Breaking News यवतमाळ सामाजिक

*एसपींना कडकं कार्येवाई करण्याचे जिल्हाधिकारी सिंह यांचे निर्देश* *तर काही महत्व पूर्ण ठळक घडामोडी*

 

 

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर यंत्रणेचा आढावा

 

यवतमाळ, दि. 17 :

गत तीन – चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या अशीच वाढतच राहिली तर जिल्ह्यात कोरोनाची पुर्ववत परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी निष्काळजीपणा सोडून शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे. अन्यथा पुन्हा ‘लॉकडाऊन’ करण्याशिवाय प्रशासनाला पर्याय राहणार नाही, असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्पष्ट केले.

 

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने यंत्रणेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.

 

जिल्ह्यात यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद येथून सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण येत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी स्वत:च्या तसेच दुस-यांच्या आरोग्यासाठी आतातरी निष्काळजीपणा सोडावा. शासन आणि प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी पोलिस अधिक्षकांना दिले.

 

रुग्णसंख्या वाढणा-या तीन ठिकाणाहून प्रति दिन प्रत्येकी 500 याप्रमाणे दिवसाला 1500 नमुन्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. यात 70 टक्के आरटीपीसीआर आणि 30 टक्के रॅपीड ॲन्टीजन टेस्ट करा. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने मृत्यू होण्याची कारणे, याबाबत विश्लेषण करून डेथ ऑडीट रिपोर्ट अधिष्ठाता यांनी सादर करावा. सोबतच डीसीएच, डीसीएचसी आणि खाजगी रुग्णालय येथे कोरोनामुळे मृत्यू होण्याची कारणे याबाबत ऑडीट रिपोर्ट जिल्हा शल्य चिकित्सकांनी सादर करावा.

 

यंत्रणेने अलर्ट राहून हाय -रिस्क काँटॅक्ट, लो-रिस्क काँटॅक्ट, ट्रेसिंग, उपचार आदी जबाबदारी चोखपणे पार पाडावी. जिल्हा आरोग्य अधिका-यांनी नमुन्यांची चाचणी करण्याकरीता इमारतीची मागणी केली आहे. सदर इमारत संबंधित तहसीलदारांनी त्वरीत अधिग्रहीत करावी. तीन – चार दिवसांत रुग्णसंख्येत कमतरता आली नाही तर तीन शहरात लॉकडाऊनची परिस्थती येऊ शकते, असाही इशारा त्यांनी दिला.

 

जिल्ह्यातील 25338 फ्रंटलाईन वर्कर्सची माहिती कोविड लसीकरण पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी 9951 जणांना लस देण्यात आली असून उर्वरीत लोकांचे लसीकरण 20 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले.

 

____________________________

 

खाजगीमध्ये वैद्यकीय सेवा घेणाऱ्या क्षयरुग्णांची

 

आरोग्य विभागास नोंदणी करणे अनिवार्य

 

यवतमाळ, दि. 17 :

प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद होऊन त्याला उपचार करणे व क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. या अनुषंगाने खाजगी क्षेत्राकडून वैद्यकीय सेवा घेणाऱ्या क्षयरुग्णांची आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

 

क्षयरोग निदान करणाऱ्या राज्यातील सर्व पॅथोलॉजी, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा, रेडिओलॉजी सुविधा, क्षयरुग्णावर उपचार करणारे विविध पॅथींची सर्व रुग्णालये, ड्रॉक्‍टर्स (सर्व बाह्य रुग्ण व अंतर रुग्ण सुविधा), क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते यांच्याकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. ज्या प्रयोगशाळा, डॉक्टर, रुग्णालये, औषध विक्रेते रुग्णांची नोंदणी करणार नाहीत, अशा संस्था किंवा व्यक्तींना क्षयरोगाचा प्रसार करण्यासाठी जबाबदार धरण्यात येवून, भारतीय दंड विधान कलम 269, 270 नुसार कारवाईसाठी पात्र आहेत. या कलमाअंतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तीस किमान 6 महिने ते 2 वर्षापर्यंत शिक्षा व दंडाची तरतुद आहे.

 

राज्यातील क्षयरोग निदान करणाऱ्या सर्व प्रयोगशाळा, क्षयरुग्णांवर उपचार करणारे विविध पॅथींची सर्व रुग्णालये, डॉक्टर्स, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते यांनी 1 जानेवारी 2021 पासून त्यांच्याकडे निदान होणाऱ्या, उपचार घेणाऱ्या, औषधे घेणाऱ्या सर्व रुग्णांची नोंदणी राज्य, जिल्हा, महानगरपालिका क्षयरोग कार्यालयास करावी. क्षयरुग्ण नोंदणीसाठीच्या विहीत नमुन्यातील माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी, शहर क्षयरोग अधिकारी यांच्याकडे दरमहा पाठविण्यात यावी, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांनी केले आहे.

 

दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा खोकला, दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट, भूक न लागणे, मानेवर गाठ येणे खालीलपैकी कोणतेही एक लक्षण असल्यास संशयित क्षयरुग्ण समजावा. अधिक माहितीसाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय, यवतमाळ क्र. 07232-253214 यांच्याशी संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.

 

_________________________

 

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाकरीता मार्जिन मनी योजना

 

यवतमाळ, दि. 17 :

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. सदर योजनेच्या मार्गदर्शक सुचना शासन स्तरावरून निश्चित करण्यात आले आहे. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in

या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

 

सदर योजनेकरीता इच्छुक लाभार्थी असतील त्यांनी आपला प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यवतमाळ यांचेकडे शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पुर्तता करून सादर करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

____________________________

 

विविध योजनांच्या लाभासाठी हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

 

यवतमाळ, दि. 17 :

विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबळ सेवा योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना व इंदिरा गांधी अपंग वेतन योजना अंतर्गत लाभार्थ्यांनी दरवर्षी 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत, जेथे खाते आहे अशा बँक व्यवस्थापक अथवा पोस्ट मास्तरकडे स्वत: हजर राहावे. तसेच ते हयात असल्याची नोंद बँक व्यवस्थापक अथवा पोस्ट मास्तरांनी करून घ्यावी.

 

कोणत्याही कारणामुळे लाभार्थी बँकेत हजर राहू शकला नाही तर त्या लाभार्थ्याने तहसिलदार, नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) यांच्या समोर हजर राहून हयात बाबतचे प्रमाणपत्र संबंधीत तहसिलदार यांच्याकडे सादर करावे. कोणत्याही परिस्थितीत हयात प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय सदर लाभार्थ्याला 1 एप्रिल पासून आर्थिक सहाय्य / निवृत्ती वेतन देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. लाभार्थ्यांनी विहीत नमुन्यात हयाती बाबतचे प्रमाणपत्र दिनांक 31 मार्च 2021 पूर्वी सादर करावे, असे आवाहन महागावचे तहसिलदार यांनी केले आहे.

Copyright ©