यवतमाळ सामाजिक

*जिल्ह्यातील आजच्या महत्व पूर्ण घडामोडी*

जिल्ह्यात 58 जण पॉझेटिव्ह, 39 कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 9 : गत 24 तासात जिल्ह्यात 58 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 39 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 278 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 58 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 220 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 467 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14842 झाली आहे. 24 तासात 39 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13941 आहे. तर जिल्ह्यात एकूण 434 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 145795 नमुने पाठविले असून यापैकी 145347 प्राप्त तर 448 अप्राप्त आहेत. तसेच 130505 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

_______________________

 

जिल्हा क्रीडा संकुल स्केटींग रिंग सरावाकरीता उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 9 : जिल्हा क्रीडा संकुल, गोधणी रोड, यवतमाळ येथे विविध क्रीडा सुविधा अद्यावत करण्यात आल्या आहेत. यापैकी स्केटींग रिंग ही सुविधा सिंथेटीक्स सुविधेसह अद्यावत करयात आली आहे. सदर क्रीडा सुविधेचा वापर सरावासाठी खेळाडू, लहान मुले, मुलींनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा. करीता स्केटींग या खेळासाठी जिल्हा क्रीडा संकुल, गोधणी रोड, यवतमाळ येथे नोंद करून घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविलेले आहे.

_______________________

 

नेहरू युवा केंद्राद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन

 

यवतमाळ, दि. 9 : नेहरू युवा केंद्र व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था तसेच जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक सामान्य रुग्णालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांकरीता गावांमध्ये रक्तदान शिबिर तसेच एच.आय.व्ही, एड्स विषयी व्यापक व प्रभावी जनजागृती करण्याकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

 

पांढरकवडा तालुक्यातील कलगांव येथे रक्तदान शिबिराकरीता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रमेश धावंडकर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून उदय नरवाडे गटशिक्षणाधिकारी किशोर रावते, बबन कोरके, पोलिस पाटील नारायण उकंडे, गजानन वाघमारे, रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य श्रीधर भवानकर, सुशील गावंडे, विजय भांडवले, अशोक राऊत, राजेश कापसे, गजानन सोनटक्के, नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक केशव कनवले, मारोती पवार, सुमंत मलंगूलकर, सांगम मेश्राम उपस्थित होते. डॉ. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, येथील रक्त संक्रमण अधिकारी यांची चमू रक्त घेण्याकरीता उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे संचालन प्रितम खंदारे यांनी केले. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक अधिकारी सारंग मेश्राम व अनिल ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाकरीता अविनाश चव्हाण, आशिष भवानकर, प्रफुल खंदारे, कृष्णा कापस, अरविंद शेंडे यांनी परिश्रम घेतले.

______________________

 

ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेसाठी

 

15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

यवतमाळ, दि. 9 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा यांचे मार्फत सन 2020-21 मध्ये ठक्कर बाप्पा आदिवासी वस्तु सुधारणा एकात्मिक कार्यक्रम अंमलबजावणी योजना अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

सदर योजना राज्यातील आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्ह्यातील ग्रामीण, नागरी भागातील आदिवासी उपयोजना क्षेत्र अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्र, माडा, मिनीवाडा, प्रस्तावित माडा, मिनीवाडा क्षेत्र व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील 50 टक्केपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेल्या वस्त्या, पाडे, वाड्या, गावांच्या, महानगरपालिका, नगरपरिषदेचे प्रभाग येथील विकासासाठी आवश्यक असलेल्या सामुहिक विकासाच्या सुविधा पुरविण्यासाठी वरील योजना राबविण्यात येत आहे.

 

त्यानुषंगाने मुख्य वस्तीपर्यंत जोडारस्ते पिण्याच्या शुध्द पाण्याची सोय करणे, जुन्या विहीरीची दुरुस्ती, विहीरीचे खोलीकरण, गाळ काढणे, बंद गटार बांधणे, गटाराची साफसफाई करणे, नाल्याची देखभाल, मोऱ्या बांधणे इ., महिला व बाल रोग निदान शिबिरे आयोजित करणे, आदिवासी वस्त्यांचे विद्युतीकरण, मार्गदीप बसविणे इ., वसतीशाळा सुविधा देणे, निरक्षरता निर्मुलन कार्यक्रम राबविणे, समाजमंदीर वाचनालय, व्यायामशाळांची स्थापना इ. सार्वजनिक शौचकुप व मुताऱ्यांचे बांधकाम, वैरण विकास कार्यक्रम, पशुधन विकास, तुषार व ठिंबक सिंचन, जलसंधारण, भूसंरक्षण इ. कार्यक्रम, सार्वजनिक मालमत्ता संरक्षण ऐतिहासिक स्मारके, दुर्मिळ वास्तूंचे संरक्षण बांधकाम, पाणंद, शेत रस्त्यांची कामे इत्यादी सार्वजनिक हितसंबंधातील अनुषंगीक कामे संबंधी प्रस्ताव ग्रामपंचायतनी या कार्यालयास सादर करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

 

सदर प्रस्ताव दिनांक 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा जि. यवतमाळ या कार्यालयास सादर करावे, असे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा यांनी कळविले आहे.

________________________

 

मध केंद्र योजनेकरीता अर्ज आमंत्रित

 

यवतमाळ, दि. 9 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. याकरीता पात्र व्यक्ती, संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. योजनेची वैशिष्टे – मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष, छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती करणे हा आहे.

 

यासाठी अर्जदार साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ व्यक्तीकरीता किमान 10 वी पास, वय वर्ष 21 पेक्षा जास्त, अशा व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

 

केंद्रचालक संस्था करीता संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षेमता असलेले सेवक असावेत. लाभार्थी निवड प्रक्रीयेनंतर प्रशिक्षणांपूर्वी मध व्यवसाय सुरु करणे संबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील, मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य.

 

अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, उद्योग भवन, तिसरा मजला , दारव्हा रोड, यवतमाळ, दुरध्वनी क्र.07232-244791, मो. नं. 9420771535 किंवा संचालक मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. 5 मु.पो.ता. महाबळेश्वर जि. सातारा 412806 दुरध्वनी 02168-260264 यांच्याशी संपर्क करावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे.

______________________

 

नेहरू युवा केंद्र द्वारा राष्ट्रीय जल पुरस्काराकरीता अर्ज आमंत्रित

 

यवतमाळ, दि. 9 : नेहरू युवा केंद्र कार्यालयाद्वारा जल शक्ती मंत्रालय, भारत सरकार द्वारा 2020 करीता आंतरराष्ट्रीय जल पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात येत आहे. याकरीता अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2021 जलशक्ती मंत्रालय द्वारा देण्यात आली आहे. पुरस्काराचे स्वरुप उत्कृष्ट राज्य, उत्कृष्ट जिल्हा, उत्कृष्ट ग्रामपंचायत, उत्कृष्ट नगरपालिका, उत्कृष्ट दैनिक न्यूज पेपर, उत्कृष्ट शाळा, महाविद्यालय आणि उत्कृष्ट अशासकीय संस्था व युवा मंडळ महिला मंडळ यांना पुरस्काराचे वितरण केल्या जाईल.

 

जिल्ह्यातील विविध संस्था व जलसंधारणचे कार्य करणाऱ्या संस्था व युवा मंडळ यांनी निर्धारीत प्रपत्रात अर्ज सादर करावयाचा आहे. याकरीता अर्जाचा नमुना व माहितीकरीता https://mygov.in या वेबसाईटवर नेहरू युवा केंद्र, चंदन नगर, वडगाव रोड, यवतमाळ यांच्या सोबत संपर्क साधावा.

Copyright ©