूचित जमातीचे) जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक. बचत गटांचे नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक, रहिवासी प्रमाणपत्र, बचतगटाचे आधार जोडणी केलेले बँकेचे पासबूक, उत्पन्नाचे प्रमाणपत्र सर्व सभासदांचे (तहसिलदार यांचे), अर्जदाराचे पासपोर्ट साईज 2 फोटो, आधारकार्ड (सर्व सभासदांचे) आवश्यक आहे.

 

उपरोक्त योजनेचे अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद येथे दिनांक 15 फेब्रु ते 25 फेब्रु 2021 या कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. पुसद प्रकल्प क्षेत्रातील (पुसद, दिग्रस, दारव्हा, आर्णी, नेर, महागाव, उमरखेड) या 7 तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त महिला बचतगटांनी सदर योजनेकरीता परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©