यवतमाळ सामाजिक

*जिल्ह्यातील महत्व पूर्ण घडामोडी पहा*

एका मृत्युसह जिल्ह्यात 51 जण पॉझेटिव्ह

66 कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 11 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 51 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये घाटंजी तालुक्यातील 31 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 66 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 388 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 51 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 337 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 470 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14947 झाली आहे. 24 तासात 66 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14040 आहे. तर जिल्ह्यात एकूण 437 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 146698 नमुने पाठविले असून यापैकी 146262 प्राप्त तर 436 अप्राप्त आहेत. तसेच 131315 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

________________________

 

अवसायनात असलेल्या सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरु

 

हरकती / आक्षेप असल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन

 

यवतमाळ, दि. 11 : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्या खालील नियम 1961 मधील तरतुदीचे पालन न केल्याने सहकारी कायद्याचे कलम 102 व 103 मधील तरतुदीनुसार घाटंजी तालुक्यातील सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत.

 

यात आतिश गृहतारण सहकारी संस्था मर्या. घाटंजी, आबासाहेब पारवेकर गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. पारवा, अभिनव गृहनिर्माण सह.संस्था मर्या. घाटंजी, खोब्रागडे मागा. गृह.सह.संस्था मर्या. घाटंजी, जय हनुमान पाणी वापर सह.संस्था, मर्या. घाटी, श्री.गजानन पाणी वापर सह.संस्था मर्या. जांब, दक्षता स्वयंरोजगार व वि.सेवा सह. संस्था मर्या. जरूर, श्री.जगदंबा माता स्वय. सह. संस्था मर्या. आमडी, जनाई स्वयंरोजगार सह. संस्था मर्या. बोदडी, आदर्श सुशिक्षीत सेवा सह.संस्था मर्या. मर्या पार्डी (न), कृषीधन प्रक्रीया सहकारी संस्था मर्या. पार्डी (न), नृसिंह फळे, फुले भाजी व कृषी माल उत्पा. ख व वि. प्रक्रीया सह. संस्था मर्या. घाटंजी आणि समता मागा. औद्योगिक सह. संस्था मर्या. भांबोरा यांचा समावेश आहे.

 

या संस्थांची नोंदणी रद्द करण्यापूर्वी संस्थेचे धनको व ऋणको तसेच सभासदांकडून काही आक्षेप / हरकती असल्यास 15 दिवसांचे आत संस्थेच्या संबंधित सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था ता.घाटंजी किंवा संस्थेचे अवसायक यांच्याकडे सादर करण्यात याव्यात. उक्त कालावधीत कोणते आक्षेप / हरकती प्राप्त न झाल्यास कोणाला काहीही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरून संस्थांची नोंदणी रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल, यांची संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक दिगंबर पिंजरकर यांनी कळविले आहे.

 

 

 

पशुसंवर्धन विभागातर्फे शेळी – म्हशी वाटप योजना सुरू

 

यवतमाळ, दि. 11 : यवतमाळ जिल्ह्यात मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर शेळी गट व 2 देशी वा 2 संकरीत गाई वा 2 म्हशी वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात सन 2020-21 मध्ये 50 टक्के अनुदानावर सर्व प्रवर्गासाठी 20+2 शेळी गटाचे तसेच 2 देशी वा 2 संकरीत गाई वा 2 म्हशी गट वाटप करावयाचे आहे. योजनेमध्ये 16.2 टक्के अनुसूचित जाती व 8 टक्के अनुसूचित जमातीचे लाभार्थींची निवड होणार असून 30 टक्के महिला व 3 टक्के दिव्यांग लाभार्थीस प्राधान्य देण्यात येईल.

