Breaking News यवतमाळ सामाजिक

सम्यक’च्या प्रयत्नाने महिला होणार ‘सक्षम’* *स्त्रियांना स्व’मर्जी’नेच मिळणार आरोग्य विषयक मोफत मार्गदर्शन*

 

 

घाटंजी

 

पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सर्वत्र राज्याला गौरविले जाते. पण स्त्री-पुरुषात भेद करणाऱ्या या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आजही स्त्रियांना दुय्यम दर्जा व असमानतेचा सामना करावा लागतो. हा अनुभव सर्व स्तरावर येतो. त्यात स्त्रियांच्या गर्भपाताचा विषय मुळात असमानतेच्या पायरीवरून सुरू होतो. विशेष म्हणजे मुलगा व मुलगी हा भेदाभेद सर्वसामाण्यात जरी रूढ असला तरी केवळ गर्भपात करताना कायद्याची परिभाषा, त्याचा काढलेला चुकीचा अर्थ व त्यामध्ये होणारी केवळ महिलांची ससेहोलपट तथा प्रसंगी त्यांची होणारी जीवितहानी ह्या बाबी आता सर्वत्र व सर्रास होताना दिसून येते.

 

देशातच नव्हे तर राज्यात सुद्धा मुलाच्या प्रमाणात मुलीचा जन्मदर प्रत्यक्षात कमी असल्या कारणाने गर्भलिंगनिदान हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्याने काही अंशी मुलीच्या जन्मदरात वाढ झाली असली तरी या कायद्याचा संदर्भ देऊन अपवादात्मक परिस्थितीत अत्यावश्यक असलेले गर्भपात करताना दिसून येत नाही. त्यामुळे अनेक महिला असुरक्षित गर्भपात करताना दिसून येत आहे. केवळ असुरक्षित गर्भपात केल्यामुळे गर्भावस्थेतील महिलेच्या मृत्यूच्या दरात वाढ झाल्याचे शासनाच्या अहवालातून स्पष्ट होते. त्यामुळे गर्भलिंग निदान कायदा, सुरक्षित व असुरक्षित गर्भपात याविषयी शासकीय यंत्रणा, पीडित महिलाच नव्हे तर संपूर्ण समाजामध्ये या संदर्भात जनजागृती होणे आजमितीस अत्यंत गरजेचे आहे.

 

असे असतानाही यावर मात्र फारसे कोणीच आवाज उठवातांना दिसून येत नाही. पण आता पुणे येथील सम्यक संवाद व संशोधन संस्था समोर आली असून यापुढे स्त्री व तिच्या आरोग्य विषयक जसे स्त्रीभ्रूणहत्या सोबतच गर्भपाताच्या संदर्भात सर्वांनी काढलेले वेगवेगळे अर्थ, लिंग निदान कायद्याच्या आड अत्यावश्यक असतानासुद्धा गर्भपात न करणे, यात आरोग्य यंत्रणेच्या विविध क्लुप्त्या यामुळे पीडित स्त्रीला न्याय मिळताना दिसून येत नाही. आता त्यांच्या न्यायासाठी नव्हे तर जिवित्वा साठी सम्यक संस्था सरसावली असल्याने आता सम्यकच्या प्रयत्नाने महिला आरोग्य विषयक सक्षम होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

त्यासाठी पुणे येथील सम्यक सस्था, पत्रकारिता विभाग मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षम ग्रामीण पत्रकार महाराष्ट्र प्रशिक्षण व डॉक्टरांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून त्यामध्ये लिंगभाव, पितृसत्ता लैगिक व प्रजनन आरोग्य हक्क यावर प्रदीर्घ विचारमंथन करण्यात येत आहे. त्यामध्ये सम्यक संस्थेचे संचालक आनंद पवार व प्रीतम पोतदार यांचे सविस्तर व मुद्देसूद मार्गदर्शन तसेच गौरी कुलकर्णी व ज्योत्स्ना सोनकुसरे यांनीही त्यांच्या भूमिका चोखपणे निभावताना दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे गर्भलिंग निदान व गर्भपात ह्या दोन वेगवेगळ्या बाजू असून गर्भलिंग निदान कायद्यामुळे स्त्रियांना अत्यावश्यक असतांना सुद्धा त्या परिस्थितीत सुरक्षित गर्भपात हा अधिकार असून सुद्धा तो नाकारल्या जातो. त्यामुळे गर्भलिंग निदान कायदा व सुरक्षित गर्भपात याविषयी गल्लत होत असल्याने अनेक महिलांचे मृत्यू ओढवत आहे. त्यामुळे यासंदर्भात महाराष्ट्रामध्ये जनजागृती होण्याची बाजू प्रांजळपणे या प्रशिक्षनातून समोर आली आहे.

 

स्त्रियांच्या आरोग्या संदर्भात महाराष्ट्रातील अनेक छोट्या शहरांमध्ये संबंधित संस्थेमार्फत विविध प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्यामध्ये स्त्रियांचे आरोग्य व त्याच प्रमाणे त्यासाठी बिनधोक व संवेदनशील आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने मागील कित्येक वर्षापासून सम्यक संस्था प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून या संस्थेने आता मर्जी हॉटलाइन ही सेवा सुरू केली.

 

मर्जी हॉटलाइन च्या माध्यमातून गर्भनिरोधकांच्या माहिती सोबतच गर्भनिरोधक साधनांचे प्रकार, साधने कुठे मिळतात आणि ही साधने कशी वापरायची याची इत्यंभूत माहिती, त्याचप्रमाणे सुरक्षित गर्भपाता बद्दल तांत्रिक माहिती व अत्यावश्यक असलेल्या गर्भपाताच्या कायद्या बद्दल माहिती एवढेच नव्हे तर गर्भपाताच्या सेवा पुरविणाऱ्या सरकारमान्य व खाजगी गर्भपात केंद्राबद्दलची माहिती, त्यातच सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताच्या सेवा पुरविणाऱ्या सरकारमान्य व खाजगी सेवांची माहिती या ‘मर्जी ‘ हॉटलाइन वरून वर मिळणार असून 9075 764 763 या नंबर वर फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव व त्याच्या संपर्का बद्दलची माहिती याबाबत संपूर्ण गुप्तता राखली जाणार आहे. त्याकरिता सोमवार ते शुक्रवार सकाळी दहा ते सायंकाळी सहा या कालावधीत संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे आता स्त्रियांना

स्वमर्जीनेच मर्जी हॉटलाइनच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन सम्यक संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

सोबतच www.marjee.org.in या वेबसाईट वरती भारतात केल्या जाणाऱ्या वैद्यकीय व कायदेशीर गर्भपातासंबंधी आणि गर्भनिरोधनाच्या उपलब्ध पद्धती व साधनांची माहिती सर्वांनां सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे संकेतस्थळ विकसीत केले गेले आहे. ‘वैद्यकीय गर्भपाताचा कायदा, १९७१’ व त्या अनुषंगाने अस्तित्वात असलेले नियम व अटी हा या संकेतस्थळावरील माहितीचा मुख्य आधार आहे. या शिवाय, विविध लेख, छायाचित्रे, रेखाचित्रे, अहवाल, आकडेवारी, काही अंतरराष्ट्रीय संस्था व संसाधनांच्या लिंक्स, महाराष्ट्रातील कायदेशीर सेवापुरवठादार वैद्यकीय व्यावसायिक आणि सुविधांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

Copyright ©