 

शेळी गट प्रकल्प स्वरूप अंतर्गत 20 शेळ्या प्रती शेळी 6 हजार रूपये, 2 बोकड प्रती बोकड 7 हजार रुपये, शेळ्यांसाठी गोठा / वाडा बांधकाम 450 चौ.फुट 212 रु. प्रती चौ. फुट (खुली जागा 1550 चौ.फुट) राहील. दुधाळ गट प्रकल्प स्वरूप अंतर्गत 2 देशी / 2 संकरीत गाई 51 हजार रुपये प्रती गाय, प्रती गाय 5 हजार रुपये, 2 म्हशी 61 हजार रुपये प्रती म्हैस, प्रती म्हैस 5 रुपये राहील.

 

योजनेनुसार निवडलेल्या लाभार्थीने आधी स्व-खर्चाने वा बँक कर्ज उभारून वरील प्रकल्प स्थापित करावयाचा आहे. त्यानंतर लाभार्थीचे बँक खात्यात शेळी गटासाठी पडताळणीअंती पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात 25 टक्के व दुसऱ्या सहा महिन्यात उर्वरित 25 टक्के अनुदान थेट जमा करण्यात येईल. तसेच दुधाळ जनावरे स्वखर्चाने खरेदी केल्यानंतर पडताळणी अंती लाभार्थीचे खात्यात अनुदान राशी थेट जमा करण्यात येईल.

 

सन 2015-16 पासून आजपर्यंत कुठलेही शासकीय योजनेचे अनुदानावर शेळी गट / दुधाळ गट खरेदीचा लाभ मिळालेल्या अर्जदारास अपात्र समजण्यात येईल. निवड झालेल्या लाभार्थीस आदेश प्राप्त झाल्यापासून 45 दिवसात प्रकल्प पूर्ण करावयाचा आहे. शेळी गटासाठी खरेदीपूर्वी गोठा बांधकाम करणे अनिवार्य राहील. 45 दिवसात लाभार्थीने ही प्रक्रीया पूर्ण न केल्यास पशूधन विकास अधिकारी (विस्तार) त्यांना नोटीस देऊन त्यांची झालेली निवड रद्द करतील व प्रतिक्षा सुचीवरील लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल.

 

शेळी गटासाठी लाभार्थीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळाकडून किंवा शेळी बाजारातून शेळ्यांची खरेदी समिती सदस्यांच्या उपस्थितीमध्ये करावयाचे आहे. तर दुधाळ गट राज्याबाहेरून खरेदी समिती सदस्यांच्या उपस्थितीमध्ये खरेदी करावयाचा आहे. दुधाळ व शेळी गटाचा तीन वर्षाचा विमा व वाहतूक विमा लाभार्थीने स्वखर्चाने काढावयाचा आहे.

 

1 मे 2001 नंतर तिसरे हयात अपत्य नसणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील इच्छुकांनी दिनांक 18 फेब्रुवारी 2021 पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यवतमाळ तथा निवड समिती अध्यक्ष यांनी केले आहे. अर्जाचा नमुना पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) कार्यालयाकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

————————————-

 

15फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा ‘तो’ आदेश रद्द

 

यवतमाळ, दि. 11 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग यवतमाळ जिल्ह्यात 15 फेब्रुवारी 2021 पासून सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठाच्या कुलसचिवांनी यवतमाळच्या जिल्हाधिका-यांना कळविले होते. मात्र 1 फेब्रुवारी 2021 पासून दिवसेंदिवस यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये असलेल्या परिस्थितीचा विचार करता 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत पूर्वी प्रमाणे सुरू असलेले ऑनलाईन वर्गच सुरू ठेवण्यात यावे. त्यानंतर कोरोना विषाणुच्या संदर्भातील परिस्थितीचा विचार करून यवतमाळ जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयचे प्रत्यक्ष उघडण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आदेशान्वये विद्यापिठाला कळविले आहे.

 

त्यामुळे अमरावती विद्यापिठाशी संलग्नित जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालय, निमशासकीय महाविद्यालयातील वर्ग 15 फेब्रुवारी पासून सुरू करण्याबाबतचा आदेश रद्द करण्यात येत असल्याचेही नवीन आदेशात म्हटले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©